विदयार्थी जीवन 
Vidyarthi Jeevan


“आई, आता फक्त एवढ्याच प्रश्नाचे उत्तर सांग. अगदी शेवटचाच प्रश्न आहे बघ!" मिनू अगदी केविलवाण्या शब्दांत आईला सांगत होती. जवळजवळ दोन तास ती आईच्या मदतीने आपले प्रश्न सोडवीत होती. मिनूच्या उद्गाराने मी ही भानावर आलो. मी देखील खूप वेळ गणिते सोडवीत होतो, आणि अजून मला कितीतरी विषयांचे प्रश्न सोडवावयाचे होते. केव्हा संपायचे बरे हे प्रश्न? छे, आमची सारी विदयार्थिदशा या प्रश्नांच्या भेंडोळयातच अडकली आहे. या साऱ्या प्रश्नांची रूपे तरी किती आगळीवेगळी! त्यांच्या स्वरूपांप्रमाणे विदयार्थ्यांना त्यांना सामोरे जावे लागते. नाहीतर वस्तुनिष्ठ प्रश्नाला दीर्घ उत्तर दिले की बसलाच शून्याचा फटकारा.


आजचे विदयार्थिजीवन म्हणजे नानाविध प्रश्नांची सर्कसच! या सर्कशीतील तंत्र आणि मंत्र जो साध्य करतो तोच यशाचे शिखर गाठतो. पण एक गोष्ट मात्र नक्की की, असा विदयार्थी खरा ज्ञानार्थी न होता केवळ परीक्षार्थी बनतो. याचे एक कारण हेही आहे की, आजच्या विदयार्थ्यांवर विविध विषयांचा फार मोठा बोजा आहे. मर्यादित वेळेत अभ्यास कसा संपवायचा हे विदयार्थ्यांपुढील मोठे प्रश्नचिन्ह आहे.

तेवढ्याने काय संपते! विदयार्थी हा सर्वगुणसंपन्न असावा अशी सर्व पालकांची व शिक्षकांची अपेक्षा. आपण विदयार्थिदशेत जे करू शकलो नाही ते सारे आजच्या विदयार्थ्यांनी करावे असे त्यांना वाटते. अशा प्रसंगी विदयार्थ्यांचा मात्र कोंडमारा होतो. एखादया विदयार्थ्याला सुनील गावसकर व्हावेसे वाटते; तेवढयात जयंत नारळीकरांसारख्या थोर शास्त्रज्ञाचा आदर्श त्याच्यासमोर ठेवला जातो. मुलाने आपली प्रकृती उत्तम ठेवावी असे सांगणारे पालक, त्याच मुलाने व्यायामशाळेत जरा जास्त वेळ घालविला की, लगेच म्हणतात, “काय आखाड्यात उतरायचे काय!" त्यामुळे आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचे आहे, हयाबद्दल विदयार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो.अभ्यासात यश मिळवून तरी आजच्या विदयार्थ्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे मिळाली आहेत का? उच्च शिक्षणासाठी त्याला हव्या त्या शिक्षणशाखेत प्रवेश घेता येतो का? तेथेही अनेक अडसर! जागा कमी, मागणी अधिक! या व्यस्त प्रमाणामुळे सर्वत्र झिम्मड. मग भ्रष्टाचार, वशिलेबाजी आलीच. 


विदयार्थ्याला आवडत असलेली शिक्षणशाखा तो निवड शकत नाही; मग तो अगतिक होतो वा भरकटतो.

अशा या विदयार्थिजीवनात अनेक मोह विदयार्थ्याला ग्रासावयास उभे असतात. कधी चुकून, तर कधी वैफल्याने तो त्यांकडे वळतो. अशा सर्व समस्यांवर मात करून विदयार्थ्याने उत्तम यश संपादन केले तरी त्याचे प्रश्न संपत नाहीत. शिक्षणानंतर नोकरीचा प्रश्न त्याच्यापुढे उभा ठाकतो. बेकारीचा भस्मासूर त्याला वाकुल्या दाखवितो. स्वतःचा व्यवसाय हा बेकारीवरचा उपाय त्याला दाखविला जातो. पण तेथेही जीवघेणी स्पर्धा व गैरव्यवहार त्याला रोखतात.


प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न! विचारवंतांच्या मते, माणूस हा आयुष्यभर विदयार्थीच असतो. मग प्रश्न पडतो की हे प्रश्न सुटणार तरी केव्हा? आणि हे प्रश्नही त्याला सतत साथ देत असतात.