धूलिवंदन
Dhulivandan


                होळी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय, होळी म्हणजे चांगल्या गुणांचा वाईटावर विजय. होळी हा दोन दिवसाचा सण आहे. पहिल्या दिवसाला छोटी होळी म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी असते ती रंगपंचमी किंवा धूलिवंदन. होळी ला शिमगा असेही संबोधले जाते. शिमगा म्हणजे भगवान शिवजींची लीला, याला शिव-शिमगा सुद्धा म्हटले जाते.
रंगपंचमी कशी का साजरी करतात?

               आजकाल रंगपंचमी म्हणजे एक खेळ झाला आहे, या सणाचा खरा अर्थ किंवा इतिहास बहुतेकांना माहीत नाही. आता तर होळी, रंगपंचमीच्या दिवशी मोठे कार्यक्रम असतात, जिथे इंग्रजी, हिंदी संगीत वाजते, जेवण-खावन असते. विविध डी.जे. गायक असतात. लोक पैसे देऊन अश्या कार्यक्रमांना जातात. सोशल मीडिया वर फोटो टाकतात. होळी, रंगपंचमी सारख्या पवित्र सणांचा आजकाल एक धंदा झाला आहे. आपण या रंगपंचमीच्या सणाला मजामस्तीचा खेळ मात्र बनवून ठेवला आहे. होळीच्या हार्दिक शुभेच्छा, हैप्पी होळी, हैप्पी रंगपंचमी फक्त अश्या शुभेच्छा दिल्याने हा सण साजरा होत नाही.

                  ब्रह्मांडामध्ये सात देवतांचे सात उच्च स्तर आहेत त्यांच्याशी सात रंग संबंधित आहेत. त्याच प्रकारे मानवाच्या शरीरातही सात चक्र असतात जे या सात देवतांशी संबंधित असतात. रंगपंचमी साजरी करण्यामागचा उद्देश असतो या सात देवतांच्या तत्वरंगाना जागृत करणे. ही तत्वे मानव शरीरात जागृत झाल्याने मानवाचीही आध्यात्मिक साधना पूर्ण होते. रंगपंचमीच्या रंगांच्या रूपात या ईश्वर तत्वांची अनुभुती होणे हाच रंगपंचमीचा एकमात्र उद्देश असतो. रंगपंचमी साजरी करण्याचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे हवेत रंग उडवणे आणि दुसरा पाण्यासोबत एकमेकांवर रंग उडवणे.

                 रंगपंचमी मध्ये एकमेकांना स्पर्श करून रंग लावायचा नसतो, तर तो हवेत उडवायचा असतो. हवेत रंग उडवण्याचा अर्थ असा असतो कि आपण रंग उडवून देवतांचे या भूतलावर स्वागत करत आहोत. दुर्दैवाने रंगपंचमीचा खरा इतिहास, अर्थ पद्धत कोणालाच माहित नाही. आजकाल एकमेकांना जोर जबरदस्ती रंग फासून रंगपंचमी साजरी केली जाते.

                 ज्याप्रकारे आपल्या शरीरात सात ईश्वर रूपी तत्वे असतात तसेच दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात ही असतात. रंगीत पाण्याने पिचकारीच्या साहाय्याने समोरच्या व्यक्तीला रंगवणे म्हणजे त्या व्यक्तीच्या शरीरातील ईश्वरी तत्वाची पूजा करणे होय. असे करताना मनातही तसाच भाव असणे जरूरी आहे.

होळीचे रंग

                 आजकाल आपण समाचार पत्रात वाचतो कि रासायनिक रंगामुळे होळी किंवा रंगपंचमी मध्ये किती लोकांना त्रास होतो. जसे आपण बोललो कि आता सारे सण एक धंदा मात्र झाले आहेत, तसेच त्यात लागणाऱ्या सामग्रीचाही धंदा झाला आहे. खरे होळीचे रंग हे नैसर्गिक सामग्री पासून बनवले जात असत. यात गुलाल, कुंकू, हळद, विविध वनस्पतींची पूड, सुगंधित वनस्पतीची द्रवे वापरली जात असत. यात फुलांचाही समावेश असे. आजकाल स्वस्त रासायनिक रंग वापरून रंगपंचमी साजरी केली जाते. एक गोष्ट या वर्षी चांगली होत आहे कि खूप साऱ्या कंपनीज ऑरगॅनिक किंवा नैसर्गिक रंग विकायला बाजारात आणत आहेत.

धूलिवंदन कसे साजरे करायचे, धूलिवंदनाच्या इतिहास, अर्थ, माहिती

                  आजकाल धूलिवंदन खरे साजरे केले जाताच नाही, फक्त काही गावांमध्ये लोकांना ही प्रथा आता माहित आहे. त्याबदली सर्वजण रंगपंचमी खेळतात. धूलिवंदनाच्या दिवशी लोक सूर्योदय समयी होळीच्या स्थानावर पोहचतात. तप्त होळी वर दूध आणि पाणी शिंपडून तिला शांत केले जाते. होळीला वंदन करून प्रार्थाना केली जाते. प्रथम होळीची राख कपाळाला लावली जाते आणि मग शरीराला.

                   होळीच्या राखेला पवित्र मानले जाते या मागे एक इतिहास आहे. त्रेतायुगाच्या सुरवातीला श्रीविष्णुनी एक यज्ञ केला, त्याच्या दुसऱ्या दिवशी यज्ञस्थळाला वंदन करून त्यांनी दोन्ही हातांनी यज्ञाची राख हवेत उडवली. ऋषी-मुनींनी ही राख अंगाला लावली, तेव्हा त्यांना या राखेच्या पावित्र्याची अनुभूती झाली. या घटणेच्या सन्मानार्थ धूलिवंदन साजरे केले जाते.