महाराष्ट्र 
Maharashtra 

मी मराठी ! माझा महाराष्ट्र !' ही माझी प्रिय व अभिमानाची स्थाने आहेत आणि त्यामुळे मी कुठेही असलो तरी माझ्या महाराष्ट्राला मी विसरू शकत नाही. हीच प्रत्येक मराठी माणसाची स्थिती असते. म्हणूनच आज जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी - अगदी अमेरिका, ऑस्ट्रेलियातही मराठी मंडळींची संमेलने साजरी होतात. मला खात्री आहे की, जेव्हा केव्हा चंद्रावर आणि मंगळावर माणसे वस्ती करू लागतील, तेव्हा तेथेही मराठी माणसे आपली संमेलने साजरी करतील !

 

माझा महाराष्ट्र भारताच्या मध्यभागी आहे. भारतातील इतर काही राज्ये महाराष्ट्रापेक्षा आकाराने मोठी आहेत. पण महाराष्ट्र मोठा – 'महा' - ठरला तो त्याच्या गुणांमुळेच. महाराष्ट्राला प्रत्येक बाबतीत परंपरा आहे. महाराष्ट्राला कोकण किनारपट्टी आहे. तसाच सह्याद्रीचा कणखर कणा आहे. म्हणून तर कवी गोविंदाग्रज माझ्या महाराष्ट्राला 'दगडांचा देश, कणखर देश' असे गौरवतात. भारतातील इतर राज्यांइतकी सुपीक जमीन लाभली नसली, तरी येथील कष्टाळू शेतकऱ्यांनी मराठी माणसाला अन्न कधीही कमी पडू दिले नाही. 

सतत कष्ट करत राहणाऱ्या या मराठी माणसांच्या गरजाही फार मर्यादित आहेत. त्यामुळे मिळेल ती चटणी-भाकरी खाऊनही खूश राहणारा हा मराठी माणूस आलेल्या अतिथीला आपल्यातील भाकरी मोडून देतो. त्यामुळे महाराष्ट्रात चारी बाजूंनी इतर राज्यांतील माणसे आली आणि ती महाराष्ट्राचीच झाली. आता महाराष्ट्रात राहणारा आणि मराठी बोलणारा प्रत्येकजण 'महाराष्ट्रीय' मानला जातो. म्हणून तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आज संपूर्ण भारताचे प्रतीक झाली आहे.

महाराष्ट्रात गंगा, ब्रह्मपुत्रेसारख्या प्रचंड नद्या नसल्या तरी गोदा, भीमा, कृष्णा, कोयना आणि इतर अनेक नदयांनी महाराष्ट्र सदैव सुफलित केली. महाराष्ट्राला कोणतीही गोष्ट अगदी सहजगत्या प्राप्त झालेली नाही. १ मे १९६० ला 'महाराष्ट्र राज्य ' साकार झाले, पण त्यासाठी महाराष्ट्राला फार मोठा लढा दयावा लागला. त्यानंतर 'कोयने 'च्या व लातूरच्या भूकंपांनी महाराष्ट्राला मोठे हादरे दिले. पण अशा सर्व संकटांना महाराष्ट्राने खंबीरपणे तोंड दिले. प्रत्येक संकटांवर मात करत महाराष्ट्र अधिकाधिक पुढे गेला.

महाराष्ट्र ही तर नररत्नांची खाण आहे. श्री शिवरायांनी 'स्वराज्याची' कल्पना महाराष्ट्रात रुजवली. पराक्रमात महाराष्ट्र केव्हाही मागे पडला नाही. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आपली कामगिरी पार पाडली. सामाजिक क्षेत्रात तर महाराष्ट्रात महात्मा फुले, महर्षी कर्वे, डॉ. आंबेडकर यांनी एवढी महान कामगिरी पार पाडली आहे की, भारतातील इतर राज्यांपेक्षा मराठी समाज सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुरोगामी राहिला आहे. महाराष्ट्राला संतांची व साहित्यिकांची फार मोठी परंपरा लाभली आहे.

 

कला व इतर क्षेत्रांतही महाराष्ट्र आपली कामगिरी बजावत राहिला. अजिंठा, वेरूळची लेणी आजही सर्वांचे लक्ष वेधून घेतात. एकविसाव्या शतकात आज 'सॉफ्टवेअर'च्या क्षेत्रात मराठी युवक अग्रेसर आहेत. महाराष्ट्राने आपले नाव सदैव सार्थ ठरवले आहे आणि त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही मराठी माणूस असेल तरी तो अभिमानाने मराठी मातीचा टिळा लावतो.