दुष्‍ट कोल्‍ह्याला शिक्षा 
Dusht Kohlyala Shiksha


          एक उंट जंगलात चरण्‍यासाठी जात होता. तेथे राहणारा एक दुष्‍ट कोल्‍हा त्‍याला पाहून रोज विचार करायचा की याला कसे फसवता येईल. एकदा त्‍याने उंटाला विचारले,''काका, रोज गवत खाऊन तुम्‍हाला कंटाळा येत नाही का?'' उंट म्‍हणाला,''बेटा, माझ्या नशिबात गवत खाणेच आहे. या जंगलात दुसरे काय उगवणार?'' तेव्‍हा कोल्‍हा म्‍हणाला,'' मी तर रोज जवळच्‍याच एका शेतात जातो आणि तेथे गाजर, मुळा, काकडी, भोपळा खातो. तेथील भाज्‍या व फळे खूप रसाळ आणि ताजी असतात.'' उंटालाही अशी भाजी खावीशी वाटली व कोल्‍ह्याला त्‍याने तेथे नेण्‍यासाठी विनंती केली. 


         उंट कोल्‍ह्यासोबत शेतात गेला. कोल्‍ह्याने आधी जाऊन स्‍वत: खाऊन घेतले व उंटाला नंतर पाठविले. उंट शेतात जाताच कोल्‍ह्याने मग जोराने कोल्‍हेकुई सुरु केली. कोल्‍ह्याचा आवाज ऐकताच शेताचा मालक आणि त्‍याचे चार गडी शेतात घुसले. त्‍यांना पाहताच कोल्‍ह्याने जोरात धूम ठोकली व जंगलात पळून गेला पण बिचारा उंट पळता न आल्‍यामुळे तिथेच अडकून बसला. शेतक-याने उंटाला बेदम मारहाण केली. 


          त्‍याला मार खाताना पाहून कोल्‍ह्याला खूप आनंद झाला. या गोष्‍टीला काही दिवस गेले. कोल्‍ह्याने उंटाला परत एकदा फसवून पुन्‍हा शेतात नेले व पुन्‍हा एकदा उंटालाच मार पडला. दरवेळी आपल्‍यालाच मार पडतो ही गोष्‍ट आता उंटाच्‍या लक्षात आली व त्‍याने कोल्‍ह्याची खोड मोडण्‍याचे ठरविले. काही दिवसांनी मोठा पाऊस झाला व जंगलामध्‍ये पाणीच पाणी झाले. चिखल आणि दलदलीमधून छोट्या प्राण्‍यांना बाहेर काढण्‍याची जबाबदारी सिंहाने उंटावर सोपविली. उंटाने सगळे प्राणी बाहेर नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले मात्र जेव्‍हा कोल्‍ह्याची वेळ आली तेव्‍हा उंटाने मुद्दामच जास्‍त खोल पाण्‍यात नेऊन डुबकी मारली. कोल्‍हा पाण्‍यात पाण्‍यात बुडून मरण पावला.


तात्‍पर्य : करावे तसे भरावे. जो जसा पेरतो तसेच फळ त्‍याला प्राप्त होते.