नदी बोलू लागली तर 
Nadi bolu lagali tara

मुंबईहून पुण्याकडे परतत होतो. पुणे जवळ आल्याच्या खुणा दिसत होत्या. आता आपल्या आवडत्या नदीचे आपल्याला दर्शन घडणार असे वाटू लागले. नदीजवळील परिसरातून आम्ही जात होतो; पण नदी दिसत नव्हती. एवढी मोठी नदी हरवली होती, अगदी चक्क गायब झाली होती.कारण त्या नदीच्या संपूर्ण पृष्ठभागावर ‘पाणवनस्पती' उगवली होती. अनेकदा या वनस्पतीविषयी मी वर्तमानपत्रात वाचले होते, पण ती एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरत असेल अशी कल्पना नव्हती. नदीला काय वाटत असेल बरं! नदी बोलू लागली तर...

...तर ती नक्कीच मानवाला दोष देईल. या नदीने माणसाला काय दिले नाही? कुठल्यातरी डोंगरकपारीतून ती वाहत येते ती कशासाठी? आपल्या मानवपुत्रांना जीवन देण्यासाठीच ना! 

ती जीवन देते आणि माणसाचे जीवन फुलते. मानवी संस्कृतीचा इतिहास काय सांगतो? पूर्वीच्या काळी नदीच्या काठीच तर गावे वसत होती, मानवी संस्कृतीचा विकास होत होता. म्हणून तर प्राचीन काळापासून नदयांना 'लोकमाता' म्हणून संबोधिले जाते. या नदया आपल्या काटांवर सुपीक माती, गाळ टाकून शेतीसाठी उत्कृष्ट भूमी निर्माण करतात. या सरितेमुळेच माणसाची तहान भागते, शेते पिकतात, द्राक्षांच्या बागा फुलतात. आपल्याजवळ जे जे आहे ते दुसऱ्याला देत जा, हाच संदेश सांगत ही आपला सतत मार्गक्रमण करीत असते. वर्षाऋतूकडून मिळालेल्या जलाचा लोढा घेऊन येणाऱ्या या तटिनीला माणसाने अडविले, मोठमोठ्या भिती बांधून तिचा प्रवाह थांबविला, तरीही ही सरिता रागावली नाही. तिने माणसांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. त्यांच्यासाठी तिने कड्यावरून उड्या घेतल्या, बोगदयातील काळोखातून ती धावली. तिच्या पाण्यावर माणसाने वीज निर्माण केली. त्यामुळे त्याचे घर प्रकाशाने उजळून निघाले, कारखान्यातील यंत्रे फिरू लागली. माणसांचे जीवन अधिक संपन्न, समृद्ध झाले. नदी आपल्या पाण्यातील मासे देऊन माणसाच्या जेवणाची लज्जतही वाढवीत होती.

आम्ही माणसे मात्र हे सारे विसरलो. मुंबई-पुण्यासारख्या शहरात राहणाऱ्या मुलांना विचारले, “तुम्हांला पाणी कोठून मिळते?" तर ती सांगतात, “नळांतून.” अशा त-हेने आपल्याच कामात सदा गुंतलेल्या माणसाला या लोकमातेची आता आठवणही राहिलेली नाही. आपल्या गावातील सारी घाण आणून तो नदीत सोडतो, मोठमोठे कारखानदार आपल्या कारखान्यांतील दूषित पाणी नदीत आणून सोडतात. साखरेच्या कारखान्याची मळी पाण्यात सोडली जाते. अशावेळी नदीला केवढे दुःख होत असेल! तिला बोलता येत नाही. अगदीच भावना अनावर झाल्या तर ती बेफाम होते आणि मग गावेच्या गावे उद्ध्वस्त करीत जाते.

या नदीला बोलता आले तर ती प्रथम या द्वाड माणसाचे कान पकडून म्हणेल, "अरे उद्दामांनो, तुम्हांला काही अक्कल आहे का? तुम्ही माझ्या पाण्यावरून भांडणे करता. राज्याराज्यात माझ्या पाण्यावरून आज भांडणे पेटली आहेत. आता भारत आणि बांगलादेशातही पाण्याचा वाद सुरू झाला आहे. माझे पाणी म्हणजे तुम्हा सर्वांचे जीवन. ते भरभरून घ्या आणि हसत हसत जगा; आणि हो, जरा माझी स्वच्छताही ठेवा. अरे बाळांनो, माझ्याकडे पाण्याचा साठा उदंड आहे. ते कोणालाच कमी पडणार नाही. यास्तव तुम्ही भांडणे थांबवा व सुखाने जगा."