माझी आजी 
My Grandmother

बाबांना 'पारितोषिक मिळाले होते आणि बाबांचा सत्कार समारंभ होता, म्हणून आजी गावाहुन आली होती. आज ती परत जायला निघाली होती. आम्ही तिला येथेच राहण्याचा खूप आग्रह करीत होतो. पण ती मुळीच तयार नव्हती. आजी म्हणाली, " अरे नंदू, माझी खुप कामे रखडली आहेत तिकडे. हे बघ यापेक्षा आता ऑक्टोबरमध्ये तुला सुट्टी लागेल ना, तेव्हा तूच तिकडे ये. अरे, तुझी मदत होईल मला." आजीने माझी समजूत घातली आणि घराबाहेर पाऊल टाकले. आम्ही पाहतच राहिलो.


आजीने वयाची पंच्याहत्तरी ओलांडली आहे; पण आजी थोडीही वाकलेली नाही. खरं सांगायचं तर गेल्या कित्येक वर्षांत आजीच्या शारीरिक ठेवणीत कोणताच बदल झालेला नाही. गेली वीस वर्षे आजीआजोबा त्या गावात राहत आहेत. चार वर्षांपूर्वी आजोबा वारले, तेव्हा वाटलं की आजी आता तरी आमच्या घरी शहरात येईल; पण उलट आजी गावातच अधिक गुंतत गेली.

माझे आजीआजोबा हे पहिल्यापासूनच आदर्शवादी. उत्कृष्ट गुणवत्ता असतानाही ते कधी पैशांच्या मागे लागले नाहीत; तर आयुष्यभर ते दोघेही कर्मवीर भाऊरावांच्या 'रयत शिक्षण' संस्थेत काम करीत राहिले. संस्थेतून निवृत्त झाल्यावर ते सासवने गावात काम करीत राहिले. सगळा 'निष्काम कर्मयोग'! काम करणाऱ्याला कामांची उणीव कधीच भासत नाही हे खरंच! - आजीआजोबांच्या भोवती सदा माणसांचा गराडा असे. आता आजोबा नाहीत. पण एकटी आजी गावाचे सगळे प्रश्न सोडवत असते. ती साऱ्या गावाची 'मोठी आई' बनली आहे.