गावकुसाबाहेरची वस्ती आहे 
Gavakusabaharaci vasti ahe


मी गावकुसाबाहेरची वस्ती आहे' “पाहुण्यांनो, क्षणभर थांबा. नाकावर रुमाल ठेवून तुम्ही येथून झपाझप जात आहात. पण थांबा. मला तुमच्याशीच बोलायचे आहे. इतका वेळ तुम्ही गावाची प्रशंसा करीत होता. पण आता मला पाहुन नाक मुरडता. किती कृतघ्न आहात तुम्ही! 'गाव तिथं महारवाडा असायचाच' असे तुम्ही उपेक्षेने म्हणता. पण खरं सांगू का, हा महारवाडा आहे म्हणूनच गाव एवढा स्वच्छ आहे. गावातला केरकचरा हा महार गोळा करून आणतो. मेलेले ढोर हा मांग ओढून आणतो. या वस्तीतील ही सारी मंडळी गावासाठी राबत असतात आणि त्याबद्दल या लोकांना काय मिळते? तर केवळ शिव्याशाप.

"निसर्गाने सर्वांसाठी भरभरून दिलेले पाणीही या लोकांना मिळत नाही. तहान भागायची मारामार, मग त्यांनी स्वच्छ तरी कसे राहायचे? यांची पोटे तर सदा रिकामीच. मग जे काही मिळेल ते खायचे. 'शिळेपाके, आंबलेले' या शब्दांशिवाय दुसरे शब्द त्यांना माहीतच नाहीत. कष्टांशिवाय ‘कचाकचा भांडायचे' एवढीच त्यांची दुसरी करमणूक. कोणत्याही रोग-साथीला ही वस्ती प्रिय, मग फटाफट मृत्यू. नव्या जन्माचा आनंद नाही. मृत्यूचा शोक नाही. आनंद-शोक करायला येथील माणसांजवळ वेळ आहे तरी कुठे?

 “आता हे गावकुसाबाहेरील जगही जागे व्हावयास लागले आहे. येथील काही मुले शहरात जाऊन शिक्षण घेत आहेत. त्यांच्यातला माणूस जागा झाला आहे. ते आपल्या लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊ लागले आहेत. गावाने दिलेले फाटके कपडेच तराळाने घातले पाहिजेत, नवीन कोरे कपडे अंगावर चढवायचे नाहीत, ही वर्षानुवर्षे चालत आलेली समजूत ते पुसू पाहत आहेत. ग्रहणाच्या वेळी 'दे दान सुटे गिराण' म्हणून दान मागायचे नाही अशी शिकवण ते आपल्या लोकांना देत आहेत. त्यांच्यातील भटक्या लोकांच्या मुलांना स्थिर जीवन लाभावे म्हणून त्यांची खटपट चालू आहे. त्यासाठी आता येथे शाळा पण सुरू झाली. गावातील विहिरीवर ते आपला हक्क आता संगू लागले आहेत. गावकऱ्यांना हे कसे रूचणार? मग ते म्हणतात-'म्हारडा मातला आहे.' कधी कधी मला पेटवून दिले जाते. मारझोड तर नित्याचीच. पण लक्षात ठेवा, आता मी ऐकणार .... वर्षे तुम्ही मला गावाबाहेर ठेवलेत, पण आता येथेही नवे गाव वसणार आहे."