बुड घागरी 
Bud Ghagari


बुड घागरी तो टोपी घालणारा उंदिरमामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघा मित्रांनी खीर करण्याचे ठरविले. माकड म्हणाले 'मी आणतो साखर'. मांजर म्हणाले 'मी आणतो दूध'. उंदीर म्हणाला 'मी आणतो शेवया'. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले 'चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ'. इकडे मांजराच्या तोंडाला सुटले होते पाणी. 


ते अर्ध्या वाटेतूनच परत आले. त्याने सगळी खीर खाऊन टाकली. थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे ! त्यांनी मांजराला विचारले 'खीर कोणी खाल्ली?' मांजर म्हणाले, 'मला नाही माहीत.' मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले ' हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. 


मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला 'चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले ' म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी'. अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली.