आदर्श गाव
Aadarsh Gaon
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेले कार्य आणि मांडलेली भूमिका एकविसाव्या शतकातही तितकीच उपयोगी आहे. आदर्श ग्रामनिर्माण योजना हा आजच्या युगाचा
महत्त्वाचा प्रश्न आहे. एकेकाळी यज्ञाला जे महत्त्व होते
ते महत्त्व आजच्या काळी या योजनेला आहे.
आपल्या प्रत्येक गावाला आज फार पुढे
जावयाचे आहे. राज्याचे किंवा राष्ट्राचे केंद्र दिल्ली नसून आपले प्रत्येक गाव आहे. आपण आपले गाव आदर्श करू तरच राष्ट्र सुखी, समृद्ध, सामर्थ्यवान व उन्नत होईल.
गावा-गावातून आपण सुरू केलेले कार्य पाहण्यासाठी दिल्लीचे थोर-थोर नेते येत आहेत. येत राहतील. अनेक पुढारी मला आपल्या छोटय़ा-छोटय़ा खेडय़ातील कार्यासंबंधी मोठय़ा आस्थेने विचारीत असतात. अशी चिमुकली गावे आदर्श झालेली पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. पूज्य महात्मा गांधीजी किंबहुना आपल्या सर्वच संतमहात्म्यांची इच्छादेखील हीच होती.
पुढार्यांनी आमच्या गावाला भेट द्यावी हे भूषणावहच आहे,
पण केवळ त्यासाठी आपले काम होता उपयोगी नाही. नाहीतर त्यात तकलादूपणा-दिखाऊपणा येईल. आपल्याला कार्याची धुंदी चढली पाहिजे, आत्मसंतोषासाठी कार्य करता आले पाहिजे. भक्त पुंडलिकाने आईबापाची सेवा एकनिष्ठेने केली. त्यावेळी देव वैकुंठातून त्याचेकडे आले नि म्हणाले, पुंडलिका,
मी प्रसन्न झालो आहे, माझे दर्शन घे. पुंडलिकाने म्हटले – देवा! ज्या आईबापाच्या सेवेमुळे तुम्हाला येथे यावे लागले ती सेवा तुम्हा
देवापेक्षाही श्रेष्ठ आहे, ती मी कशी
सोडू? अखेर आपली सेवा चालू ठेवूनच त्याने वीट फेकली आणि तिचेवर विठ्ठलाला तिष्ठत उभे राहणे भाग पाडले.
भक्त गोर्या कुंभाराने मडकी घडवून समाजाची सेवा केली. त्यात त्याची तन्मयता इतकी झाली होती, की स्वतःचे मूल
मातीत तुडवले गेले तरी त्याला भान नव्हते. मडके घडविण्यात त्याने कधीतरी बेईमानी किंवा चुकारपणा केला काय? या तन्मयतेने नि
इमानदारीनेच त्याची भक्ती योगी-तपी लोकांहूनही श्रेष्ठ ठरली. गावचे काम अशाच वृत्तीने आपण केले तर तीच खरी
भक्ती ठरेल! कामातच नाम घेता येईल! किंबहुना देवाचे नाम घेण्यापेक्षाही देवाचे असे काम करणेच मी अधिक श्रेष्ठ
समजतो.
ग्राम आदर्श करताना श्रमदान, समयदान इत्यादी गोष्टींची अत्यंत गरज भासते, शोषकखड्डे, धान्यभांडार इत्यादी व्यवस्थाकार्ये त्यात करावी लागतात. ग्रामपंचायत नसताही लोकांनी मनात आणले तर सर्व सोयी
ते करू शकतात. ग्रामपंचायत सत्तेने सुधारणा करून घेईल तर सेवामंडळ प्रेमाने
समजावून करायला लावील. आपण गावाच्या सुधारणेकडे दुर्लक्ष करतो, सार्वजनिक कामांकडे कानाडोळा करतो, अशा वेळी सरकारला ग्रामपंचायत स्थापन करावी लागते आणि मग तुमचाच पैसा
सक्तीने वसूल करून गावाच्या सुधारणेस लावला जातो त्यासाठी पैशाचे जागी दोन पैसे खर्च होतात, शिवाय गावात कलह माजतात. सेवाप्रेम व सहकार्याने स्वयंप्रेरणेने
केलेले काम टिकाऊ होते, तसे सत्तेने होत नाही. प्रेमाने लोकात परिवर्तन घडवून आणण्यासाठी पूज्य विनोबांची ग्रामदानाची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. गावाच्या उन्नतीसाठी सर्वांनी कटिबद्ध होणे याचेच नाव आहे ग्रामदान!
आपण सर्वच याकडे वळलो आहोत. आपणाला बसण्या-उठण्यापासून ते प्रत्येक काम
व्यवस्थित करण्याकडे लक्ष पुरवायचे आहे. गावाच्या उद्धारातच आमचा खरा उद्धार आहे याची जाणीव आपणाला होऊ लागली आहे. त्यासाठी रस्ते, घरे, गोठे व उकिरडे दुरुस्त
करणे तर आवश्यकच आहेत,
पण माणसेही दुरुस्त करावयाची आहेत. आळशी, व्यसनी, बेकार व गुंडप्रवृत्तीचे कोणीही असता
उपयोगी नाही. त्याप्रमाणेच जातीपातीचेही उच्चाटन करून आपण सर्व एक आहोत, एकाच
कुटुंबातील आहोत ही जाणीव होऊन
एकोप्याने सर्वांनी वागले पाहिजे. गरीब-अमीर, अडाणी-पंडित, उच-नीच असले
भेद शक्य तितक्या त्वरेने नष्ट व्हायला पाहिजेत.
अस्पृश्यता व विषमता हा
हिंदुधर्मावरील कलंकच नव्हे तर हे मेठे
संकट आहे. जगात ख्रिस्तीधर्म, इस्लामधर्म व बौद्धधर्म यांची
लोकसंख्या क्रमाने एकापेक्षा एक कमी आहे.
त्या सर्वाहून कमी हिंदुधर्मियांची लोकसंख्या आहे. त्याची तत्त्व फार उच्च व व्यापक आहेत,
पण रुढय़ांनी खूपच गोंधळ घातला आहे. ही शुद्ध तत्त्वे
व्यवस्थितपणे अजून व्यवहारात न आणली गेली
तर पुढे या थोर धर्माचे
काहीच मूल्य उरणार नाही. यासाठी आम्हाला मानवतेच्या दृष्टिकोनातून धर्ममय जीवन करणे अत्यंत जरुरीचे आहे. अमानुष व निरर्थक रुढय़ांना
मूठमाती द्यावयाची आहे. जातीने उच्च म्हणविणारा पण कामात आळशी,
अशाला सामान्य सेवक समजून काम देणे आणि कुळाने हलका मानला गेलेला पण गुणांनी थोर,
अशा व्यक्तीला प्राधान्य देणे आज आवश्यक आहे.
द्वेषमत्सर कोणाचाही नको. सहकारिता, सद्भावना, सद्गुण, सत्प्रेम यांचे पवित्र वातावरण गावभर निर्माण करून गावाला एक आदर्श कुटुंब
बनविणे हेच महान पुण्यकार्य आहे, हाच खरा धर्म आहे! अशा धर्माने रसरसलेले छोटे-मोठे आदर्श गाव पाहून कोणाच्याही हृदयात नवचैतन्य निर्माण होईल, असे कार्य आपण आपापल्या गावी करू शकलो तर तीर्थोतिर्थी जाण्याऐवजी
लोक आपल्या गावाचे दर्शन घ्यायला वारंवार उत्सुकतेने येतील. श्रीगुरुदेव आपणास ही प्रेरणा व
शक्ती देवो, हीच प्रार्थना!
प्रामाणिकतेने करणे काम।हेचि आमुचे ईश्वरनाम।सर्व जीवमात्रासी ऐक्यप्रेम।धर्म हा आमुचा।।
0 Comments