लाजाळू पाहुणे 
Shy Guest



मिथिला नगरीत राहणारा गोनू झा, याच्या घरी एका रात्री चोर आले. मध्यरात्रीच्या सुमारास छपरावरची कौलं काढून घरात शिरलेल्या त्या चोरांची, गोनू ज्या पलंगावर झोपला होता, त्या पलंगाखालच्या पेट्या व संदुका हळूहळू सरकवायला सुरुवात केली. 


पलंगाखाली होणाऱ्या खुडबुड आवाजानं गोनूला जाग आली, आणि आपण केवढ्या मोठ्या प्रसंगात सापडलो आहोत, याचीही त्याला कल्पना आली. आता आपण आरडाओरडा केला तर हे चोर आपला व आपल्या बायकोचा प्राणही घ्यायला कमी करणार नाहीत, असा विचार करुन, गोनू बायकोला जागे करीत म्हणाला, 'अगं सारिके ! उठ ना जरा ! किती सुंदर स्वप्न पडलयं गं मला ! अगं, ते ऎकून तरी घे.' 


झोपेत असलेली त्याची बायको डोळे चोळीत म्हणाली, 'ते स्वप्न उद्या सकाळी सांगून नाही का चालणार ? केवढ्या गाढ झोपेतून उठवलतं तुम्ही मला !' गोनू म्हणाला, 'अगं, जुनी माणसं असं सांगतात, की एखादं सोनेरी स्वप्न पडलं की लगोलग ते आपल्या माणसाला सांगावं, म्हणजे ते खरं ठरतं.''असं आहे होय ? मग सांगून टाका एकदाच ते स्वप्न' बायको जांभई देत म्हणाली. 


यावर गोनू म्हणाला, 'सारिके ! वास्तविक आपल्या लग्नाला एवढी वर्ष होऊन गेली, तरी अजून आपल्या घरात पाळणा हलला नाही. परंतू मला तर असं स्वप्न पडलं, की आपल्याल दोन दोन वर्षाच्या अंतरानं, एका पाठोपाट एक असे एकूण चार मुलगे झाली आहेत. सगळे कसे रुबाबदार, बुध्देवान आणी बलदंड ! आपले ते चार मुलगे रांगता रांगता चालू लागले आहेत, आणि चालता चालता एका पाठोपाठ एक धावूही लागले आहेत. आपले मुलगे असे कुठे कुठे धावू खेळू लागले असता, एकदा काय झालं ठाऊक आहे ?' डुलकी देत देत बायको म्हणाली, तुम्हाला पडलेल्या स्वप्नात 'एकदा काय झालं' ते मला कसं ठाऊक असणार ? काय झालं, ते लवकर एकदाचं सांगून टाका, म्हणजे मी आपली निघोरपणे घोरत पडायल मोकळी होईन.' 


गोनू सांगू लागला, 'एकदा आपले हे चारही चिरंजीव संध्याकाळी खेळायला म्हणून घराबाहेर पडले. दिवे लागले, तरी ते घरी परतले नाहीत, म्हणून तुझ्या सांगण्यावरुन मी त्या चौघांनाही मोठ्यानं हाका मारल्या-'गदाधर ! धरणीधर ! शशीधर ! विद्याधर ! ताबडतोब या !' 


गोनूनं या हाका अशा जबरदस्त जोरानं मारल्या, की त्या ऎकून गदधर, धरणीधर,शशीधर, विद्याधर या नावांचे त्याच्या शेजारी राहणारे तगडे तरुण जागे झाले, आणि हाती सोटे घेऊन व गोनूच्या घराच्या पुढल्या दरवाजापाशी य़ेऊन ते म्हणाले, 'गोनूकाका, कशाला हाका मारल्यात ?' 


त्यांचा आवाज ऎकताच दिव्याची वात मोठी करुन गोनूनं पुढला दरवाजा उघडला, त्या चार तरुणांपाठोपाठ इतर शेजाऱ्यांनीही त्या घराभोवती गर्दी केली होती. ते सोटेधारी तरुन घरात शिरताच, गोनू म्हणाला, 'आमच्याकडे पाहुणे आले आहेत, पण ते अतिशय लाजाळू आहेत. आमच्याकडे पलंग दोन आहेत आणि माणसेही दोन तेव्हा आमची गैरसोय होऊ नये म्हणून बिचारे चकार शब्द न बोलता, आमच्या पलंगाच्या खाली झोपले आहेत. म्हणून यांना तुम्ही तुमच्याकडे नेऊन चांगले पलंगावर झोपवता का ?' 


गोनूच्या बोलण्यातला अर्थ उमजून ते तरुण हसत म्हणाले, 'गोनूकाका ती काळजी तुम्ही करु नका. आम्ही त्यांना चांगलेच झोपवतो.' असं म्हणून त्या तरुणांनी पलंगाखाली दडलेल्या त्या चोरांना बाहेर यायला सांगून त्यांच्या मुसक्या बांधल्या, आणि त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी कोतवालाच्या हवाली केले.