एका पुतळ्याचे मनोगत 
Eka Putlyache Manogat

'पुण्याचे रूपांतर लवकरच पुतळ्यांच्या शहरात होईल' पुण्याच्या 'दैनिक सकाळ'मध्ये कुणीतरी वर्तविलेले हे भविष्य. त्यामागचा उपरोध बराच काळ मनात रेंगाळत राहिला. टीकाकाराने पुण्यातील एका रस्त्यावरच्या पुतळयाची मोजदाद केली होती आणि मग असे हे पुतळे जागोजागी असावेत की नसावेत याबद्दलची उलटसुलट मते वाचकांनी मांडली होती. मनात आले या वादविषयात त्या पुतळ्यांचे कोणी मत घेतले आहे का?

"किती वेडी आहेस ग! अग पुतळयांच मत कोण घेणार? पुतळयांना आपलं मत मांडता आलं असतं तर मग त्यांना पूतळे म्हणता आले असते का?" आता मात्र त्या पुतळ्याने आपले पुतळेपण काही काळ बाजूला ठेवले होते आणि तो स्वतःचे मन उघडे करीत होता.

"अरे माणसा, आमच्यासारखे दुर्दैवी आम्हीच. कारण आम्हांला रस्त्यांवर उभे करणारे लोक, त्यातून आपला काही ना काही स्वार्थच साधत असतात; आणि गप्पा मात्र स्वार्थत्यागाच्या करतात. केवढी विसंगती आहे ही! पण तेही आम्ही निमूटपणे सहन करतो. एखादी थोर व्यक्ती विशिष्ट ध्येयासाठी जीवनभर अखंड झिजते. प्रसंगी त्या ध्येयासाठी प्राणही ठेवते आणि मग तिच्या मृत्यूनंतर तिच्या ध्येयतत्त्वांना हरताळ फासला जाऊन तिचा पुतळा उभारला जातो. भांडवलशाहीला विरोध करणाऱ्या नेत्याच्या पुतळ्यासाठी भांडवलदारांकडून चंदा गोळा केला जातो. केवढा हा दैवदुर्विलास!

“मग सांगा, आवश्यकता आहे का अशा पुतळयांची? पुतळे उभारले जातात ते उभारणाऱ्या व्यक्तींचा वा संस्थेचा दानशूरपणा, मोठेपणा सिद्ध व्हावा म्हणूनच. थोरांची ही थोर स्मारके इतरांना स्फूर्तिदायक होतात ही एक फसवी, लोणकढी थाप आहे. लोकांना आपल्या दैनंदिन व्यवहारात त्यांची आठवणही होत नाही.

"माझा जन्मही अशाच काही धनवंतांच्या गर्वातून झाला आहे. ज्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व मी करीत आहे तिच्या पासंगालाही उभं राहण्याची या धनवंतांची योग्यता नाही. आपण विचारवतांना मानतो, याचे भव्य प्रदर्शन हा या पुतळानिमितीमागचा त्याचा हेतू आहे. त्या महान व्यक्तीचा गौरव करण्याच्या निमित्ताने त्यांनी स्वतःचीच नावे लिहून, स्वतःचाच गौरव करून घेतला आहे. खरं सांगू, माझ्या अनावरणाचा तो दिवस माझ्या जीवनातील सर्वांत आनंदाचा दिवस असावयास हवा होता, पण तोच माझ्या दुःखाचा दिवस ठरला. कारण तेव्हापासूनच माझी ही विटंबना सुरू झाली आहे.”

"उन्हापावसात मी येथे तटस्थपणे उभा आहे. माझ्याभोवती अनेक थोर व्यक्तीही माझ्यासारख्याच पुतळ्यांच्या रूपांत उभ्या आहेत. अंगावर कावळे, चिमण्या व इतर पाखरे घाण करीत आहेत. पण याहूनही मला उबग आला आहे तो काही लोकांच्या हीन वृत्तीचा. या लोकांच्या विघातक गोष्टींपूढे पक्ष्यांनी केलेल्या घाणीचे काहीच वाटत नाही. समाजकंटक लोकांची ही कुटिल कृत्ये पाहून मन बेचैन होते, पण मी काय करणार? बोलूनचालून मी एक पुतळा!" एवढं बोलून तो आवाज बंद झाला आणि तो बोलणारा पुतळा पुनश्च मूक पुतळा झाला.