वाड्याचे आत्मवृत्त
Vadyace Atmavratta
माझे शनिवार
पेठेतील काका नविन जागी स्थलांतरीत होणार आहेत कारण त्यांच्या जुन्या वाड्याच्या
जागी तो पाडुन नविन मोठ्ठी इमारत उभी रहाणार आहे. म्हणुन शेवटचं म्हणुन एकदा आम्ही
काल त्यांच्याकडे गेलो होतो. हा वाडा खुप जुना म्हणजे अगदी शंभर एक वर्षापुर्वीचा
तरी असेल. लहानपणी जेंव्हा जेंव्हा मी काकाकडे रहायला यायचो तेंव्हा इथे खेळायला
खुप मज्जा यायची. वाड्यात सहज एक फेरफटका मारायला मी बाहेर पडलो. वाडा पडका झाला
असला तरी जुन्या संस्कृतीच्या खुणा अजुनही दिसत होत्या. काहि दिवसांनी हा वाडा
पडणार, काय चाललं असेल या
वाड्याच्या मनात?
मी विचार करायचा आवकाश आणि काय
आश्चर्य मला वाड्याचे आत्मवृत्त चक्क ऐकु येऊ लागले.
काही दिवसांनी माझी मोडतोड
सुरु होणार. मोठ्ठ मोठ्ठी यंत्र, असंख्य माणसं
दिवस-रात्र माझ्या शरीरावर जखमा करणार, माझ्या एकेकाळच्या दिमाखदार अस्तीत्वाला खिंडार पाडणार आणि त्याला पडलेल्या
भगदाडातुन वर्षानुवर्ष जपलेली संस्कृती, जुन्या आठवणी, इतिहासाच्या खुणा
भळभळणाऱ्या त्या जखमांतुन वाहुन जाणार. एकेकाळी वाडे हे वैभव होते. ते वैभव आता
लयाला जाण्याच्या मार्गावर आहे. कधीकाळी माझ्या या अजस्त्र विस्तारामध्ये नाही
म्हणलं तरी सुमारे ६०/७० भाडेकरू किमान शंभर वर्षे ही वाडा-संस्कृती अनुभवत होते,
जगत होते. वाडय़ातील ही बिऱ्हाडे केवळ
वेगवेगळ्या खोल्यांत राहायची इतकेच वेगळेपण. बाकी सारा वाडा हे खरोखरच एक कुटुंब
होते. प्रत्येका घरची सणं, वाढदिवस, आनंदाचे क्षण हे त्या घराचे नसुन पुर्ण
वाड्याचे होते. कुणाला दुखलं-खुपलं, कुणावर अचानक आजारपण कोसळलं, तर अख्खा वाडा
मदतीला जाउन जायचा. लेकरांची आडनावं नुसती वेगवेगळी, नाहीतर कुणाचं दुपारचं जेवण एकाकडे तर संध्याकाळचा चहा
दुसरीकडे असायचा. खिरापती, वाडय़ातील हनुमान
जयंती, कोजागीरी पोर्णीमा,
अंगणातील भेळीचा कार्यक्रम, उन्हाळ्यातील वाळवणे.. अशा कित्ती आठवणी,
आणि कित्ती पिढ्यांच्या आठवणी आजही माझ्या
मनामध्ये तश्याच्या तश्या ताज्या आहेत. गेल्या कित्तेक वर्षांपासुन साजरी होणारी
दिवाळी म्हणजे तर खरोखरच मोठ्ठा सण असायचा. साठ-सत्तर घरांवर जेव्हा आकाशदिवे लागत
तेव्हाचे दृश्य मी आजही विसरू शकत नाही.
पेशव्यांच्या काळात बांधलो
गेलो तेंव्हाचा माझा थाट.. अहाहा.. काय सांगावं. चंदनाची लाकडं, काचेची मोठ्ठाल्ली झुंबर, खिडक्यांवर वा़ऱयाच्या झुळकीने हलणारे मलमली
पडदे, रात्रीच्या अंधारात
असंख्य पणत्या आणि मेणबत्यांच्या प्रकाशाने उजळुन निघालेले ते अंतरंगाची बात काही
औरच होती. पण आज? परिस्थिती आज
पडतो का उद्या अशीच आहे. गळकी छपरे, कुजलेल्या, फुगलेल्या भिंती,
फरशा तुटलेल्या अशा अवस्थेतील अनेक भाऊबंद
पेठांमध्ये दिसुन येतात. वाड्याचे मालकही आजकाल वाड्याच्या डागडुजीवर पैसा खर्च
करायला तयार नाहीत. उलट वाडा पाडून नवी इमारत उभारली तर त्यातून मिळणाऱ्या
पैश्याचे आकर्षणच सर्वांना आहे. शिवाय सुमारे ५० ते १०० वर्षांपूवीर् बांधलेल्या
वाड्यांचे आयुष्यही आता संपत आले आहे. काही वाड्यांवर कितीही पैसा ओतला तरी
त्यांचे जतन अवघड आहे. त्यामुळे जीवितहानी वाचवायची असेल आणि भाडेकरूंनी चांगल्या
परिस्थिती रहावे, असे वाट असेल तर
लवकरात लवकर वाडे पाडणे हेच त्यावर उत्तर आहे असेच आजच्या तरूण पिढीचे मत पडत आहे.
पुढील पिढीला ही संस्कृती
समजावी, यासाठी काही वाडे जतन
करणे आवश्यक होते. पण त्याला आता उशीर झाला आहे. उत्तरेत अनेक हवेल्या उत्तम
रीतीने जतन करण्यात आल्या आहेत. आपल्याकडे मात्र या सांस्कृतिक ठेव्याची उपेक्षाच
झाली. सामान्यांचेच नव्हे; तर पेशवे काळातील
अनेक सरदारांचे सात-सात चौकी देखणे वाडेही दुर्लक्ष केल्याने पडले आहेत.
पुर्वीच्या काळी जेंव्हा आम्ही बांधलो गेलो तेंव्हाचे बांधकाम माती आणि लाकडाचे
होते. तेव्हा जागा मुबलक होती. पैसा होता आणि लोकसंख्या कमी होती. नंतर मात्र
चित्र पालटले. भाडेकरूंची भाडी तेवढीच राहिली आणि देखभालीचा खर्च वाढत गेला. लाकूड
आणि मातीच्या बांधकामामुळे एका वाड्याच्या डागडुजीचा खर्च आता लाखात गेला आहे.
काळाच्या ओघात
लोकांच्या वर्तनातही फरक पडला. षटकोनी कुटूंबाचे चौकोनी आणि आता त्रिकोणी कुटुंब
होत आहे. जमान्याचा वेग वाढला आणि सर्व जण आप-आपल्या व्यापात मन्ग झाली. लोकांना
आपली प्रायव्हसी जास्त महत्वाची वाटु लागली आणि यामुळेच वाड्यात रहाणारा भाडेकरु
बाहेर पडुन फ्लॅट्स मध्ये विसावला. एकेकाळी सर्वांच्या जिव्हाळ्याचा, एकात्मतेचा, ऐश्वर्याचा प्रतिक समजला जाणारा वाडा वाहत्या काळात ‘आऊटडेटेड’ झाला.
धोकादायक वाड्यांसाठी नवीन
योजना राबवण्याचा विचार पालिका करतेच आहे. पण त्याचबरोबर जे वाडे आणखी ५० वषेर्
टिकू शकतात, त्यांचे योग्य
जतन करण्यासाठीही पालिकेनेच पुढाकार घेतला तर हा ऐतिहासिक ठेवा निश्चितच आकर्षण
ठरू शकेल.
वाड्याच्या त्या
परिपक्व विचाराने माझ्या मनावर फार मोठा परीणाम केला. एकीकडे त्याला आपल्या
पडण्याचे नष्ट होण्याचे दुःख होते, तर दुसरीकडे
त्याला त्या मागची कारणं सुध्दा माहीती होती आणि तो चक्क त्याचे समर्थनच करत होता.
हे करत असतानाच त्याला दुर्दम्य आशावादही होता की निदान जे वाडे अजुन काही वर्ष
आपली मुळे रोवुन राहु शकतात त्याबद्दल हा बदलता मानव नक्कीच काळजी घेईल.
आई-वडीलांची हाक ऐकुन मी
बाहेर पडलो. कडेच्या मोकळ्या पटांगणात जेसीबी सारखी मोठ्ठी यंत्र येऊन थांबली होती,
आज नाही तर उद्या असंख्य वर्षांची, असंख्य पिढ्यांची, इतिहासाच्या आठवणी मनामध्ये साठवलेल्या त्या वाड्यावर पहिला
वार करण्यासाठी.
0 Comments