माझा आवडता सण दिवाळी 
My Favourite Festival Diwali

               अश्विन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी हा सण असतो. दिवाळीला दीपावली असेही म्हणतात. दीपावलीच्यावेळी अनेक दिव्यांची किंवा दीपांची झगमगाट आणि लख्ख असा प्रकाश सगळीकडेच पाहायला मिळतो. त्याचबरोबर सगळीकडे रंगबेरंगी फटाके आणि सर्वांच्या घरोघरी विद्युत रोषणाई,आकाशकंदील पाहायला मिळतात. त्यामुळेच तर या सणाला दीपावली असे म्हणतात. दिवाळी हा सण जवळपास तीन हजार वर्षे जुना आहे. या सणाची सुरुवात फार प्राचीन काळापासून झाली आहे. असे पुर्वजांना आढळले आहे. परंतु काहीलोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून श्री प्रभू रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले त्यादिवशी दिवाळी हा सण साजरा करतात. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा करतात. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या मध्यभागी एका वेगळ्याच आनंदात हा सण येतो. यावेळी शेतकरीसुद्धा सुखावलेले असतात कारण त्यांच्या हाती नवीन पिके आलेली असतात.  त्यामुळे शेतकरी पण मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. दिवाळीच्या वेळेस लक्षमीपूजनाच्या दिवशी शेताची आणि शेतीच्या अवजारांची ते पूजा करतात. गुरांचीसुद्धा पूजा करतात आणि त्यांना गोड पदार्थ खाऊ घालतात. या सणाला आपल्या भारतात बहुतांश सर्वांनाच सुट्टी असते.

                 सहामाही परीक्षा झाल्यानंतर आम्हाला दिवाळीची सुट्टी असते. परीक्षेच्याआधी जेव्हा शिपाईकाका वेळापत्रक आणतात तेव्हा आम्ही सर्वच मित्र-मैत्रिणी परीक्षेचे वेळापत्रक पाहताना परीक्षा कधी आहे हे पाहण्याआधी दिवाळीची सुट्टी कधी आहे हे पाहतो.  सहामाही परीक्षा झाल्यांनतर मोठ्या उत्साहाने आम्ही सर्वजण दिवाळीच्या तयारीला लागतो. मी घरातील साफसफाई करण्यात आईला मदत करते. त्यानंतर दिवाळीच्या - दिवस अगोदर सर्व फराळ बनवण्यास मदत करते. आम्ही दोघी मिळून सर्व फराळ बनवतो कारण सर्व नातेवाइकांना फराळ द्यायचा असतो. तसेच दिवाळीच्या अगोदर आम्ही आमच्या सोसायटीच्या परिसरात सर्व मित्र-मैत्रिणी मिळून किल्ला बनवतो. आम्ही दरवर्षी शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती तयार करतो. त्या किल्ल्यावर आम्ही धान्यसुद्धा पेरतो त्यामुळे दिवाळीपर्यंत किल्ला खूप मस्त दिसतो कारण पूर्ण गावात उगवलेले असते.  किल्ल्यावर आम्ही वेगवेगळी चित्रे मांडतो. त्यामध्ये शिवाजी महाराजांसाठी आसन तयार करतो त्यावर दरवर्षी शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती ठेवतो. किल्ल्याच्या आजूबाजूला गुहा,विहीर तयार करतो. किल्ल्याचे दरवाजे आणि तटरक्षक भिंती तयार करतो. खूप मजा येते किल्ला बनविताना. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी आम्ही भाऊ-बहिणी सकाळी लवकर उठतो. दररोज आई आम्हाला सर्वांना उटणे लावून अंघोळ घालते. नंतर दिवाळीसाठी घेतलेले नवीन कपडे घालून आम्ही फटाके उडविण्यासाठी जातो. सर्व मित्र-मैत्रिणी नवीन नवीन कपडे घालून मस्त आवरून आलेले असतात आम्ही खूप धमाल मस्ती करतो आणि सायंकाळीसुद्धा आम्ही खूप फटाके वाजवतो. त्यानंतर सायंकाळी एकत्र बसून आम्ही फराळाचा आस्वाद घेतो.

                  दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. वसुबारसेला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. आपल्या भारताची संस्कृती ही कृषिप्रधान असल्यामुळे या दिवसाचे महत्व फार विशेष आहे. वसुबारसपासूनच सर्वांच्या घरोघरी दारामध्ये दिवे लावले जातात तसेच विद्युत रोषणाई केली जाते. या दिवशी गाईची तिच्या पाडसासह पूजा केली जाते. ज्यांच्याकडे घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी यादिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करतात. घरातील सुवासिनी बायका या दिवशी गाईच्या पायावर पाणी घालतात त्यानंतर गाईची पूजा करतात गाईंना हार घालतात. त्यानंतर गाय आणि वासरू दोघानांही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. ह्या दिवशी बऱ्याच स्त्रियांचा उपवास असतो. आपल्या मुलांना आणि घरातील सर्वांना चांगले आरोग्य लाभावे आणि सुख-समाधान लाभावे म्हणून ही पूजा करतात. वसुबारसेच्या दिवशी गाईला बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी याचासुद्धा नैवेद्य दाखवतात. मी माझ्या आईसोबत गाईची पूजा करण्यासाठी जाते. आम्ही गाईची पूजा करतो तिला बाजरीची भाकरी आणि गवारीच्या भाजीचा नैवेद्य दाखवतो. या दिवसापासूनच मी दारात रांगोळी काढण्यास सुरुवात करते. दिवाळीचे सर्व दिवस आम्ही दारात रांगोळी काढतो. 

                   दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची पूजा करतात. या दिवशी धने आणि गुळाच्या प्रसादाला खूप महत्व आहे. या दिवशी पूजेसाठी घरातील धन,दागिने आणि धने अशा वस्तू पूजेसाठी ठेवल्या जातात. त्यानंतर येते ती नरकचतुर्दशी या दिवशी सर्व लहान मुले लवकर उठून सुगंधी उटण्याने अंघोळ करून नवीन कपडे घालतात आणि सर्वजण मिळून फटाके वाजवतात. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा आहे. श्रीकृष्णांनी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदीखान्यातल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस दुष्ट नरकासुराचा वध करून आनंद साजरा करण्याचा. या दिवशी भारतात अनेक ठिकाणी नरकासुराचा पुतळा जाळतात,फटाकेसुद्धा वाजवतात आणि उत्साह साजरा करतात. नरकचतुर्दशीनंतर येते ते लक्ष्मीपूजन यादिवशी आम्ही घरी पुरणपोळी बनवतो. देवाला पुरणपोळीचा आणि फराळाचा नैवेद्य दाखवतो. यादिवशी आरोग्यलक्ष्मी(केरसुणी) हिची पूजा खूप महत्वाची असते. तसेच यादिवशी पूजेमध्ये लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती,दागिने,सोने-नाणे,पैसे,धने अशा सर्व वस्तू पूजेमध्ये ठेवतात. देवीची पूजा आई मनोभावे मांडते आणि तिची पूजा करते. ११ किंवा २१ पणत्या एका ताटामध्ये लावून देवीसमोर ठेवते. मग आम्ही सर्वजण मिळून पूजा आरती करतो. मनोभावे नमस्कार करतो. मग मी देवीला पुरणपोळी आणि फराळाचा नैवेद्य दाखवते. मग आम्ही पूजा झाल्यानंतर सर्व मित्र-मैत्रिणी मिळून खूप फटाके वाजवतो.

                   लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी पाडवा असतो. पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त. ह्या दिवशी अनेक नवीन प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी बरेच लोक सोने खरेदी करतात,तर कोणी नवीन घर घेत,कोणी नवीन वस्तू खरेदी करत. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला भेट म्हणून एखादी वस्तू,दागिना किंवा साडी भेट देतो. त्यानंतर येते ती भाऊबीज. भाऊबीजेचा दिवस म्हणजे बहीण-भावाच्या अतूट प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा असतो. ह्या दिवशी बहिणी आपल्या भावांसाठी दिव्यांची आरास करतात आणि मोठ्या आत्मीयतेने ओवाळून त्यांच्या समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करतात. ओवाळून झाल्यानंतर आपल्या भावाला नारळ आणि करदोरा देतात. अशी ही दिवाळी पाच दिवसांची असते. दिवाळी कधी संपते ते उत्साहाच्या भरात कळतही नाही.

                  आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनात वाढत्या प्रदूषणामुळे बरेच लोक प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करतात.तसेच शाळा आणि काही सामाजिक संस्थासुद्धा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करण्याचा संदेश देतात. आपला देश हे आपले घर किंवा आपला परिसर समजून आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. त्याचबरोबर फटाके कमी आवाजाचे वाजवले पाहिजेत आणि फटाक्यांचा वापर कमीत कमी करून दिवाळी साजरा केली पाहिजे. तरच ध्वनीप्रदूषण आणि वायुप्रदूषण रोखता येईल. आणि आपल्या सर्वांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करता येईल.