माझा गाव 
Majha Gaon

              माझे गावम्हटलं कि सर्वांच्या मनात एक आपुलकीची भावना आणि उत्साह निर्माण होतो. गावाकडच्या आठवणी लगेच आपल्या मनात यायला लागतात. गाव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर प्रथम येते ते आपले जुने घर, चावडी,गावातील मोठे देऊळ, ग्रामपंचायत, मोठमोठी झाडे, हिरवेगार असे शेत, गुरे आणि गावातून जाणारा छोटासा रस्ता. आत्ताच्या या आधुनिक आणि तंत्रज्ञान प्रिय जगात सुद्धा अजूनही सुट्टीमध्ये शहरातील भरपूर लोक गावाकडे जातात.

               मला गावाला जायच म्हटलं की खूप आनंद होतो आणि लगेचच मी तयारीला लागते. कधी परीक्षा संपतेय आणि कधी मी गावाला जातेय असे मला वाटते. माझ्या गावाला जायला मुंबई-पुणे महामार्ग लागतो. त्यानंतर चांदणी चौकामधून माझ्या गावाच्या दिशेने रस्ता आहे. माझ्या गावाला जाताना मध्ये घाट लागतो. घाटामधून जाताना सगळीकडे हिरवळ दिसते. घाटामध्ये खूप नागमोडी वळणे आहेत. मला तिथून जाताना खूप भीती वाटते पण गावाला जाणार याचा एक आनंदही मनामध्ये असतो त्यामुळे भीती निघून जाते.त्यानंतर थोडा घाट उतरल्यानंतर काही गावे दिसतात. हिरवेगार शेती दिसते. घाटाच्या पायथ्याशीच आमचे गाव आहे. गावालाग्रामपंचायत मुठा आपले सहर्ष स्वागत करीत आहेअशी कमान आहे.

                गावामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वचजण कसे आहेत, बाकीचे शहरातील नातेवाईक कसे आहेत याची चौकशी करतात .घरी गेल्यानंतर सर्वचजण आजी आजोबासुद्धा आमची दारात बसून आतुरतेने वाट पाहत असतात. खरंच गावाकडची माणसं माणुसकी विसरत नाहीत. त्यांच्यामध्ये एक आदराची आणि आपुलकीची भावना असते.

                 माझ्या गावामध्ये भैरवनाथाचं, विठ्ठल-रुक्मिणी आणि जननी देवीचं मंदिर आहे. गावामधील सर्वच लोक सर्व मंदिरांमध्ये भक्ती भावाने पूजा, आरती करतात. गावामध्ये कोणाच्या घरी काही शुभकार्य किंवा काही कार्यक्रम असेल तर सर्वजण नैवेद्य दाखवतात आणि कार्य चांगले होण्यासाठी प्रार्थना करतात. गावकऱ्यांचे असे म्हणणे आहे की ग्रामदैवताचे दर्शन घेतले तर कार्यामध्ये कोणत्याही अडचणी येत नाहीत आणि कार्य व्यवस्थित पार पडते.

                  या जननी देवीच्या मंदिराशेजारी मुठा नदी वाहते. त्यामुळे नदीच्या परिसरात खूपच प्रसन्न वाटते. गावात आणखी खंडोबाचे आणि तुकाई देवीचे मंदिर आहे. गावातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरांमध्ये वर्षातून एकदा डिसेंबर महिन्यात दत्त जयंतीला यात्रा असते.आम्ही यात्रेला सुद्धा दरवर्षी गावाला जातो. यात्रेच्यावेळी खूप मजा येते. सर्व मामा,मावश्या आणि सर्व भावंडे एकत्र जमतात. यात्रेत भरपूर खेळणी,पाळणे आणि अनेक छोट्या-मोठ्या वस्तू विकायला असतात.आमच्या गावात यात्रेत कुस्तीच्या स्पर्धा सुद्धा असतात.आमचे गाव कुस्तीगिरांसाठी संपूर्ण मुळशी तालुक्यात खूप प्रसिद्ध आहे. यात्रेत गाण्यांचे, भजन, कीर्तनाचे कार्यक्रम सुद्धा असतात. यात्रेच्यावेळी संध्याकाळी देवाची पालखी संपूर्ण गावात फिरते. त्यावेळी ढोल ताशा लेझीम अशा वाद्यांच्या गजरात पालखी संपूर्ण गावात फिरून पुन्हा मंदिरात दर्शनासाठी ठेवली जाते. यात्रेच्यावेळी सर्वांच्या घरी पुण्यातून तसेच शहरातील विविध भागातून पाहुणे यात्रेसाठी आलेले असतात.

                  गावामध्ये जाण्यासाठी पूर्वी वाहने नव्हती. पूर्वी लोक पायी किंवा बैलगाडीने प्रवास करायचे पण आता एसटी आणि इतर वाहनांची सुद्धा सोय झाली आहे. आमच्या गावात पूर्वी मोजकीच दोन-तीन दुकाने होती पण आता वाढली आहेत आता गावात बँक आणि डेअरी सुद्धा झाली आहे. आमच्या गावाच्या काही अंतरावर लवासा सिटी झाली आहे त्यामुळे रस्ते सुद्धा खूप सुधारले आहेत आणि गावात सुद्धा खूप प्रगती झाली आहे.

                   आमच्या गावाकडच्या घराजवळ पेरू,आंबा,जांभूळ आणि चिंच यांची झाडे आहेत.त्यामुळे आम्ही सर्व भावंडे कैऱ्या काढतो, चिंचा जांभळं पाडतो आणि पुण्याला येताना घरी सुद्धा आणतो. गावातील नदीजवळ दोन-तीन वडाची झाडे आहेत तिथे आम्ही सर्व भावंडे सूर पारंब्या खेळतो. संध्याकाळी मामी किंवा आजीच्या हातची चुलीवरची भाकर-भाजी खायला मिळते त्यावेळी मन खूप तृप्त होते. आम्ही सर्व भावंडे मिळून शेतामध्ये चुलीवर भात बनवून खातो. गावामध्ये जर कोणाकडे लग्न किंवा काही कार्यक्रम असेल तर आम्ही सर्वजण आवर्जून जातो खास जेवणासाठी.कारण आम्हाला हरभरा, वांगे आणि बटाटा यांची गावाकडे बनवतात ती शाक भाजी आणि बुंदी खायची असते. खरं तर गावाकडच्या जेवणाला एक वेगळीच चव असते.

                  पावसाळ्यात तर आमच्या गावाला एक वेगळेच हवामान असते. खूपच पाऊस त्यात हिरवेगार शेतं आणि डोंगर दिसतात. घरातून बाहेर पडता येत नाही एवढा पाऊस गावाला असतो. पावसाळ्यात भरपूर पर्यटक त्याबाजूला फिरायला येतात कारण आमच्या गावाच्या जवळ लवासा सिटी,वरसगाव धरण,पानशेत धरण अशी भरपूर पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. असे हे माझे गाव. सुट्टी कधी संपते नाही ते कळतच नाही आणि पुन्हा घरी परत यावेसेच वाटत नाही कारण गावाला आल्यावर आईच्या कुशीत आल्यासारखे वाटते.