छत्रपती शिवाजी महाराज 
Chhatrapati Shivaji Maharaj

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।

               हि ओळ तुम्ही कुठे ना कुठेतरी ऐकली असेलच. हे शब्द आहेत राजमुद्रेतले, जे शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्यच प्रतीक आहे. हे शब्द जेवढे स्फूर्तिदायी वाटतात तेवढाच विस्मयकारी त्यांचा अर्थ हि आहे, तो असा,

प्रतिपदेचा चन्द्र जसा वाढत जातो, आणि सरे विश्व त्याला जसे वंदन करते, तशीच ही मुद्रा व् तिचा लौकिक वाढत जाईल

                 एक राजा जो जनतेसाठी जगला. एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध आणि लोकहितासाठी लढला. एक नेता ज्याने गुलामासारखं जगणं नाकारलं आणि जन्म दिला जगातील एका प्रतिष्टीत अशा मराठा साम्राज्याला. ह्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला जगातील महान अशा मराठा साम्राज्याचे अधिपती श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती देणार आहोत. दरवर्षी १९ फेब्रुवारी ला आपण शिव जयंती साजरी करतो. शाळा आणि कॉलेज मधल्या विद्यार्थ्यांना ह्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर निबंध अथवा भाषण द्यावे लागते. ह्या आर्टिकल द्वारे तुम्हाला शिवाजी महाराज्यांसारख्या थोर राजाबद्दल माहित मिळेल आणि हि माहिती तुम्हाला तुमच्या निबंध अथवा वक्तृत्व स्पर्धेत नक्कीच मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

                  छत्रपती शिवाजी महाराज एक मराठा योध्या आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. ते जगातील काही महान राजांमध्ये एक होते आणि लोक आजही त्यांना तेवढाच आदर आणि सन्मान देतात. शिवाजी महाराजांची ख्याती भारतात तसेच पूर्ण जगातही आहे. एक शूरवीर योद्धा ज्याच्याकडे प्रशासकीय कुशलता, आधुनिक लष्करी डावपेचांमध्ये पारंगतपणा आणि दूरदृष्टी होती आणि म्हणूनच शिवाजी महाराज एक महान योद्धा तसेच एक जाणता राजा होते आणि प्रचंड मोठे, सामर्थ्यशाली असं मराठा साम्राज्य उभारू शकले.

शिवाजी महाराजांचे बालपण

                    शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे मुघलांनी त्रासलेल्या जनतेसाठी एक शुभ शकुनच होता. त्रस्त जनतेला शिवरायांच्या जन्मानंतर एक आशेचा किरण दिसू लागला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुलिअन दिनदर्शिकेनुसार १९ फेब्रुवारी १६३०, हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन कृष्ण तृतीयेला पुण्यातील जुन्नर मधील शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आईचे नाव जिजाबाई भोसले होते. जिजाबाई शिवाजी महाराजांना प्रेमाने शिवबा हि म्हणत. शहाजी महाराज विजापूर च्या राजाच्या सेवेत होते आणि पुण्यातही काही भागाचे ते जहागीरदार होते. शिवरायांची आई जिजाबाई ह्या सिंदखेड च्या लाखोजी जाधवांची कन्या. त्या अतिशय धार्मिक आणि महत्वाकांक्षी होत्या. लहानपणापासूनच त्यांनी शिवाजी महाराजांना सत्यासाठी आणि न्यायासाठी लढायला शिकवले आणि शेवटी सत्याचाच विजय होतो हे त्यांना पटवून दिले. मोठे होत असताना आई जिजाऊंची हि शिकवण कायम शिवाजी महाराज्यांचा सोबत होती आणि त्याचा प्रभाव शिवाजी महाराजांवर होता.

                  शिवाजी महाराजांच्या अंगी जन्मतःच नेतृत्व क्षमता होती. त्यांनी सहकाऱ्यांसमवेत सह्याद्रीच्या कडेकपार्या फिरून काढल्या आणि आपल्या प्रदेशाबद्दल सर्व माहिती आत्मसात करून घेतली. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी काही विश्वासू मावळ्यांना जमवून स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. हेच मावळे त्यांच्या स्वराज्य निर्मितीच्या प्रवासात त्यांचे सोबती होते. हे मावळे स्वराज्य भावनेने प्रेरित होते आणि स्वराज्यासाठी आणि शिवरायांसाठी आपल्या प्राणांची आहुती द्यायला हि तयार होते. १६४० मध्ये शिवरायांच्या विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला.

अस्सल राजा आणि नेता म्हणून शिवाजी महाराजांची कामगिरी

                     १६४५ पर्यंत शिवाजी महाराजांनी आदिल शहा च्या पुणे प्रदेशाच्या आजूबाजूच्या चाकण, कोंढाणा, तोरणा, तसेच सिंहगड आणि पुरंदर या किल्ल्यांचा ताबा घेतला होता. शिवाजी महाराजांच्या ह्या यशस्वी लढायांमुळे आदिल शहा अस्वस्थ होऊ लागला आणि त्याला शिवाजी महाराजांकडून मुघल साम्राज्याला धोका आहे ह्याची जाणीव झाली. आदिल शहा ने शिवरायांचे वडील शहाजीना कैद केले आणि एकाच अटीवर मुक्त केले कि शिवाजी महाराज यापुढे आदिल शहा च्या प्रदेशावर चढाई करणार नाही. काही वर्षांनी शहाजी राजेंचा मृत्यू झाला आणि शिवाजी महाराजांनी आपली घोडदौड पुन्हा सुरु करून जावळी च्या दरीखोऱ्यातला प्रदेश चंद्रराव मोरे जो विजापूर चा जहागीरदार होता त्याकडून जिंकुण घेतला. ह्या घटनेने आदिल शहा चा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या शक्तिशाली सरदारांपैकी एक सरदार अफजल खान ह्याला शिवरायांना पराभूत करण्यात धाडले.

                  अफजल खानाने शिवाजी महाराजांना मारण्यासाठी षडयंत्र रचले आणि त्यांना भेटीसाठी प्रतापगडावर बोलवले. पण अफजल खानाला माहित नव्हते कि शिवाजी महाराज त्याच्या एक पाऊल पुढे आहेत. महाराजांनी खानाचा डाव ओळखला आणि त्यांनी गनिमी काव्याचा डाव रचला. जेव्हा ते प्रतापगडावर भेटले तेव्हा खानाने शिवरायांना आलिंगन देण्यासाठी जवळ बोलावले आणि जवळ येताच शिवरायांवर वार करण्याचा प्रयत्न केला पण तो त्याच्यावरच उलटा पडला. शिवरायांनी आपल्या अंगरख्याखाली चिलखत घातले होते. राजेंनी चपळाईने लपवलेला वाघनख्या बाहेर काढल्या आणि खानाच्या पोटात खुपसल्या. खानाचा कोथळा बाहेर आला आणि खान कोसळला. शिवाजी महाराजांवर हल्ला झाला हे समजताच जंगलात लपलेल्या मावळ्यांनी खानाच्या ३००० सैन्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या ह्या हल्ल्यामुळे खानाचं सैन्य बिथरले आणि मारले गेले. ह्याच गनिमी काव्याचा उपयोग करून शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या. गनिमी कावा हि पद्धत ज्याला इंग्रजी मध्ये गुरिल्ला वॉरफेर असं म्हणतात हि आजही जगातल्या मोठमोठ्या देशांच्या लष्करामध्ये वापरली जाते. प्रतापगडाच्या घटनेवरून शिवाजी महाराजांची चपळाई, दूरदृष्टी आणि शोर्य दिसून येते.

जेव्हा शिवाजीराजे छत्रपती झाले | शिवराज्याभिषेक सोहळा

                  समर्थशाली असे मराठा साम्राज्य दूरवर पसरवल्यांनतर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. जुन , १६७४ रोजी रायगडवर आयोजीत राज्याभिषेक सोहळ्यात शिवाजी महाराजांच्या मराठ्यांचा राजा छत्रपती म्हणून गौरव करण्यात आला. ह्या राज्याभिषेक सोहळ्यात सुमारे ५०००० लोक हजर होते आणि पंडित गागा भट्टांनी राज्याभिषेकाचा विधी पार पाडला. ह्या राज्याभिषेकात शिवरायांचा छत्रपती, शककर्ते, क्षत्रिय कुलावतंस आणि हिंदू धर्मोद्धारक अशा नावांनी गौरव करण्यात आला.

एक कुशल राज्यकर्ता, एक धर्मनिरपेक्ष नेता आणि लष्करी दूरदृष्टी असणारा राजा

                  शिवाजी महाराजांची एक कुशल राज्यकर्ता म्हणून ख्याती होती. त्यांनी अष्टप्रधान मंडळ सुरु केले ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीस एक ठराविक जबाबदारी देण्यात आलेली. पेशवा, मजुमदार, डबीर, पंडितराव,सेनापती, सचिव, मंत्री, न्यायाधीश अशी अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांची पदे असत.

                  शिवाजी महाराजांची प्रशासकीय धोरणे अतिशय अनुकूल आणि मानवी होती. त्यांनी चौथ आणि सरदेशमुखी ह्या दोन प्रकारच्या कर पद्धतींची सुरुवात केली. त्यांनी राज्याची विभागांमध्ये विभागणी केली आणि प्रत्येक विभागाचा प्रमुख मामलतदार असे. त्यांनी कायम स्त्री स्वातंत्र्याला प्रोत्साहन दिले आणि ते कायम स्त्रियांचा आदर करत. त्यांनी त्य्यांच्या मावळ्यांना देखील कोणत्याही स्त्री ला इजा किंवा अनादर होईल असं ना वागण्यास सक्त ताकीद दिली होती. शिवाजी महाराक हिंदुत्व, मराठी आणि संस्कृत भाषेचे समर्थक होते परंतु त्यांनी नेहमी दुसऱ्या धर्मांचा आदर केला. त्यांच्या सैन्यामध्ये सर्व जाती आणि धर्माचे सैनिक होते.

                   शिवाजी महाराज आपल्या राज्याच्या सुरक्षिततेबद्दल खूप सावध होते. त्यांना गड किल्ल्यांची ची ताकद माहित होती आणि म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रात तसेच पूर्ण भारतामध्ये खूप किल्ले उभारले. समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रू पासून सुरक्षा करण्यासाठी महाराजांनी समुद्री किल्ले आणि आरमार हि उभारले.

शिवाजी महाराजांचा मृत्यू आणि त्यांचा वारसा

                  दशके स्वराज्यासाठी लढल्यांनतर एप्रिल , १६८० रोजी आजारपणामुळे रायगडावर शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही मुघलांसोबतची मराठ्यांची लढाई चालूच राहिली. शिवाजी महाराज्यांनंतर त्यांचे पुत्र संभाजीराजेंनी स्वराज्याची सूत्रे हातात घेतली. पण दुर्दैवाने मराठा साम्राज्याला उतरती कळा लागली. शिवाजी महाराजांचे चरित्र सभासद बखर मध्ये लिहले गेले.

                   आज एकविसाव्या शतकात हि लोक शिवाजी महाराजांचा तेवढाच आदर करतात. शिवरायांच्या जीवनावर खूप चित्रपट, पोवाडे, नाटके, गाणी, बनवली गेली. खूप अशी ठिकाणे, संग्रहालये, स्टेडियम्स, शिवाजी राजांच्या नावाने नावाजली गेली. मुंबई मधील विमानतळाला देखील शिवाजी महाजारांचं नाव देण्यात आलं. शिवजयंती आपण खूप खूप उत्साहात साजरी करतो. लेझीम च्या तालावर शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक निघते, एकमेकांना शिवाजी महाराजांचे फोटोस, व्हिडिओस सोसिअल मीडिया वर पाठवले जातात.