बहिष्कृत व्यक्तीची आत्मकथा 
Bahishkrit Vyaktichi Aatmakatha 

आजचा दिवस आपल्या जीवनात कधी उजाडेल असं मला वाटलंच नव्हतं! आज या गावाचा सरपंच म्हणून माझी एकमताने निवड झाली. केवढा मोठा हा विश्वास गावकऱ्यांनी माझ्यावर टाकला आहे! आज मी साठीच्या उंबरठ्यावर आहे. चाळीस वर्षांपूर्वीचा गाव आजही माझ्या नजरेसमोर स्पष्ट दिसत आहे. पण गावाने त्यावेळी मला दिलेली कटू वागणूक मात्र मी आता पूर्णपणे विसरून गेलो आहे.

 

"त्यासाठी मी माझ्या गावकऱ्यांना दोष देणार नाही. तो काळच तसा विचित्र होता. थांबा! मी तुम्हांला माझी कर्मकहाणीच सांगतो. मी या गावातील एक श्रीमंत जमीनदार घराण्यात जन्मलो. समाजातील श्रेष्ठ वर्ग म्हणून स्वतःला गौरवून घेणाऱ्या जातीत जन्मल्यामुळे मला उच्च शिक्षण मिळाले. शहरात शिकत असताना माझी मैत्री झाली, ती समाजाने अस्पृश्य मानलेल्या वर्गातील एका दोस्ताशी. त्यामुळे त्या वर्गातील अभागी लोकांच्या जवळ मी जाऊ शकलो, त्यांची दुःखे जाणू शकलो. आणि शिक्षण पूर्ण करून परत आलो ते निश्चित ध्येय ठरवूनच.


"मी गावातील अस्पृश्य वस्तीत काम करू लागलो. तेथे जाऊ-येऊ लागलो. त्यांच्याबरोबर जेवु लागलो. हे माझ्या घरातील, माझ्या जातीतील लोकांना कसे रुचणार? त्यांनी मला साम, . दाम, दंड सर्व मार्गांनी वळविण्याचा यत्न केला. पण मी एकच जात मानत होतो, ती म्हणजे 'मानव जात.' शेवटी माझ्या घराची दारे मला बंद झाली. माझ्याबरोबर काम करणाऱ्या त्या मागासवर्गातील एक मुलगीच मी माझी सहधर्मचारिणी म्हणून निवडली. त्यामुळे गावानेही मला बहिष्कृत केले.

 

"त्या काळातील माझे जीवन ही माझी कसोटीच होती. आगीत उजळून निघणाऱ्या सोन्याचे अग्निदिव्य मी अनुभवीत होतो. घर ना दार, खाली जमीन वर आकाश. खिशात फारसे पैसे नसत. जवळ एकच गोष्ट होती 'दुर्दम्य आशावाद' आणि सतत साथ देणारी पत्नी व दोन-चार सच्चे दोस्त. न कंटाळता सर्व छळ सहन करीत मी माझे कार्य करीत राहिलो. वर्षा हीन जीवन जगणाऱ्या या माणसांच्यातील माणूस जागा करण्याचा यत्न केला. हळूहळू यश येत होते. गावकुसाबाहेरच्या त्या माणसांनीही जेव्हा काही भरीव कामगिरी केली, तेव्हा गावाचे लक्षही गावकुसाबाहेरील त्या लोकांकडे जाऊ लागले. निवडणूक न होता आज जेव्हा माझी सरपंच म्हणून निवड झाली, तेव्हा मनात आले, याच गावाने मला बहिष्कृत केले होते ना! नाही, गाव माझी कसोटी घेत होता, हेच खरे!"