हिरवा घोडा 
Green Horse


एकदा बिरबलाची परिक्षा घेण्यासाठी बादशहा त्याला म्हणाला, 'बिरबल, मला त्या ठरलेल्या रंगाच्या घोड्यावर बसायचा कंटाळा आलाय. तेव्हा तेव्हा काळा, पांढरा, काळ्यावर पांढरे पट्टे असलेला किंवा पांढऱ्यावर काळे पट्टे असलेला, तपकिरी किंवा तपकिरी रंगात मधूनच पांढरे पट्टे असलेला, राखी, करडा या नेहमीच्या रंगाव्यतीरिक्त असलेल्या रंगाचा घोडा आठवड्याच्या आत आणून दे. एवढी साधी गोष्ट जर तुला जमत नसेल, तर तू माझ्याकडे पुन्हा येऊच नकोस.' 


दोन तीन दिवस उगाच आसपासच्या गावात भटकण्यात घालवून चौथ्या दिवशी बिरबल बादशाहाकडे आला व म्हणाला, 'खाविंद, काम फ़त्ते झालं, हिरव्यागार रंगाचा घॊडा शोधून काढलाय.' 


बादशहानं विचारल,' मग येताना तू तो घोडा घेऊनच का आला नाहीस ?'

बिरबल म्हणाला, 'मी आणत होतो, 'पण त्या घोड्याच्या मालकाच्या दोन अटी आहेत. त्याची पहिली अट म्हणजे, तो घोडा घेऊन जायला स्वत: शहेनशहांनी माझ्याकडे यावं.'

बादशहा म्हणाला, 'हात्तीच्या ! एवढंच ना ? हिरव्या घोड्यासाठी मी स्वत: त्याच्याकडे जायला तयार आहे. बरं, त्याची दुसरी अट कोणती ?'


बिरबल म्हणाला, 'त्या घोड्याच्या मालकाची दुसरी अट अशी -'ज्याअर्थी खाविंदाना काळा, पांढरा, तपकीरी, राखी, करडा वगैरेंसारख्या नेहमीच्या रंगाव्यतीरीक्त असलेला माझा हा हिरव्या रंगाचा घॊडा हवा आहे, त्याअर्थी त्यांनीसुध्दा रविवार ते शनिवार या ठरलेल्या सात वारांव्यतिरीक्त इतर वारी माझ्याकडे घोडा न्यायला यावं;

बिरबलाच्या या उत्तरानं बादशहाचा चेहराही नेहमीच्या रंगाव्यतिरीक्त अशा वेगळ्याच रंगाचा होऊन गेला !