झोपडपट्टी – आत्मकथनात्मक
Jhopadapatti – Atmakathanatmaka


एकदा काय गंमत झाली, आमच्या अकरा मजली उत्तुंग ‘गिरनार'जवळची झोपडपट्टी बोलू लागली. अहो, अगदी चक्क एखादया फडा वक्त्यासारखी ती आपले विचार मांडू लागली. वेळ होती रात्रीची. 'गिरनार' अगदी शांत झोपला होता-मऊ, मऊ फोमच्या गादयांत गोड गुलाबी स्वप्ने पाहत. त्याला कशाचा पत्ताच नव्हता. 'गिरनारची' श्रीमंत शेजारीण 'उषाकिरण'सुद्धा अगदी रम्य, तरल स्वप्नात गुंग होती. जागी होती फक्त त्या दोन उंच इमारतींमधील झोपडपट्टी आणि जागा होता समोरचा अथांग निळा सागर. तो सुद्धा आपला नेहमीचा खळखळाट थांबवून शांतपणे त्या झोपडपट्टीचे गा-हाणे ऐकत होता. कारण कधी नव्हे ती झोपडपट्टी बोलत होती.

तिचा स्वर अगदी धीरगंभीर होता. तिच्या वयाचा विचार केला तर ती जरा अधिकच पोक्त वाटत होती. नाहीतरी संकटे कोसळली की अनुभवाने सर्वांनाच अकाली प्रौढत्व येते.


 या झोपडपट्टीचे तसेच झाले होते. बरेच दिवस मनात साचलेली 'दु:खे' तिला आता कुणाला तरी सांगायची होती. तिने गिरनारला हाका मारल्या तेव्हा उषाकिरण जागी झाली आणि नवलाईने ऐकू लागली. “अरे गिरनार, तू आणि तुझी मैत्रीण उषाकिरण, माझ्याकडे तिरस्काराने बघता. माझ्या ओंगळ रूपामुळे तुमचे सौंदर्य डागाळते असे तुम्हांला वाटते. पण, तुमचा हा उलटा न्यायच नाही का? अरे सांगा, या जागेवर आधी कोण होते, तुम्ही की मी? माझीच जागा बळकावून तुम्ही मला दूर करू पाहता. कोठे जातील ही गरीब माणसे आणि त्यांची कच्चीबच्ची? तुमच्या मोठमोठ्या फ्लॅट्समध्ये जेवढी माणसे राहतात त्याच्या दसपट माणसे एका एका झोपडीत राहतात. रात्री झोपताना पाहावे तर एकाच्या अंगावर दुसऱ्याचे पाय ; तुमच्याकडे मात्र प्रत्येकाला स्वतंत्र खोली. तुम्ही माणसे आणि तीही माणसेच ना! मग हा फरक का? तुमच्याजवळ जे अवयव आहेत, तेच त्यांच्याजवळ. शक्तिसामर्थ्याबद्दल बोलायचे झाले तर कदाचित ती माणसे तुमच्यापेक्षा वरचढ ठरतील! मग हा भेदभाव का? पुरेसे अन्न नाही, चांगले कपडे नाहीत. चैनीच्या गोष्टी नाहीत. कारण त्यांच्याजवळ दामाजीपंतांचा अभाव आहे. तुम्ही मात्र स्वतःच्या गरजेपेक्षा अवास्तव पैसा बळकावून बसला आहात.

तुम्हांला माझे रूप ओंगळ वाटते. पण याला जबाबदार कोण? येथे राहणाऱ्या हजारो माणसांना का स्वच्छ जीवन आवडणार नाही! पण साधे पाणी तरी त्यांना पुरेसे मिळते का? तुला आठवते ती पु. लं. ची 'फुलराणी' रंगमंचावर काय सांगत होती? 'म्युनिसिपालटीचा मोठा नळ फुटतो तेव्हा आमची आंघोळ.' एवढ्या लहानशा जागेत हा माणसे आपले सर्व विधी उरकतात. मग घाण नाही का होणार?

 

त्यांची दुःखं तरी किती अगणित. त्यामुळे ते मदयाला जवळ करतात. तर तुम्ही त्यांना त्यासाठी बोल लावता. पण तुमचे फ्रीज-कपाटांचे चोरकप्पे उघडा. तेथे काय आढळते? परक्या देशातील चोरट्या वाटेने आलेल्या मदयाच्या बाटल्या. तुमचे जीवन सुखी व्हावे यासाठी ही माणसे राबतात. या माणसांच्या श्रमांवरच तुम्ही तुमचे सुखी जीवन उभारलेले असते. पण त्यांचे जीवन साधारण सुसहय व्हावे एवढेही तुम्ही पाहत नाहीत. उलट आम्ही म्हणजे या झोपडपट्ट्या आणि त्यांतील माणसे यांचे खरेखोटे जीवन तुम्ही तुमच्या साहित्यात रंगवता आणि मानवतेचा पुळका आल्याचे भासवून पडदयावरही त्याचे अवास्तव चित्रण करता. पण एक लक्षात ठेवा, अनंत काणेकरांनी सांगितलंय त्याप्रमाणे ‘याच माणसांजवळ मोठं मन आहे, माणुसकी आहे.' झोपडपट्टी गप्प झाली, ती थकली होती; पण आता तिला हलके वाटत होते. 'गिरनार' शांत होता. सागर मात्र खवळला होता.