Hindi Essays, English Essays, Hindi Articles, Hindi Jokes, Hindi News, Hindi Nibandh, Hindi Letter Writing, Hindi Quotes, Hindi Biographies

Marathi Essay on "Doorchitravani Shap ki Vardan", "दूरचित्रवाणी शाप की वरदान " for Kids, Students, Marathi Essay, Paragraph, Speech for class 7, 8, 9, 10, and 12 Exam.

दूरचित्रवाणी शाप की वरदान 
Doorchitravani Shap ki Vardan

दूरचित्रवाणीचा प्रसार मुख्यतः शहरांतून मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. तरीही काहीजणांना दूरचित्रवाणी हा शाप वाटू लागला आहे. असे का बरे?

दूरचित्रवाणीच्या प्रलोभनातून काही धोके जरूर संभवतात. शहरात जागेची समस्या फारच बिकट असल्याने, विशेषत: चाळीतील व झोपडपट्टीतील लोक दूरदर्शनवरील कार्यक्रम अगदी जवळून पाहत असल्यामुळे, त्याचा त्यांच्या दृष्टीवर वाईट परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. कार्यक्रम पाहण्यासाठी लहान जागेत खूप माणसे तासन्तास बसतात, हेही आरोग्याच्या दृष्टीने विघातक आहे. टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या विविध वाहिन्यांवरील चित्रपटांमुळे मुले क्रीडांगणाला दुरावली, ग्रंथवाचनाला पारखी झाली. टीव्हीवर कार्यक्रम पाहताना कुणी पाहुणे आले, तर त्यांचे यथोचित स्वागत होत नाही.

दूरचित्रवाणीवरील बहुसंख्य कार्यक्रम हे चित्रपटांवर आधारित असतात. त्यामुळे युवावर्ग त्या आभासामागे धावतो व वास्तवाला पार विसरून जातो. विविध कार्यक्रमांतून जाहीर केलेली मोठमोठ्या किमतीची बक्षिसेही त्याला स्वप्ननगरीत नेतात आणि प्रामाणिक प्रयत्नांचे व कष्टांचे महत्त्व त्याला वाटेनासे होते.

वास्तविक पाहता दूरचित्रवाणी हे ज्ञानप्रसाराचे प्रभावी माध्यम आहे. खेड्यांतील शेतकऱ्याला, मजुराला त्यांच्या विविध उपयुक्त अशा व्यवसायांचे ज्ञान देता येईल, आज आपल्यापुढे प्रौढ शिक्षणाचा यक्षप्रश्न उभा आहे. हा प्रश्न सोडवण्यास दूरचित्रवाणीची मोलाची मदत होईल. ज्ञानप्राप्तीत केवळ ऐकण्‍यापेक्षा , पाहणे व ऐकणे अधिक परिणामकारक ठरते. 'दूरदर्शन'मध्ये तर पाहणे व ऐकणे दोहोंचाही समन्वय आहे. या साधनांच्या मदतीने साऱ्या जगाचा फेरफटका आपल्याला घरबसल्या करता येतो.

तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, परराष्ट्रीय नेत्यांच्या भेटीच्या घटना, जगात चाललेल्या विविध खेळांच्या स्पर्धा या सर्व गोष्टींचा लाभ आपल्याला दूरचित्रवाणीमुळे घरी आरामात बसून घेता येतो. हजारो वर्षांपूर्वी लिहिले गेलेले रामायण, महाभारत हे ग्रंथ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले ते दूरचित्रवाणीमुळेच ना!

अशा या दूरचित्रवाणीला शाप समजून दूर लोटणे योग्य होणार नाही. मात्र दूरचित्रवाणीचे कोणते कार्यक्रम पाहायचे याबददल कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांनी तारतम्याने विचार करणे आवश्यक आहे. अभ्यासाला पूरक ठरणारे कार्यक्रम विदयार्थ्यांनी अवश्य पाहावेत.

'आधी अभ्यास, मग मनोरंजन' हे पथ्य मात्र दूरदर्शनवरील इतर कार्यक्रमांच्या बाबतीत अवश्य पाळावे. असे झाल्यास दूरदर्शन आपल्याला मोठे वरदानच ठरणार आहे, यात शंका नाही.Post a Comment

0 Comments