शाळेचा पहिला दिवस
My First day at School

                उन्हाळ्याची सुट्टी मस्त दोन महिने मजेत घालवून, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शाळा सुरु होते. शाळा सुरु होण्याआधी सर्व मुलांचा शाळेसाठी नवीन-नवीन वस्तू आणण्यासाठी पालकांकडे हट्ट सुरु होतो.नवीन वस्तू मिळाल्या की कधी एकदाची शाळा सुरु होते असे सर्वांनाच वाटते. नवीन गणवेश, नवीन दप्तर, नवीन वह्या अशा सर्व नवीन वस्तू मिळालेल्या असताना शाळेचा पहिला दिवस कधी उजाडतो असे वाटते. नवीन वर्ग, मित्र-मैत्रिणी मिळणार या उत्सुकतेने पहिल्या दिवसाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. शाळेचा पहिला दिवस कोणीच विसरू शकत नाही. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत,सर्वांच्याच शाळेच्या पहिल्या दिवसाच्या काही खास आठवणी असतात.

हि आवडते मज मनापासून शाळालाविते लळा जशी माउली बाळा

                  शाळेचा पहिला दिवस म्हटलं की, एक नवा उत्साह आपल्या सर्वांच्या मनात असतो. शाळेच्या पहिल्या दिवशी मी सकाळी लवकर उठले आणि लवकर तयारी केली. शाळेचा गणवेश घातला. नवीन वह्या पुस्तके,नवीन डबा,बाटली सर्व दप्तरातील साहित्य दप्तरामध्ये भरले.या सर्व नवीन वस्तूंमुळे माझ्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती. शाळेची बस कधी येतेय आणि मी शाळेत कधी पोहोचते असे मला वाटत होते. त्यादिवशी रस्त्यांवर खूपच किलबिलाट ऐकायला येत होता. एकीकडे पावसाची रिमझिम आणि दुसरीकडे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा किलबिलाट,त्यादिवशी रस्त्यांवर खूपच गर्दी पाहायला मिळत होती. दीड-दोन महिन्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सर्व मुले एका वेगळ्याच जोमात शाळेत जाण्यासाठी तयार झाली होती.

                 शाळेच्या बसची वाट पाहण्यासाठी आम्ही आमच्या ठरलेल्या ठिकाणी सर्व मित्र-मैत्रिणी येऊन थांबलो.आमची खूप दिवसानंतर भेटल्यावर एकमेकांमध्ये चर्चा सुरु झाली आणि त्यानंतर थोड्याच वेळाने शाळेची बस आली.खूप आनंदाने आम्ही सर्वजण बसमध्ये चढलो. शाळेजवळ बस थांबली आणि आम्ही सर्वजण आनंदाने शाळेमध्ये गेलो.आमच्या सर्वांच्या मनामध्ये एकच विचार पुन्हा पुन्हा येत होता की आपल्याला वर्गशिक्षक कोण येतंय, शिक्षक चांगले (आपल्या मनासारखे) यायला पाहिजेत, कडक नकोत.आपल्या वर्गामध्ये अजून कोण-कोण नवीन विद्यार्थी येत आहेत म्हणजे आपल्याला अजून नवीन मित्र -मैत्रिणी भेटणार याचा आनंदही मनात होताच. त्यानंतर थोड्याच वेळात आमचे वर्गशिक्षक वर्गात आले.आम्ही सर्वानी त्यांना नमस्कार केला. वर्गशिक्षक वर्गात आल्यानंतर त्यांनी सुद्धा आमचे सर्वांचे हसतमुखाने स्वागत केले.आमच्या मनाप्रमाणे आम्हाला वर्गशिक्षक मिळाल्याने आम्ही सर्वजण खूप खूश होतो.

                  शाळेच्या पहिल्याच दिवशी आमच्या संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना पटांगणात बोलावण्यात आले. तिथेच आमचे राष्ट्रगीत आणि प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर मुख्याध्यापकांनी आमचे स्वागत केले आणि ज्या विद्यार्थ्यांना मागील वर्षी परीक्षेत उत्तम गुण मिळाले आहेत त्यांचा गौरव करण्यात आला, त्यानंतर आम्ही आपापल्या वर्गामध्ये गेलो.

                  आमच्या वर्गशिक्षकांनी उन्हाळ्याची सुट्टी कशी गेली असे आम्हाला विचारले, आमचे अनुभव विचारले. आम्ही सर्वानी एकदम उत्तर दिलेमजेत, खूप छान”. त्यानंतर शिक्षकांनी त्यांची आम्हाला ओळख करून दिली आणि आम्हालाही आमच्या सर्वांची ओळख करून देण्यास सांगितले. त्यानंतर शिक्षकांनी सुट्टीत काय-काय केले असे प्रत्येकाला विचारले. कोणी डान्स क्लास केला, तर कोणी शिबिरामध्ये गेले होते. तर काही जणांनी पोहोण्याचा क्लास लावला होता, तर काही जण कोकणात, गोव्याला फिरायला गेले होते.अशाप्रकारे सर्वानी आपली सुट्टी खूप मजेत घालवल्याचे शिक्षकांना सांगितले.

                   आज शाळेचा पहिला दिवस, काहीच अभ्यास नाही आणि परीक्षेचे टेन्शन नाही या विचाराने आम्ही सर्वजण खूप खूश होतो. त्यानंतर आमची मधली सुट्टी झाली.आम्ही सर्वानी एकत्र बसून डबा खाल्ला. त्यानंतर आम्ही शाळेमध्ये खूप दिवसांनी एक फेरफटका मारला. शाळेमधल्या मैदानावर गेलो तिथे आम्ही खूप खेळलो. त्यानंतर शाळेची घंटा वाजली आणि आम्ही वर्गामध्ये गेलो. वर्गामध्ये गेल्यानंतर थोड्याच वेळात वर्गशिक्षक आले. त्यांनी नवीन विद्यार्थ्यांना आपल्या शाळेबद्दल थोडी माहिती सांगितली. शाळेमधील प्रयोगशाळा ,ग्रंथालय,शाळेचा कार्यक्रमाचा हॉल सर्वाना दाखविला. शाळेमधील प्रकल्प जसे की गांडूळखत प्रकल्प,रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि औषधी वनस्पतींची बाग असे सर्व आम्हाला दाखविले आणि शाळेची नवीन संगणक खोली सुद्धा आम्हाला सर्वाना दाखविली.

                 त्यानंतर शिक्षकांनी आम्हाला शाळेच्या या वर्षीच्या नवीन अभ्यासक्रमाबद्दल माहिती सांगितली.थोड्याच वेळात शिपाई काकांनी पुस्तकांचे गट्ठे वर्गामध्ये आणले आणि त्यानंतर शिक्षकांनी आम्हाला पुस्तकांचे वाटप केले. खूप अविस्मरणीय असा आमचा शाळेचा पहिला दिवस होता खूप सारे मित्र-मैत्रिणी आम्हाला भेटले. खूप दिवसांनी शाळेत आलोत याचा आनंद काही वेगळाच असतो.