आरसा नसता तर 
Arasa Nasta Tara


आरसा नसता तर माणसाची मोठी गैरसोय झाली असती. स्वत:चे रंगरूप माणूस जाणू शकला नसता आणि मग स्वत:चीच तोंडओळख त्याला पटली नसती. परीक्षेत आपणाला लाभलेल्या यशाचा आनंद आपल्याला आरसा दाखवतो. आपल्या आवडत्या माणसाची दीर्घकालानंतर झालेली आतुरतेची भेट आरसा खुलवतो आणि एखादया दुःखद प्रसंगी सगळ्यांच्या नजरा चुकवून आपल्या डोळ्यांनी गाळलेले अश्रू हाच आरसा टिपून घेतो. आरसा हा माणसाचा फार जवळचा मित्र आहे.

आरशाला संस्कृतमध्ये आदर्श' म्हणतात. रूप जसे असेल तसेच आरसा दाखवतो. तो कुरूपाला सुंदर बनवू शकत नाही. म्हणजे आरसा हा 'प्रामाणिकपणाचा आदर्श' आहे. म्हणून तर आपण आरशाची उपमा देऊन म्हणतो, त्याचे मन आरशासारखे नितळ आहे. आरसा नसता तर सुंदर माणसांना आपल्या सौंदर्याची अवास्तव जाणीव झाली नसती आणि त्यामुळे कुरूप माणसांना वाईट वाटले नसते.


केशकर्तनालये, फोटो स्टुडिओ  अशा अनेक ठिकाणी आरसे मोठी कामगिरी बजावतात. आरसा नसता तर अनेक ठिकाणी सजावटीचे काम अपूर्ण राहिले असते. अनेक वैज्ञानिक प्रयोगांत आरशाला स्थान असते. आरसा नसेल तर ते प्रयोग अपूर्ण राहतील. अंतर्गोल भिंग-बहिर्गोल भिंग असलेले आरसे माणसांना हसवतात व ते मोटारींनाही उपयोगी पडतात. गावातील जत्रांत आरशांना महत्त्वाचे स्थान असते. आरसा नसेल तर ही सारी गंमत हरवून जाईल. तेव्हा असा हा बहुगुणी आरसा हवा आणि हवाच!

रोज आपण अशा अनेक गोष्टींचा वापर करत असतो की, त्यांचे अस्तित्वही आपण विसरलेले असतो. म्हणतात ना - अतिपरिचयात् अवज्ञा. (अति परिचयाच्या गोष्टीला किंमत न देणे ) तशी स्थिती आहे आपली आरशाच्या बाबतीत. अगदी सहजगत्या जातायेता आपण आरशात डोकावतो आणि आपण ठाकठीक आहोत ना याची खात्री करून घेतो. असा हा आरसा प्रत्येक घरात असतोच असतो. कधी तो एखादया भिंतीवर लटकत असतो, तर कधी एखादया मोठ्या कपाटाच्या दारावर, कधी एखादया सुंदरीच्या पर्समध्ये असतो, तर कधी एखादया मोठ्या दिवाणखान्याच्या दाराशी स्थानापन्न होऊन तो येणाऱ्या-जाणाऱ्याला त्याची छबी दाखवत असतो.

असा हा आरसा नसता तर - ? तर माणसाने आपली छबी कोठे पाहिली असती? एखादया मुलाखतीला जाताना, एखादया समारंभासाठी नटताना, माणूस पुनः पुन्हा आरशात डोकावतो आणि त्या आरशाला विचारतो- 'सांग दर्पणा, कसा मी दिसतो?' पण हा आरसा मात्र बेटा खरा प्रामाणिक ! उगाच नाही त्याला संस्कृतमध्ये 'आदर्श' म्हणतात. तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही आरशात दिसणार. आरसा तुम्हांला सुंदरही बनवत नाही वा तुमच्या कुरूपतेतही भर घालत नाही. म्हणून तर आरशाचा आदर्श व्यक्तीपुढे ठेवला जातो. कसे बना? कसे असा? - तर आरशासारखे स्वच्छ चारित्र्य असलेले.

आरसा हा माणसाला पुराणकालापासून परिचयाचा आहे. रामायणातील रडणाऱ्या रामाला आरशात चंद्र दाखवून मंत्री सुमंताने त्याची समजूत काढली होती. इतिहासकालातही हा आरसा आपल्याला भेटतो. चितोडच्या महाराणी पद्मिनीचे सौंदर्य अल्लाउद्दीनने आरशातच पाहिले होते. मोगल साम्राज्यातील 'आरसे-महाला'चे वर्णन आपण ऐकलेले आहे. त्या काळात घर, महाल, प्रासाद यांना सजवण्यात आरशांचे स्थान महत्त्वाचे होते.

आजच्या विज्ञानयुगातही माणसाला आरशाची मदत अनेक ठिकाणी घ्यावी लागते. भौतिकशास्त्रात प्रकाशाचे नियम हे आरशाच्या साहाय्यानेच समजून घेतले जातात. अनेक वस्तू निर्माण करताना आरशांचा उपयोग होतो. मग एखादया आरशात आपण गोलमटोल होतो, नाहीतर एखादया आरशात आपण उंचचउंच झालेलो असतो. ही गंमत सोडली तरी, वाहन चालवताना-- मग गाडी असो वा बाईक - आरसा आपल्याला आपल्यामागून येणाऱ्या वाहनाची कल्पना देत असतो. हा आरसा नसेल तर चालकाचा फार गोंधळ उडेल. अभिनय करणारे कलावंत आरशात पाहून सराव करतात म्हणे... !

असा हा आरसा नसेल तर माणसाची अशी अनेक प्रकारे गैरसोय होईल. मग तो आरशाची जागा कोण घेऊ शकेल याचा शोध घेऊ लागेल.