घायाळ सैनिकाचे आत्मवृत्त
Biography of Injured Soldier

               मी, शंकर पवार, शपथ घेतो की भारताच्या सौर्वभौमत्वाचे आणि भारताच्या हद्दीचे रक्षण करण्याची माझी जबाबदारी आहे आणि ते काम मी पुर्ण निष्ठा आणि विश्वासाने करीन. देशाच्या राष्ट्रपतींनी आणि माझ्या कमांडरने दिलेल्या आज्ञांचे पालन करीन आणि त्यासाठी जमीन, सागरी किंवा हवाई मार्गाने कुठेही जायची माझी तयारी आहे

               रणांगणावर घायाळ होऊन पडलेल्या हवालदार शंकर पवारच्या मनामध्ये सैन्यामध्ये सामील होताना घेतलेली शप्पथ जागी झाली होती. हुतात्मा वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवुन तो सैन्यामध्ये भरती झाला होता आणि आज लढताना शत्रुच्या एका गोळीने त्याचा वेध घेतला होता. जखमी होऊन तो खाली कोसळला पण तपुर्वी त्याने शत्रुच्या सैनीकांना यमसदनी धाडले होते.

              असहाय्य, निर्जन स्थळी तो मदतीची वाट पहात पडला होता. जखमेतुन वहाणारे रक्त आणि क्षीण होत जाणारी शक्ती त्याची चिंता वाढवत होती. मृत्युचे भय त्याला नव्हते. सैन्यात भरती होतानाच त्याने मृत्युला आपलेसे केले होते. पण त्याला चिंता होती ती त्याच्या परीवाराची. त्याची वृध्द आई आणि पत्निची. आज जर का मला काही बरं वाईट झालं तर त्यांचं कसं होणार? याची. मिलीटरीचा शर्ट घालुन सैन्यात जायची स्वप्न पहाणाऱ्या त्याच्या लहानग्या मुलाची. एवढुश्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर तळपते तेज घेऊन सैन्यातील सैनिक बांधवांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर बनण्याची मनिषा बाळगणाऱ्या त्याच्या मुलीची.

               समोरच कोसळलेल्या शत्रु-सैनीकाच्या शरीराकडे त्याचे लक्ष गेले. कोण होता तो? नाव काय त्याचे? कुठला रहाणारा? त्याच्या घरी सुध्दा माझ्यासारखाच परिवार असेल का? का मारले मी त्याला? केवळ तो शत्रु होता म्हणुन? केवळ माझ्या कमांडरने सांगीतले म्हणुन? दोन दिवसांनी कदाचीततहहोईल. आकाश्यात शांततेचे प्रतिक म्हणुन पांढरी कबुतर सोडली जातील. सदिच्छा म्हणुन जिंकलेले प्रदेश एकमेकांना परत केले जातील, हुतात्मांची स्मारकं उभी रहातील, चार दिवस त्यांच्यासमोर मेणबत्या जळतील. नंतर? नंतर त्यांच काय? अपंग सैनिक कुठल्याश्या बॅंकेत, खाजगी कचेऱ्यात वॉचमनच्या जागी भरती होतील. हुतात्मांच्या कुटुंबांना मदत जाहीर होतील, आश्वासनं दिली जातील जी त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचणार नाहीत.
का करतो आपण युध्द? का मरतात एवढी निरपराध माणसं? सर्वजण सुख-शांतीनी नाही का जगु शकत? सैन्यावर, सुरक्षा यंत्रणेवर खर्च होणारा हा अमाप पैसा देश्याच्या, गरीबांच्या कल्याणासाठी नाही का वापरता येणार? कोण जबाबदार आहे ह्या प्रचंड विनाश्याला?

               आज कुणाचीही पर्वा नं करता मी या युध्द-भुमीवर लढलो. जर उद्या मी या जगात नाही राहीलो तर सरकार माझ्या कुटुंबाची काळजी घेईल? माझ्या मुलाबाळांनी पाहीलेली स्वप्न पुरी होतील? माझ्या आईला, बायकोला सन्मानाची वागणुक मिळेल? का त्यांना आमचाअमुक-अमुकहुतात्मा होता ह्याचे प्रमाण-पत्र घेऊन जागो-जागी ठोकऱाच खाव्या लागतील.
प्रश्न प्रश्न, प्रश्न. अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये तरळत होते ज्याची उत्तर त्याच्याकडे नव्हती. आजुबाजुला होणाऱ्या भयानक हिंसाचारामध्ये, दारु-गोळा, बंदुकांच्या आवाजांमध्ये तो घायाळ सैनीक मदतीची वाट पहात निपचीत पडुन होता.