भारतीय प्रजासत्ताक दिन
Indian Republic Day

                भारतीय संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी झाली आणि भारत एक प्रजासत्ताक देश बनला आणि म्हणूनच आपण २६ जानेवारी हा दिवस देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय घटक संघटनेने राज्यघटनेचा (संविधान) स्वीकार केला आणि २६ जानेवारी १९५० रोजी ते अंमलात आले. त्या दिवसापासून आपण एक स्वतंत्र प्रजासत्ताक देश बनलो. दिनांक २६ जानेवारीची निवड करण्यात आली कारण १९३० मध्ये याच दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती.

                 १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटीश भारत ब्रिटिश कॉमनवेल्थच्या दोन नवीन स्वतंत्र राजवटीत विभागला गेला, एक म्हणजे आपला भारत आणि दुसरा पाकिस्तान. भारत स्वतंत्र झाला असला तरी जॉर्ज सहावा भारताच्या संवैधानिक राजेशाहीचा प्रमुख होता आणि अर्ल माउंटबॅटन हा गव्हर्नर जनरल होता. या वेळी भारतकडे कायमस्वरूपी संविधान नव्हते, आपण भारत सरकार अधिनियम १९३५ ची सुधारित आवृत्ती वापरत होतो.

                  २८ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली. नोव्हेंबर १९४७ रोजी समितीने विधानसभे समोर पहिला मसुदा सादर केला. विधानसभेत वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांत अनेक सत्रांमध्ये यावर चर्चा आणि सुधार होत राहिला. हे सत्र जनतेसाठी खुले होते. २४ जानेवारी १९५० रोजी विधानसभेच्या ३०८ सदस्यांनी मसुदा मान्य केला आणि संविधानाच्या दोन हस्तलिखित प्रती काढल्या, ज्यापैकी एक हिंदी मध्ये होती आणि दुसरी इंग्रजी मध्ये. दोन दिवसांनी २६जानेवारी १९५० रोजी संविधानाची अंमलबजावणी झाली आणि भारत गणराज्य बनले. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांना भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून संबोधले गेले.

                   संपूर्ण देशातल्या शाळा, शासकीय कार्यालये आणि खासगी कंपन्यांमध्ये सुद्धा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. आपण आपले घर, ऑफिस, गाडी तिरंगी रंगाचे फुगे, झेंडे, रांगोळी इत्यादीनी सुशोभित करतो. काही जण प्रजासत्ताक दिन घरी साजरा करतात तर कोणी सामाजिक मोहिमा आणि कार्यक्रमांसह साजरे करतात. शाळेच्या मैदान / कॅम्पसमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो; उत्सवपूर्ण मोर्चे काढले जातात, निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात. मुख्य अतिथी विद्यालय / महाविद्यालयाच्या आवारात ध्वज वंदनासाठी येतात, अनेक सन्मानित व्यक्ती प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांना उपस्तीथी लावतात. ध्वजवंदना नंतर राष्ट्रगीत गायले जाते, सर्व जण राष्ट्रगीतासाठी उभे राहून त्याचा आदर राखतात. अतिथी, शिक्षक आपले भाषण देतात. काही शाळा देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात.

                    भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्या समोर भारत सरकार राजधानी दिल्लीच्या राजपथ येथे प्रजासत्ताक दिन साजरा करते. या दिवशी, राजपथावर भव्य परेड होते जी भारतीय संस्कृती, वारसा आणि संरक्षण क्षमता दाखवून देते. शेकडो लोक राजपथला भेट देतात आणि या राष्ट्रीय उत्सवाचा आनंद घेतात. दूरदर्शन, विविध वृत्तवाहिन्यां आणि आजकाल यूट्यूब, फेसबुक वर हा उत्सव प्रसारित केला जातो. राष्ट्रपती आणि भारताचे पंतप्रधान हे संपूर्ण देशाला संबोधित करतात.

                   भारतीय प्रजासत्ताक दिनाचे अतिथी म्हणून विविध देश, सरकारच्या प्रमुखाना आमंत्रित केले जाते. वर्ष २०१८ साठी भारत ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या १० आसियान देशांच्या राज्य किंवा सरकारच्या प्रमुखांना आमंत्रित करीत आहे.

                   भारतीय संविधान किंवा घटना ही प्रजासत्ताक दिनाचा मूळ गाभा आहे. हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. संविधान आपल्या मूलभूत हक्कांचा आराखडा, शासकीय संस्थांच्या संरचना, कार्यपद्धती, शक्ती आणि कर्तव्ये प्रस्थापित करते. सोबत भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार, निर्देशक तत्त्वे आणि कर्तव्यांची स्थापना करते. संविधानानुसार भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक देश आहे, जो न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्याचा प्रयत्न करतो.

                   संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये देखील दिली आहेत. स्वातंत्र्य, एकात्मता, धर्मनिरपेक्षता, संस्कृती आणि शिक्षण हक्क, घटनेतील उपाय हे आपले मूलभूत अधिकार आहेत. मूलभूत कर्तव्ये सर्व नागरिकांना संविधानासह भारताच्या राष्ट्रीय चिन्हाचा आदर करण्यास, त्याच्या वारसाचे संरक्षण करणे, त्याची संमिश्र संस्कृती जतन करणे आणि त्याच्या संरक्षणास सहाय्य करण्यासाठी बाध्य करते. ते सर्व भारतीयांना सामान्य बंधुत्वाची भावना वाढवण्यासाठी, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी, वैज्ञानिक स्वभाव विकसित करण्यासाठी, हिंसेला आळा घालण्यासाठी बांधील करते.