वसुबारस 

Vasubaras

                 आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात.

घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.

                ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणा-वरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.
नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात.

                  ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात.

आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.