माझा आवडता पक्षी 
My Favourite Bird


                तसा आवडता पक्षी म्हटलं कि शक्यतो खूप लोकांना पोपट आवडतो. पोपट आपल्या बोलण्याची नक्कल करतो, आपली करमणूक करतो. पण मला पोपट पाळायला आजिबात आवडत नाही, कारण तो बिचारा आपले पूर्ण आयुष्य एका छोट्याश्या पिंजऱ्यात काढतो. मला ही क्रूरता वाटते. मला पक्षी आवडतात, पण मला त्यांना कैद करून ठेवायचे नाही. ते पक्षी मुक्त असावे, पण आपल्या जवळही असावेत अशी माझी इच्छा होती.

               वाचन माझा आवडता छंद आहे, मी लगेचच या विषयावर माहिती जमा करायला सुरुवात केली. माझ्या लक्षात आले कि चिमणी हा असा पक्षी आहे, जो मानवाच्या सानिध्यात राहू शकतो, आणि त्याला पिंजऱ्यात डांबण्याची गरज ही नाही. मी एक लाकडी घरटे बाजारातून विकत आणले आणि घराच्या बाल्कनी/ वरांड्यामध्ये लावले. काही दिवसांनी तिथे एक चिमणा-चिमणीचे जोडपे राहायला आले. लगेचच त्यांनी सुके गावात, पिसे, कापूस, मऊ लाकडाचे तुकडे, कागद आदी आणून आपले घरटे बनवायला सुरुवात केली. माझ्या मोठ्या भावाने ही सर्व प्रक्रिया छायाचित्रांत टिपली आहे.

                 काही महिन्यानंतर त्यांना - छोटी छोटी पिल्ले झाली. मी त्यांच्या संरक्षणासाठी एक जाळीचे कापड त्यांच्या घरट्याखाली लावले, जेणे करून ते चिमुकले पक्षी खाली फरशीवर पडू नये. काही दिवसांनी तिथे आणखी चिमण्या येऊ लागल्या. बाल्कनी मधल्या झाडांमध्ये त्या खेळत असत. मी आणखी एक लाकडी घरटे तिथे लावले, आणि तिथे ही एक चिमणा-चिमणीचे जोडपे राहायला आले. त्यांना ही पिल्ले झाली.

                  आता रोज सकाळी च्य चिमण्यांच्या चिवचिवाटानेच माझी सकाळ होते. उठल्यावर माझे काम असते, एक चहाचा कप घेऊन मी बाल्कनी मध्ये बसतो आणि त्यांना धान्य आदी खायला टाकतो. त्या चिमण्या, त्यांची पिल्ले आपल्या छोट्याश्या चोचिन्नी ते टिपतात आणि घरट्यात नेऊन ठेवतात. त्यांचे पोट भरून झाले कि त्या सर्व माझ्या बाजूला घिरट्या घालत बसतात, जणू काही मला खेळायला बोलावत आहेत. मला हा अनुभव खूप आवडतो, मी त्या पक्षांचा मालक होता मित्र झाल्यासारखेच वाटते. त्या चिमण्या कुठल्याही पिंजऱ्यात कैद नाही तरीही त्या आपली घरट्यात स्वतःहून येतात. माझ्या दिवसाची सुरवात अश्या सुन्दर अनुभवाने होते.

                  विविध पक्षी किंवा प्राणी पाळणे हा एक चांगला विरंगुळा होऊ शकतो, पण आपली विरंगुळ्यासाठी त्या मुक्या पक्षांना , प्राण्यांना पिंजऱ्यात, घरात कैद करणे मला बरोबर वाटत नाही. जर आपणास असे कोणी केले तर आपणास कसे वाटेल?