हुंडाबळी तरुणीची आत्मकथा 
Autobiography of a Dowry Victim


थांबा, आतापर्यंत तुम्ही सर्वांनी खूप चर्चा केली. आता मला बोलू दया. कारण आता मी फारच थोड्या तासांची सोबतीण आहे. तेव्हा या सुंदर जगातून जाण्यापूर्वी मला माझे मनोगत व्यक्त करू दया. मला माहीत आहे, मी खूपच भाजले आहे; आणि या शेवटच्या क्षणीही मला जाणवत आहे की, हे जग सुंदर आहे. मग सांगा बरे, अशा या सुंदर जगाचा निरोप घेण्याचा प्रयत्न मी कशी करणार पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न' अशी माझ्यासंबंधी आपल्या अहवालात नोंद केली आहे; आणि वार्ताहरांनी त्यावरून वृत्तपत्रात तशाच प्रकारची बातमी दिली आहे. पण मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ओरडून सांगेन की, 'मी आत्महत्येचा प्रयत्न केला नाही. मला पेटवून दिले आहे. मी झोपेतून जागी झाले तेव्हा माझे कपडे पेटलेले होते. घरात सर्व माणसे हजर होती, पण कोणीही मला वाचविण्याचा यत्न केला नाही. कारण त्यांना मी नकोच होते. त्यांच्या डोळ्यांसमोर चमकत होते 'चकचकीत रुपये'.

 

“अतिलोभी आहेत ती माणसे! पण खरंच, त्यांना माणसे तरी कसे म्हणायचे? राक्षसालाही लाजवील अशी त्यांची वृत्ती आहे. मी या घरात आले तेव्हा भरपूर सोने, चांदी, रुपये घेऊन आले होते. घरच्या लक्ष्मीत मी भरपूर भर घातली होती. माझ्या पूर्वी आलेल्या माझ्या तीन जावांनीही आपापल्या माहेराहून भरपूर धनदौलत आणली होती. पण माझ्या सासरच्या मंडळींचे एवढयावर समाधान नव्हते. सूना या संपत्ती मिळविण्याची साधनेच असे ही मंडळी मानतात. या सर्व गोष्टींचा परिणाम माझ्या मोठ्या जावेच्या मनावर झाला आहे आणि ती आता वेड्यांच्या इस्पितळात आहे. तिचे पती म्हणजे माझे मोठे भाऊजी मात्र दुसरे लग्न करण्याच्या तयारीत आहेत. कारण त्यांना माहीत आहे की येणारी नवी बायको आपल्याबरोबर रुपयांच्या राशी घेऊन येईल.