भग्न देवलायचे मनोगत 
Bhagna Devalayace Manogat


सुट्टी लागली म्हणून आम्ही काही मित्र आमच्या एका मित्राच्या गावी गेलो. शहरापासून दूर अशा त्या शांत गावात आम्हांला खूपच बरे वाटत होते. मोकळ्या वातावरणात दूरदूर फिरताना एक आगळा आनंद मिळत होता. अशाच भटकंतीत एका गर्द वनराईत एक देऊळ आढळले. कुतुहलाने देवळात शिरलो आणि मन विषण्ण झाले. कारण ते देऊळ भंगलेले होते. केवळ देवळाचीच पडझड झालेली नव्हती, तर आतील मूर्तीही भग्न झाली होती. हे कोणातरी मूर्तिभंजकाचे काम असावे, हे सहज लक्षात येत होते. माझ्याबरोबरचे सर्वच मित्र खिन्न झाले. हे कोणाचे कृत्य असावे बरे? सारेजण विचारात पडले. तेवढ्यात एक गंभीर आवाज निनादला.

"ऐका युवकांनो, तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देते. मी कोण? तुमची श्रद्धा असलेला 'राम' हा देव आहे ना, त्याची मी प्रतिमा. खूप वर्षांपूर्वी एका भाविकाने माझी येथे प्रतिष्ठापना केली. मोठ्या भाविकतेने त्याने राजस्थानातून मला येथे आणले. दूरवरून कारागीर आणून हे सुंदर मंदिर उभारले. सभोवताली गर्द वनराजी लावली. गावातील लोक भक्तिभावाने माझी पूजा करीत. सर्व मंडळी गुण्यागोविंदाने नांदत होती तोवर मी वैभवात होते. धर्म, जात, पंथ येथे आड येत नव्हते. सर्व माणसे देवाला सारखीच, तसा सर्वांचा ईश्वरही एकच. केवढी थोर भावना.

“गावात कुणी बाहेरचे लोक येऊ लागले. त्यांच्याबरोबर अनेक नवे विचार गावात येत गेले, कुरबूरी सुरू झाल्या. भांडणे होऊ लागली, ती वाढली आणि विकोपाला गेली. माझा धर्म इतरांच्या धर्मापेक्षा श्रेष्ठ असे प्रत्येकाला वाटू लागले. मग कुणी वेड्यापीराने माझी अशी दुर्दशा केली. येथे रणकंदन माजले. अनेकांचे बळी पडले आणि या मंदिराचीही मोडतोड झाली. तेव्हापासून लोक येथे फिरकत नाहीत. तुम्ही येथे आलात म्हणून मी मन मोकळे केले.