पाणी अडवा पाणी जिरवा 
Pani Adva Pani Jirva

पाणी म्हणजे जीवन. पण शहरातील लोकांना पाण्याची किंमत कळत नाही. ते लोक पाणी जपून वापरत नाहीत. खूप पाणी वाया घालवतात. खेड्यापाड्यांतील स्त्रियांना दूर अंतरावरून पाणी वाहून आणावे लागते. त्यांचे कष्ट लक्षात घेतले पाहिजेत. उन्हाळ्यात नदया, विहिरी आटतात. त्या वेळी लहानशा वाटीने खड्ड्यातील पाणी भरणारी मुले पाहिली की, जीव तडफडतो.


पाणी ही निसर्गाची देणगी आहे. त्यामुळेच माणसाला त्याची किंमत कळत नाही. पाण्याची टंचाई ही आता जगभर निर्माण झाली आहे. कारण जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी फार खाली गेली आहे. माणसाने जंगले नष्ट केली, बांधकाम केले. त्यामुळे जमिनीत जेवढे पाणी मुरायला हवे, तेवढे मुरत नाही. म्‍हणुन पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्‍पनेवर भर दिला गेला पाहीजे.


सुदैवाने आपल्या देशात विपुल पाऊस पडतो. पण हे पाणी समुद्रात वाहून जाते. आता हे पाणी आपण जमिनीत जिरवायला हवे, साठवायला हवे. त्यासाठी तळी, बंधारे किंवा धरणे बांधली पाहिजेत. म्हणजे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. विहिरींना व नदयांना बारमहा पाणी राहील. झाडे जगतील. जंगले वाढतील. शेती चांगली होईल, माणूस सुखाने जगेल.  

पाणी हे जीवनाचे मूलतत्त्व आहे. पाण्याशिवाय जीवन ही कल्पनाच शक्य नाही. पाण्यावरच सर्व सजीवसृष्टीचे जीवन सुख समृद्धी अवलंबून आहे.  सध्या पाणी प्रश्नाबाबत जागतिक स्तरावर प्रयत्न होत आहेत. त्याचाच परिपाक म्हणजे एप्रिल महिन्यात आयोजित केले जाणारे 'जल संपत्ती दिन' या निमित्त आपल्या देशात जे साक्षरता अभियान राबविले जात आहे. 'पाणी वाचवाल तर वाचाल' हा नव्या युगाचा महामंत्र आहे.


प्रयोगशाळेत पाणी बनविता येते परंतु सर्वांची गरज पुरवेल इतके नक्कीच नाही. आज जगात पाण्यावरून संघर्ष पेटलेले दिसतात.  क्योटो इथे झालेल्या  जागतिक जलपरिषदेतील अहवालात हा इशारा देण्यात आला आहे  की या पुढील युद्धे ही पाणी वाटपाबाबत किंवा पाण्याच्या तुटवड्यावरून होतील.  आपल्या सर्वांचा प्रमुख जलस्रोत म्हणजे 'पाऊस' ज्याचे अनिश्चित आगमन, उपलब्धी प्रमाण ही समस्या सतत भेडसावत  असते.


त्यामुळे पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन ही समस्या दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत चालली आहे. पाणी, लोकसंख्या आणि जमीन यांचा त्रिकोण जमविणे आवश्यक आहे.  युनिसेफने महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यांच्या जलसर्वेक्षणाबाबत दिलेल्या अहवालात  या राज्यांना पिण्याच्या पाण्याची व उपलब्धतेची प्रमुख टंचाई भासण्याचा इशारा दिला आहे.


समस्यांचे मूळ कारण म्हणजे वाढते उद्योगीकरण, लोकसंख्येचा भस्मासुर, जंगलाची अवैध तोड यामुळे जलचक्राचे नियमन, पर्यावरणाचे संतुलन, वन्य प्राण्यांची कमी होणारी संख्‍या इ. समस्या ठळक रूपाने स्पष्ट होऊ लागल्या. पूर व दुष्काळ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.


भारताचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान व प्रचंड जीवितहानी दरवर्षी होत असते. भू-गर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा होत आहे. त्यामुळे ४०० फुटापर्यंतसुद्धा कूपनलिका कोरड्या ठणठणीत असतात. पुरोगामी महाराष्ट्रात ७५ तालुके अवर्षण प्रवणग्रस्त आहेत. दिवसेंदिवस हा आकडा फुगतच चालला आहे.