संत गाडगे महाराज
Sant Gadge Maharaj
गाडगेबाबा यांचं जन्मगाव अमरावती जिल्ह्यातील शेणगाव हे आहे.ते परीट समाजातले होते.त्यांच्या वडिलांचं नाव झिंगराजी तर आईचं सखुबाई होते.गाडगेबाबा हे अलीकडच्या काळातील हे संत आहेत,त्यांनी समाजातील दारिद्र्य नि जातिभेदांमुळं निर्माण होणारी विषमता,
त्याचप्रमाणं देवभोळेपणा याच्यावर आपल्या कीर्तनातून वार केले.देव दगडात नसून माणसात असतो,यासाठीच माणूस घडविणं, हेच आपलं ब्रीद असायला हवं, त्यासाठी शिक्षण घ्यायला हवं, असे त्यांचे परखड मत होते.
लहानपणापासूनच गाडगेबाबाना 'डेबू' किंवा 'डेबूजी' म्हणत,घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे ते मामाची गुरं सांभाळत तसेच शेतीची कष्टाची कामे करत.यामुळे त्यांना शेतकर्यांच्या काबाडकष्टाची जाणाव झाली.
समाजाला योग्य शिकवण देऊन चांगल्या,सुसंस्कृत,बुद्धिवादी,विवेकनिष्ठ, सुसंस्कारयुक्त समाजाची घडण करावयाची असल्यास,अंधश्रद्धा,कर्मकांड, बुवाबाजी,धर्माविषयीच्या चुकीच्या कल्पना यांच्या विरोधात समाजजागरण करायला हवं असे गाडगे बाबांचे परखड मत
होते.त्यासाठी बघ्याची भूमिका न घेता ,त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजजागृतीस कार्याचा प्रारंभ केला.
'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' हे त्यांचे आवडते भजन होते.
समाजात बदल घडविण्याची ताकत फक्त शिक्षणात आहे.या मताचा पुनरुच्चार त्यांनी वेळोवेळी केला,शाळांसाठी त्यांनी आपल्या जागा दिल्या तसेच जागोजागी गरीबांसाठी धर्मशाळा बांधल्या.
गाडगेबाबा स्वत: तुकड्या तुकड्यांनी शिवलेली गोधडीची वस्त्रं नेसत.ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत.सामान्य माणसाला,मजूरांना,शेतकर्यांना धड अंगभर नेसायला मिळत नाहीत,मग आपणही त्यांच्यासारखंच राहायला पाहिजे असे ते म्हणत.नव्या विचारांचं स्वागत नि पूर्वीच्या
अनिष्ट प्रथांना त्यांचा विरोध होता.आपले विचार सर्वसामान्य लोकांना कळावेत यासाठी त्यांनी कीर्तन तसेच ग्रामस्वच्छतेचा उपयोग केला.आचार्य अत्रे गाडगेबाबां बद्दल म्हणत 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात,तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात'.
"मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
गाडगेबाबांनी नाशिक,देहू,आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या,गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली,अनेक नद्यांकाठी घाट बांधले,अतिशय गरीब,अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.त्यांचे
उपदेशही अगदी साधे,सोपे असत.चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका,व्यसनांच्या आहारी जाऊ नका,देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका,जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत.
‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे असे उद्गार बाबांचे चरित्रकार
प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत, 'ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस' असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली असे म्हटले जाते.
0 Comments