ताटापुढली मांजर
Tataputhli Manjra
एके दिवशी रात्री जेवायला बसलेल्या अकबर बादशहाने एकाएकी बिरबलाला तातडीनं आपल्या भोजनगृहात येण्याचा सेवकाबरोबर निरोप पाठविला. बिरबल भोजनगृहात येऊन पाहतो तो काय ? डोक्यावर एकेक पेटलेली पणती घेतली एकूण दहा मांजर बादशहाच्या पानासमोर अर्धवर्तुळात बसलेली, आणि त्या पणत्यांच्या प्रकाशात बादशहांच जेवण चाललेलं !
हे दृश्य दाखवून आश्चर्यचकित करुन सोडण्यासाठीच बादशहानं आपल्याला मुद्दाम इकडे बोलावून घेतलं, हे गोष्ट हेरून, बिरबलानं आपल्याला त्या दृश्याच कमालीचं आश्चर्य वाटल्याच दाखवलं, आणि तो बादशहाला म्हणाला, 'खाविंद धन्य आपली ! आजवर माझा असा समज होता, की फ़क्त हाताखालच्या माणसांनाच आपल्या 'ताटाखालची मांजर' बनविता, पण आता हा अजब प्रकार पाहिल्यावर मला कळून आलं, की आपण मांजरानाही आपल्या 'हाताखालची माणसं' बनविण्यात तेवढेच निष्णात आहात.'
आपण केलेल्या या स्तुतीनं बादशहा बेहद्द खुष होऊन गेल्याचं पाहून बिरबल पुढं म्हणाला, 'खाविंद, आपल्याला मी एक विनंती करु का ? माझ्या मुलाच्या मनात आपल्याविषयी अगोदरपासूनच आदर आहे, पण जर का त्यानं हे दृश्य पाहिलं, तर त्याचा आपल्याविषयीचा आदर द्विगुणीत होईल. तेव्हा उद्या रात्री त्याला हे दृश्य बघायला घेऊन येऊ का ?' कमालीचा खुष होऊन बादशहा म्हणाला, 'अरे बिरबल, आज करता येण्यासरखी गोष्ट उद्यावर कशाला टाकतोस ! आत्ताच घेऊन ये ना तुझ्या मुलाला ?'
'क्षमा करावी हुजुर ! माझा मुलगा झोपला आहे. झोपेतून त्याला उठवणं, म्हणजे महा कठीण काम. तेव्हा त्याला उद्या घेवून येण्याची मला मुभा द्यावी.' बिरबलानं केलेली ही विनंती बादशहानं आनंदान मान्य केली.
दुसऱ्या दिवशी रात्री सेवकासंगे बादशहाचा निरोप येताच, एका हाती कसलीतरी पुडी आणि दुसऱ्या हाती आपल्या मुलाचं बकोट धरुन बिरबल बादशहाच्या भोजनगृहात गेला. पाहिलं, तर आदल्या रात्रीप्रमाणं ती दहा मांजर, प्रत्येकी एकेक प्रज्वलित पणती डोक्यावर घेऊन, आजही बादशहाच्या समोर अर्धवर्तुळात अगदी आज्ञाधारकपणे बसवलेली आणि त्या पणत्यांच्या प्रकाशात बादशहाचं जेवण चाललेलं !
ते दृश्य दाखवून बिरबल आपल्या मुलाला म्हणाला, 'बघितलस ना बाळा, आपल्या शहेनशहांचा दरारा ? अरे, त्यांनी माणसांना तर मांजरासारखं 'मऊ' बनवलंच, पण मांजरासुध्दा माणसाप्रमाणे आज्ञाधारक बनवलंय !'
आपण केलेल्या स्तुतीमुळे खांविद अस्मानात तरंगू लागल्याचे पाहून, आता यांना जमीनीवर उतरविले पाहिजे' असे बिरबलने मनात ठरविले, आणि बादशहांना स्पष्टपणे ऎकू जाईल अशा स्वरात तो आपल्या मुलाला म्हणाला, ' बरं का बाळ ही दहा मांजर जरी तुला वरवर अतिशय आज्ञाधारक दिसत असलो, तरी आवडीचा विषय दिसताच, त्याच्यामागे धावणाऱ्या दहा इंद्रियांसारखी ही चंचलही आहेत.'
बिरबलाच्या या बोलण्याचा अर्थ त्याच्या लहान मुलाला तर कळणे शक्य नव्हतेच, पण त्याचा अर्थ बादशहाच्याही चटकन लक्षात आला नाही, म्हणून त्याने विचारले, 'बिरबल ! ही दहा मांजर, पाच कर्णेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय मिळून होणाऱ्या आपल्या दहा इंद्रियांप्रमाणे चंचल असल्याच जे तू म्हणालास, ते कशाच्या आधारावर ?'
बादशहाने हा प्रश्न विचारताच, बिरबलाने आपल्या डाव्या हाती घट्ट धरुन ठेवलेल्या पुडीतून एक जिवंत उंदीर बाहेर काढला आणि तो त्या दहा मांजरांसमोर सोडून देऊन, त्या उंदरांचा पाठलाग सुरु केला, आणि अस्मानात तरंगत असलेल्या बादशहाला जमिनीवर आणला !
0 Comments