भ्रष्टाचार 
Bhrashtachar 


आजच्या एकविसाव्या शतकातही एक भस्मासुर फार मातला आहे. या भस्मासुराचे नाव आहे, भ्रष्टाचार ! हल्ली वर्तमानपत्रांतून तर नित्य नवा 'आर्थिक घोटाळा' जाहीर होत असतो. बँक घोटाळे, मुद्रांक घोटाळे, खोट्या नोटा छापणे... हे असे एक ना अनेक घोटाळे आता चिरपरिचित झालेत.

पुराणकाळातील भस्मासुरापेक्षा या आधुनिक भस्मासुराच्या लीला महाभयंकर आहेत. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तो  दिसतो. वाढत्या महागाईमागे याचाच हात आहे. कोणत्याही गोष्टीची कृत्रिम टंचाई हाच निर्माण करतो. नोकऱ्यांची टंचाई असली, तर भ्रष्टाचाराला तेथे मुक्त वाव मिळतो. लाखो रुपयांची लाच देऊन अधिकाराच्या जागा मिळवल्या जातात आणि एकदा अधिकाराची जागा मिळाली की, लाच म्हणून दिलेले पैसे वसूल करण्यासाठी लाच स्वीकारली जाते. असे हे एक दुष्टचक्र सुरू आहे. त्यातून 'काळा पैसा' निर्माण झाला आहे.



विज्ञानाच्या बळावर व्यक्तिगत जीवनात अनेक सुखसोयी, चैनीच्या गोष्टी सहजपणे उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येकाला त्या हव्याहव्याशा वाटतात. त्याकरिता पैसा मिळवण्यासाठी कष्ट करण्याची कोणाचीच तयारी नसते. सहजगत्या, सुलभतेने मिळणारा पैसा बहुतेकांना हवा असतो. चंगळवादाच्या या हव्यासापोटी भ्रष्टाचाराचा जन्म होतो. पैसा हे एकदा सर्वस्व' मानल्यावर, तो मिळवण्यासाठी वाट्टेल ते केले जाते.

अन्नात व  औषधातदेखील भेसळ केली जाते. औषधातील भेसळीमुळे निरपराध जीवांचे  बळी घेतले जातात. भ्रष्टाचार करणाऱ्यांची विवेकशक्ती नष्ट झालेली असते. बालवर्गापासून शाळा-महाविद्यालयापर्यंत प्रवेशासाठी लाच घेतली जाते. लाच घेऊन परीक्षच्या प्रश्नपत्रिका फोडल्या जातात व लाच घेऊनच परीक्षेचे गुण फिरवले जातात. वैयक्तिक स्वार्थासाठी देशाची संरक्षणविषयक गुपिते परकीय सत्तेला पुरवली जातात. चोरट्या व्यापाराला उधाण येते. नव्या पिढीला नष्टा करणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यापाराला जोर चढतो.


भ्रष्टाचाराच्या या भस्मासुराचा वेळीच बळी घेतला नाही, तर तो भारताचा विध्वंस केल्यावाचून राहणार नाही. आजच्या युवकांनी  समाजातील भ्रष्टाचागची मुळे उपटून काढून स्वच्छ जीवनाचा पाया घातला पाहिजे.