दिव्यत्वाची जेथ प्रचिती 
Divyatvachi Jeth Prachiti

वृत्तपत्रातील एक छोटीशी वार्ता होती ती. मोठ्या अक्षरांचा मथळाही तिला लाभला नव्हता. पण तिचा मोठेपणा मात्र त्या मर्यादित अक्षरांत मावत नव्हता. कुणी एक व्यक्ती सर्वसामान्यांसारखी जगली पण मरणाने अमर झाली. त्या व्यक्तीने अंधाला नेत्रदान केले; तर वैदयकीय विदयार्थ्यांना अध्ययनासाठी देहदान केले. इतकेच नाही तर जीवनभर साठविलेल्या पैपैशातून जमलेली लक्षावधी रुपयांची रक्कम झोपडवासीयांना सुरक्षित निवाऱ्यासाठी देऊन टाकली. ही व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात कधीच नव्हती. पण त्या व्यक्तीजवळ होते दिव्यत्व. त्या दिव्यत्वाची प्रचीती इतरांना आली ती त्याच्या मृत्यूनंतर. ती बातमी वाचून माझे मस्तक नत झाले. मन भरून आले.


असे दिव्यत्व मानवी जीवनात कुठे ना कुठे आढळते. म्हणून तर मानवी जीवनाला सुगंध आहे, भव्यता आहे, किंमत आहे. या दिव्यत्वाला स्थलकालाच्या मर्यादा नाहीत; लहानमोठ्याचा भेदभाव नाही; गरिबी-श्रीमंतीचे अडसर नाहीत. ती जशी भूतकाळात भेटते, तशीच ती वर्तमानातही असते. अशा दिव्यतेने सर्वसामान्य माणूस भारावून जातो आणि मग तेथे त्याला देवत्वाचा साक्षात्कार होतो. सत्याच्या आग्रहासाठी वनवास स्वीकारणारा, कर्तव्यासाठी पत्नीचा त्याग करणारा रामचंद्र अशा त-हेच्या दिव्यत्वामुळेच 'प्रभू रामचंद्र' होतो; आणि लोक त्याचे चरित्र युगानुयुगे गातात.


जीवनाच्या विविध क्षेत्रांत हे दिव्यत्व आपल्याला दिसून येते. देशांच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्व सूखांची होळी करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांत, उसळलेल्या दर्यात आपली जीवननौका फेकणाऱ्या तरुण सावरकरांमध्ये ; आणि ताठ मानेने फाशीवर चढणाऱ्या भगतसिंगांमध्ये हेच दिव्यत्व होते.असंख्य लाटांची गर्जना भोवताली चालू आहे. फेसाळलेल्या लाटांच्या जिव्हांनी सर्व काही गिळंकृत करावयास सागर उदयुक्त झाला आहे, अशा त्या खवळलेल्या सागरावर निधड्या छातीने चाल करून जाणाऱ्या कोलंबसाच्या जिद्दीतही दिव्यत्व आहे. शून्यातून स्वराज्य निमिणाऱ्या शिवबाच्या साहसातही दिव्यत्वाचा साक्षात्कार आहे. म्हणूनच मूठभर मावळ्यांच्या मदतीवर शिवराय प्रचंड परकीय सत्तेशी टक्कर देऊ शकले.

या दिव्यत्वाचे स्फूल्लिग ज्याच्या अंगी असते, त्याची त्याला जाणीवही नसते. तो आपल्या मार्गाने जात असतो; पण त्याच्या पावलांनी तो रस्ता उजळून निघतो. समाजातील स्त्रियांवर होणारा अन्याय पाहून अण्णा कर्वे विकल झाले, आणि त्यानी, स्त्रियांवरील अन्यायाचे निर्मूलन करण्याचा निश्चय केला. काट्याकूटयांचा रस्ता त्यांनी तुडविला आणि ओसाड माळरानावर झोपडी उभारली. ज्ञानदानाने ती झोपडी पुनित झाली आणि पाहता पाहता तेथे आज विदयापीठ उभे राहिले. येथे दिव्यत्वाची प्रचीती नाही का? समाजाकडून तिरस्कारल्या गेलेल्या अपंगांच्या साहाय्याने ओसाड माळरानावर 'आनंदवन' वसविणाऱ्या आमट्यांच्या यत्नात हेच दिव्यत्व आहे आणि याच दिव्यत्वाने कुंडलपूरच्या निवडुंगाच्या भूमीत लक्ष्मणरावांनी किर्लोस्करवाडी वसविली. वाल्मिकीने रचलेले रामायण; आणि वयाची विशी ओलांडण्यापूर्वी ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ज्ञानेश्वरी याच दिव्यत्वाचा साक्षात्कार घडवितात.

 

आपल्या भोवताली आपण डोळसपणे पाहिले तर असे दिव्यत्व नित्य फूलत असल्याचे दिसते. निसर्गाच्या दातृत्वात ते भेटते. वन्य प्राण्याच्या एखादया सहज लीलेतही ते आढळते आणि मग कवी बोरकरांचे शब्द आपल्या ओठी रेंगाळू लागतात