माझा आवड़ता कलाकार 
My Favorite Artist 


सूर्यदेव अस्ताला गेले होते. तरीपण त्यांच्या कठोर कर्तबगारीची चुणूक अजून जाणवत होती. एक सभा गेले दोन तास रंगली होती. लतादीदी रंगमंचावर उपस्थित होत्या. सभा संपत आली तेव्हा सर्वांनी दीदींना गाणे म्हणण्याचा आग्रह केला. लोकाग्रहाखातर दीदींनी सूर लावला, कोणतेही वादय साथीला नसताना 'मोगरा फुलला' हा अभंग लतादीदी गाऊ लागल्या नि वातावरणातील दाहकता अचानक लुप्त झाली. सर्वत्र प्रसन्न समाधानी वातावरण निर्माण झाले आणि याच वातावरणात सभा संपली. हे सामर्थ्य असलेल्या कलावती लता मंगेशकर आज साऱ्या विश्वात विख्यात आहेत. त्याच लतादीदी माझ्या आवडत्या कलावंत आहेत.


भारत सरकारने लतादीदींना 'भारतरत्न' हा किताब दिला, तेव्हा मनात आले की या उपाधीने त्यांचा गौरव झाला की त्यांच्यामुळे प्रत्यक्ष या उपाधीची झळाळी वाढली. लता मंगेशकर यांना आजवर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर 'स्वरभारती', 'कलाप्रवीण', 'सूर श्री', 'स्वरलता' व 'डी. लिट.' असे अनेक बहुमान प्राप्त झाले आहेत. पण या यशामागे पर्वतासारखे परिश्रम आहेत. यशाचा मार्ग हा काट्याकुट्यांतून जातो. अनेक कसोट्यांतून उतरल्यावरच सुवर्णाचे तेज झळाळते.

 आज साऱ्या  मर्यादा ओलांडून लतादीदी या कोट्यवधी जनतेच्या मनावर अधिराज्य करत आहेत. संगीताच्या क्षेत्रात त्यांचे स्थान सर्वोत्कृष्ट व सर्वमान्य आहे.  अनेक ख्यातनाम संगीतकारांची १८०० च्या वर चित्रपटांतील विविध रंगढंगांची सुमारे बावीस भाषांतील गाणी लतादीदींनी गायली असून त्यांची संख्या सुमारे पंचवीस ते तीस हजारांच्या घरात सहज जाते.


लतादीदींच्या स्वर्गीय मधुर आवाजाने असंख्य गाणी चिरंजीव झाली आहेत. मराठी माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दीदींच्या आवाजातील ओळी आपल्याला साथ देत असतात. 'आनंदघन' या नावाने त्यांनी संगीत-दिग्दर्शनही केले. त्यांनी गायलेले 'ए मेरे वतन के लोगों' हे गीत आजही भारतीयांचे डोळे ओले करते.

अगदी लहान वयात दीदींनी आपल्या बाबांबरोबर नारदाची भूमिका केली होती. 'सौभद्र', 'भावबंधन' अशा नाटकांतूनही त्यांनी कामे केली. 'गजाभाऊ' व 'पहिली मंगळागौर' अशा काही मराठी चित्रपटांतूनही छोट्या भूमिका केल्या. कारण साऱ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती.


लतादीदींच्या  सुरेल, मुलायम व परिपूर्ण अशा स्वरांनी लक्षावधी श्रोत्यांना सुरांची माधुरी व सौंदर्य प्रत्ययास आणून दिले. त्यांच्या आवाजाच्या उंच खोलीमुळे, लवचिकतेमुळे, अलौकिक फिरतीमळे चित्रपट संगीतकारांना नवनवीन प्रयोग करणे शक्य झाले. 'तीन मिनिटांच्या तबकडीतून लोकांपर्यंत संगीत पोचवण्याचे अवघड काम लताने केले,' असा त्यांचा गौरव प्रत्यक्ष कुमार गंधर्वांनी केला आहे.