दूरदर्शनचे फायदे-तोटे 
Television Advantage and Disadvantage 

प्राचीन काळी मानवाच्या गरजा सीमित होत्या. अन्न, वस्त्र, निवारा मिळाला की, तो संतुष्ट होत असे. जसजसा त्यांचा बौद्धिक स्तर उंचावत गेला तशा त्यांच्या आवश्यक गरजाही वाढू लागल्या. गरज हीच शोधांची जननी आहे.मनोरंजनाची साधने शोधण्याच्या माणसाच्या गरजेतून दूरदर्शनचा शोध लागला.इंग्लंडच्या बेसर्ड नामक शास्त्रज्ञाने १९२५ मध्ये याचा शोध लावला. भारतात दूरदर्शन १९५७ मध्ये आले. आश्चर्य हे की, इतक्या कमी वेळात संपूर्ण जगाला त्याने व्यापले. बंगल्यापासून झोपडीपर्यंत तो पोहोचला.

                   दूरदर्शन म्हणजे दूरचे दर्शन घडविणारा. तो आपणास जगात घडणार्या घटनांची सचित्र माहिती देतो. धार्मिक स्थळे, ऐतिहासिक इमारती,अवशेष इत्यादींवर लघु चित्रपट बनवून आपल्यापर्यंत पोहोचवितो. तत्कालीन गौरवशाली इतिहास सांगतो. टेलिव्हिजन कॅमेर्यांच्या मदतीने समुद्राच्या अंतरंगाचे व चांद्रभूमीचे दर्शन घडविले तेव्हा दूरदर्शनचा आश्चर्यजनक चमत्कार आपल्यासमोर आला.प्रथमच अशी ज्ञानवर्धक माहिती त्याच्या माध्यमातून आपणास मिळाली.

                    दूरदर्शन हे शिक्षणाचे एक चांगले माध्यम आहे. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रोज शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण होते. ज्ञानापासून स्वयंपाकघरापर्यंतच्या गोष्टींशी संबंधित कार्यक्रम दाखविले जातात. वेगवेगळ्या देशांतील लोक, त्यांचे वेष, संस्कृती याची माहिती होते.

                     दूरदर्शनवर २६ जानेवारी, १५ ऑगस्टच्या कार्यक्रमांचे थेट प्रसारण केले जाते. याखेरीज शेतीविषयक, घरगुती चिकित्साविषयक, पशू जगत, गीत, संगीत, शास्त्रीय शोध, चित्रपट, सणांची माहिती, मुलांचे कार्यक्रम, योगाभ्यास इत्यादी सर्व काही दाखविले जाते. दूरदर्शनवर प्रसिद्ध व्यक्ती, नेते, खेळाडू यांच्या मुलाखती दाखविल्या जातात. त्यातून आपल्याला प्रेरणा व माहिती मिळते. दूरदर्शन सकाळी, दुपारी, रात्री बातम्या प्रसारित करते. ज्यात भारताव्यतिरिक्त अन्य देशांची पण माहिती असते. शेवटी हवामानाची माहिती दिली जाते.एकट्या व्यक्तीसाठी दूरदर्शन हे स्वस्त आणि मनोरंजक साधन आहे.
 परंतु, दूरदर्शनचे जितके लाभ आहेत तितकेच तोटे पण आहेत. मुले दिवसभर टीव्ही पाहतात. खेळत नाहीत. सिनेमातील वाईट गोष्टी लगेच शिकतात. सवंग कार्यक्रमांचा वाईट परिणाम समाजावर होतो. मुले टीव्हीतील दृश्ये किंवा जाहिरातींचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.

                      दूरदर्शन जवळून पाहिल्यास डोळे खराब होतात. म्हणून कोणतीही गोष्ट प्रमाणातच असली पाहिजे. आपण या वरदानाचा योग्य उपयोग करून घेत नाही.दर्जेदार शैक्षणिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम बघण्याऐवजी आपण सवंग करमणुकीच्या मागे लागतो.साहित्य, संस्कृती यांच्याशी संबंधित कार्यक्रम आपण क्वचितच पहातो. तेव्हा या माध्यमाचा योग्य उपयोग करून घेणे आपल्याच हातात आहे.