भ्रष्टाचार
Corruption


                महत्वाचे मुद्दे : भ्रष्टाचार हा शिष्टाचार मानला जातो ते कलियुग, प्रमाणित जीवन मुल्यांची पायमल्ली करणे म्हणजे भ्रष्टाचार होय, समाजात भ्रष्टाचाराचा शिरकाव कसा झाला? चैनीचे उपभोगाचे जीवन जगण्याच्या लालसेतून भ्रष्टाचार बोकाळला, भारतातून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन व्हावयास हवे.

                भागवतात कलियुगाचे विस्तारी वर्णन केले आहे आणि भागवतकारांनी केलेल्या वर्णनाचा आज आपल्याला प्रत्यय येत आहे. कलियुगाचे वर्णन एका वाक्यात करायचे झाले तर तेज्या युगात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार मानला जातो ते युग म्हणजेच कलियुगअसे म्हणता यॆईल.

                 सत्ययुगात सत्याला, सामाजिक नीतीमूल्यांना किंमत होति. जो भ्रष्ट होईल त्याला शिक्षा होत असे. प्रमाणित जीवनमुल्यांची पायमल्ली करणे किंवा नियमबाह्य वर्तन करणे म्हणजे भ्रष्टाचार होय. लाच घेणे, असत्य वर्णन, असत्य भाषण, तस्करी करणे, स्वार्थ साधण्यासाठी अमानवी आचरण करणे, अफरातफर करणे, संपत्ती मिळवण्यासाठी अनैतिक मार्गाचा अवलंब करणे ही सारी भ्रष्टाचाराची रूपे आहेत. या भ्रष्टाचारी रावणाचे दहन केले पाहिजे.

                उद्योगीक क्रांतीमुळे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात लक्षणीय परिवर्तन घडून आले. अनेक सोयी, सुविधा उपलब्ध झाल्या. माणसाला चैनीचे जीवन, उपभोगाची दुनिया विकत घेता येऊ लागली. कमी कष्टात भरपूर पैसा हाताशी येऊ लागला. म्हणजे साहजिकच पैशाची हाव वाढली. मानवाचे पैसा हेच एकमेव दैवत झाले आणि सर्व नीतिमूल्ये पायदळी तुडवली जावू लागली. भल्याबुऱ्या कोणत्याही मार्गाने पैसा कमविणे हे जीविताचे ध्येय ठरले. भ्रष्टाचाराच्या तावडीतून एकही क्ष्रेत्र सुटलेले नाहीं. याने गरीबांपासून श्रीमंता पर्यंत सामान्य माणसा पासून राजकारणी, पुढारी, कलाकारांपर्यंत अशिक्षितांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत या पैसाने सर्वांना भुरळ घातली. भलेभले लोक स्वत:चे कर्तव्य, राष्ट्रहित विसरले आणि भ्रष्टाचाराच्या चढाओढीत सामील झाले. सामान्य माणसापुढे हाच आदर्श निर्माण झाला आणि भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला. भ्रष्ट माणूस हा समाजात उजळ माथ्याने वावरू लागला. भ्रष्टाचारी व्यक्तीला केवळ श्रीमंतीच्या जोरावर समाजात मान मिळू लागला. राष्ट्रहिताची होळी करून सण साजरे होऊ लागले. बेकार,बेरोजगार तरून भ्रष्टाचाराला बळी पडू लागले. जीवधारणेपुरते मिळाले की बाकी कष्ट समाज सेवेसाठी ही धारणाच मुळात नष्ट झाली. आणि तसे करणारा एखादा मनुष्य असेल तर तो मूर्ख बावळट ठरवला जाऊ लागला. जसा राजा, तशी प्रजा हे समाजाचे प्रतिबिंब असते या न्यायाने राव आणि रंक दोघेही भ्रष्ट झाले. संकट ग्रस्तांना, लुळ्यापांगळ्याना, दिनदुबळ्यांना मदत करण्याचे तत्व लयाला जावून त्यांच्या कडून लाच घेतली जाऊ लागली.

                 सध्या तरी भारताचे भवितव्य अंधारातच आहे. केवळ थोर पुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजर्या करून देश सुधारणार नाही. या अंधारात वाट दाखविणारा एखादा दिवा एखादा वाटाड्या (वाट दाखविणारा) आणि त्या वाटाड्याला अनुसरणारी जनता हवी. पण सर्वच भ्रष्ट म्हटल्या नंतर एखादा वाटाड्या असला तरी त्याला खपवून तरी कोण घेणार? त्याचा टिकाव कोण लागू देणार असे झाले आहे.

                भारतीय समाज जरी भ्रष्टाचाराने पोखरला असला, भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला असला तरी हि अवस्था फार काळ टिकणारी नाही. कारण ती आपली संस्कृती नाही आणि परंपराही नाही. हि भूमी आहे राम-कृष्णाची, शिवाजी महाराजांची आणि राणाप्रताप यांच्या सारख्या पुण्य श्लोक राजांची, ज्ञानेश्वरादी संतांची, सावरकर, भगतसिंग यांसारख्या शूर-क्रांतीवीरांची.

या भ्रष्टाचारां चे समूळ उच्च्याटन झाले तरच पुन्हा भारताला वैभवाचे दिवस येण्याला वेळ लागणार नाही यात शंकाच नाही.