मी चहा बोलतोय 
Mi caha bolatoya


प्रवास अगदी कंटाळवाणा झाला होता. केव्हा एखादे स्टेशन येते आणि आपण कपभर चहा घेतो असं मला झाले होते. वेळ होती मध्यरात्रीची. बाकीचे प्रवासी शांतपणे झोपले होते. गाडीचा वेग मंदावला, स्टेशन आले. पण माझी मनीषा काही पूर्ण झाली नाही, कारण चहावालाही शांत झोपला होता. अस्सा राग आला तेव्हा त्याचा.

गाडी पुढे निघाली आणि काय चमत्कार! एक वाफाळलेला चहाचा कप माझ्यापुढे आला, मी कप उचलणार तेवढ्यात आवाज आला, “मी चहा आहे. तू माझी आठवण काढलीस ना, म्हणून मुद्दाम आलो. अरे, मी तुझ्या देशातीलच आहे आणि आता सर्वांच्या इतक्या परिचयाचा झालो आहे की काही वेळेला ‘अतिपरिचयात् अवज्ञा' असाही अनुभव येतो.

“माझे पूर्वज मूळचे चीनमधील. चीन या देशानेच साऱ्या जगाला माझी देणगी दिली आहे. खरं पाहता आपल्या भारतात आसाममध्येही माझे पूर्वज फार पूर्वीपासून अस्तित्वात होते. पण कोणाचे त्यांच्याकडे विशेष लक्ष नव्हते. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भारतात माझा खरा विकास साधला. आज भारताला मी आणि माझे बांधव बरेच परकीय चलन मिळवून देतो."

"खरं सांगू का, मला माझा विशेष अभिमान वाटतो तो वेगळ्या गोष्टीसाठी. आज या भारतात एवढी विषमता आहे. गरीब-श्रीमंत हा केवढा भेदभाव आहे; पण माझ्याजवळ असा कोणताच फरक नाही. आलिशान बंगल्यात माझे जेवढे अगत्याने स्वागत होते तेवढीच एखादया झोपडपट्टीत माझी चहा केली जाते. एखादया विद्वान साहित्यिकाला, संशोधकाला माझी जेवढी गरज असते तेवढीच यंत्रावर काम करणाऱ्या कामगारालाही माझी आवश्यकता असते. सर्वांना स्फूर्ती देणारे, प्रेरणा देणारे असे उत्तेजक पेय माझ्यापासून तयार करता येते.

“मळ्यातल्या छोट्या छोट्या झुडपांवर माझा जन्म होतो. आसाममधील ब्रह्मपुत्रेचे खोरे हिमालयाच्या पायथ्यावर दुआर व तराई हा डोंगराळ भाग, दार्जिलिंग, रांची, डेहराडून खोरे, कांगा खोरे अशा भारतातील विविध भागांत मी व माझे भाईबंद जन्माला येतो. आमची खुडणी भारतात हातांनीच केली जाते. खुडणी करणाऱ्या स्त्रियांच्या पाठीवर पिशवी असते, त्यांत त्या आमची पाने टाकतात. तेथन आमची पाठवणी कारखान्यात होते, तेथे यंत्राच्या साहाय्याने वळविणे, वाळविणे वगैरे क्रिया होतात आणि मग खास प्लायवूडच्या पेट्यांतून आमची देशोदेशी रवानगी होते."

“मित्रा, साखर, दूध व पाणी यांच्या संयोगाने तुम्ही आमचा आस्वाद घेता. काही. देशात दुधाचा वापर न करता लिंबू, लोणी यांचा उपयोग करतात. काही लोक आमच्यावर टीका करताना 'टॅनिनचा' गाजावाजा करतात; पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. फार उकळविल्याने टॅनिन पेयात उतरते त्यात आमची काय चूक ? उलट चहा हे शरीराला हितकारक व उत्साहवर्धक पेय आहे.

 

आवाज थांबला, पण माझा कंटाळा आणि आलेली मरगळ केव्हाच संपली होती. गाडी कुठल्यातरी स्टेशनात थांबली आणि एक चहावाला न बोलावताच माझ्यासमोर चहा घेऊन उभा ठाकला होता!