ज्योतिराव फुले
Jyotirao Phule
महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यातील कटगून हे होते. महात्मा जोतिराव फुले हे थोर विचारवंत होते. समाज परिवर्तनाचे महान क्रांतिकारी कार्य त्यांनी केले. ते उत्तम लेखक होते. समाज परिवर्तनासाठी त्यांनी शेती आणि शेतकरी वर्गाच्या दृष्टीने लिखाण केले. धर्मशास्त्रविषयकही त्यांचा चांगला अभ्यास होता. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी पुरोगामी विचारसरणीने भारतात स्त्रीशिक्षणाचा पाया घातला. त्यांनी शैक्षणिक, कृषी, जाती पद्धती, स्त्रियांचे आणि विधवांचे राहणीमान उंचावण्याच्या कामी भरीव कार्य केले. स्पर्श आणि शिवताशिवत यात त्या काळात फार मोठा भेदभाव होता. उच्च, नीच, कनिष्ठ असा भेदभाव होता. या सर्व प्रकारांतील अंतर कमी करण्याचे कार्य त्यांनी केले. स्त्रीशिक्षण, मागासलेल्या जाती-धर्मातील मुला-मुलींचे शिक्षण आणि सर्व जाती-धर्मातील मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांनी प्रथम आपल्या पत्नीला शिक्षण दिले. त्यानंतर सन 1848 च्या ऑगस्ट महिन्यात पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. 1873 च्या सप्टेंबर महिन्यात महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी स्वार्थी पद्धतीने समाजाचे शोषण होत असल्याचे पाहिले, तेव्हा त्यास प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. निर्घृणपणे बहुजन समाजाचे, शूद्रांचे, दलितांचे होणारे हाल त्यांनी पाहिले तेव्हा त्यासही त्यांनी प्रचंड विरोध करण्यास सुरवात केली. सर्वांना समान हक्क आणि सामाजिक सहिष्णुता यावर त्यांचा भर होता. त्यातूनच मागासलेल्या समाजाला पुढे आणण्याचे काम त्यांनी केले. छोट्या गरीब शेतकऱ्यांना प्रगतीकडे वाटचाल करण्याच्या कामी त्यांनी महान कार्य केले. धनंजय रवीर यांनी त्यामुळेच त्यांचा भारतीय सामाजिक क्रांतीचे आद्यप्रवर्तक व वडीलधारी नेते, असा उल्लेख केला आहे.
महात्मा फुले यांचे सुरवातीचे जीवन -
त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यात फूल माळी गोऱ्हे कुटुंबात झाला. त्यांचे वडील गोविंदराव हे भाजीपाल्याचा व्यापार करीत असत. त्यांचे आजोबा पुण्यात स्थायिक झाले होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, म्हणून त्यांना फुले नावाने ओळखले जाऊ लागले. महात्मा जोतिराव फुले केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या मातुःश्रींचे निधन झाले. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वडिलांच्या बरोबर शेतीतील कामांना मदत करण्यास सुरवात केली. त्यांचा विवाह वयाच्या 12व्या वर्षी झाला. त्यांच्या शेजारी काही मुस्लिम आणि ख्रिस्त कुटुंबे राहत होती. त्यांनी महात्मा फुले यांची बुद्धिमत्ता अफाट असल्याचे ओळखले होते. त्यांनी महात्मा फुलेंच्या वडिलांना त्यांचे पुढचे शिक्षण व्हावे असे सुचविले. त्यानुसार त्यांनी 1847 मध्ये स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण पूर्ण केले.
मानवी हक्कावर 1791 मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्चित मत आणि अनुमान होते.
सत्यशोधक समाज -
4 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. ब्राह्मण या उच्च जाती वर्गाकडून शूद्र आणि अतिशूद्र समाजाचे शोषण थांबवणे हा मुख्य उद्देश सत्यशोधक समाजाचा होता. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरवात केली.
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर 19 स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. त्याचवेळी त्या कन्याशाळेच्या शिक्षिका म्हणूनही कार्य करीत होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्यावेळी लेखन प्रकाशनचे कार्य केले. महात्मा फुले यांचे निधन 1890 मध्ये वयाच्या 63 व्या वर्षी झाल्यानंतर त्यांचे विचार, आचार आणि त्यांची शिकवण सत्यशोधक समाजाने उचलून धरली आणि सत्यशोधक चळवळ खऱ्या अर्थाने वेग घेऊ लागली. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला.
0 Comments