दरवेशाचे मनोगत
Darveshache Manogat
“मी आहे एक दरवेशी. दारोदार हिंडणारा. बरोबर आहे माझा सारा कुटुंबकबिला. त्यांत मुख्य आहे भालू-म्हणजे हे माझे काळे अस्वल. नंतर माझी पत्नी आणि माझी दोन चिल्लीपिल्ली. सध्या तरी हा भालूच आम्हां सर्वांचा पोशिंदा आहे.
"माझ्या वाडवडिलांकडून हा व्यवसाय माझ्याकडे आला. माझा बापही दरवेशीच होता. त्याच्याबरोबर मी लहानपणी गावोगाव हिंडत असे. मी केव्हा मोठा झालो आणि ही अस्वलाची दोरी माझ्या हातात कशी आली हे मला उमगलेच नाही. बाप थकला होता, तरीही आमच्याबरोबरच हिंडत होता. कारण आम्हांला कायमचं असं घरच नाही. अशाच भटकंतीत कुठेतरी बापाला मरण आलं. तिथेच त्याला अग्नी दिला.
“लोकहो, हेच माझे दुःख आहे. कसले हे जगणे! पाय दुखेस्तोवर आम्ही चालत राहतो. गाव लागला की खेळ करतो. कधी कुठे बरी मिळकत होते तेव्हा आम्ही भालूला प्रथम पोटभर खायला घालतो. भालूला सर्व भाजीपाला आवडतो. पण मांस खायला मिळाले की स्वारी खूष. भालूला सर्वांत प्रिय म्हणजे 'मध.' मी त्याला सणावारी भरपूर मध खायला घालतो. आमची चार माणसांची गूजराण बहधा होते ती वडापावांवर. जेव्हा एखादया गावात आमचा मुक्काम असतो तेव्हाच आम्ही तीन दगडांची चूल पेटवितो आणि त्याच वेळी पोरांना भाकरी मिळते.
“लोकहो, आता मला या भटक्या जीवनाचा कंटाळा आला आहे. पण मी दुसरे कोणतेच काम करू शकत नाही. मी पूर्णपणे अडाणी आहे. मला कधी शिकायला मिळाले नाही. या अस्वलाबरोबरच मी मोठा झालो. म्हणून त्याच्याबरोबर नाचणे, उड्या मारणे एवढेच मला जमते. आज त्याचीच शिक्षा मी भोगत आहे. वर्षातील एकही दिवस मला पोटभर जेवण मिळत नाही. लोक खेळ बघायला गर्दी करतात, अस्वलाचे काम पाहून टाळ्या पिटतात. पण पैशासाठी थाळी फिरविली की मात्र पळ काढतात. काही खेड़त लोक अस्वलाच्या केसांचा ताईत विकत घेऊन आपल्या लेकरांच्या गळ्यात घालतात. खरं सांगू का! माझा काही या ताईतांवर विश्वास नाही, तरी पण मी ताईत तयार करून विकतो. कारण त्यांतच मला मिळकत होते. चार आणे खर्च येणारा ताईत मी दोन रुपयांना विकतो.
“मायबाप लोकहो! माझं तुमच्याकडे एकच मागणे आहे. आता मी असं ऐकतो की भटक्या लोकांच्या मुलांसाठी सरकार शाळा काढणार आहे. मला माझ्या या दोन्ही मुलांना शिकवायचे आहे. त्यांच्या तरी नशिबी हा दरवेशीपणा नको. निघाली आहे का अशी शाळा? तिथं माझी ही कोकरं राहतील! मग त्यांच्यासाठी कितीही कष्ट करायला लागले तरी मी व माझा भालू करू. अगदी शेवटपर्यंत मी आणि भालू एकमेकांना सोडणार नाही.
0 Comments