माणसे अमर झाली तर
If People Become Immortal
माझा छोटा भाऊ विचारीत होता, “दादा, देवांना 'त्रिदश' का म्हणतात?" मी म्हणालो, "अरे, त्यांना माणसांसारखी चौथी वार्धक्यावस्था नाही.देव कधी मरत नाहीत." म्हणजे देव अमर आहेत. “देवांप्रमाणेच माणसे अमर झाली तर " त्याने प्रश्न निर्माण केला.
खरोखर, देवांना मिळालेली संजीवनीची कुपी माणसापर्यंत आली तर? नाहीतरी आज माणसाचे त्या दिशेने प्रयत्न चालू आहेतच. रक्तदान, मूत्रपिंडदान असे अवयव दान करून, अवघड शस्त्रक्रिया पार पाडून आणि प्रभावी औषधोपचार करून तो माणसाला मृत्यूच्या दारातून मागे फिरवितो. आज माणसाची आयुर्मर्यादा वाढली आहे आणि मृत्युसंख्या घटली आहे; तरीपण मानव मृत्यूवर पूर्णपणे मात करू शकलेला नाही. आजही माणूस मर्त्य आहे. अशा या मानवाला संजीवनी गवसली तर....
तर प्रथम ज्याच्या हातास ती संजीवनी-अमृत-गवसेल तो लक्षाधीश, कोट्याधीश होईल. मग या अमृताचा काळाबाजार' होईल. कारण कोणतीही गोष्ट अदृश्य करून तिचा काळाबाजार करण्यात माणस मोठा पटाईत आहे. मग या अमृतातही भेसळ होईल व थोड्याच दिवसांत या अमृताची नक्कल केलेले कृत्रिम अमृतही बाजारात अवतरेल.
विचार करण्याचा मुद्दा असा आहे की, माणसाला अमृत गवसल्याने तरी त्याचे दुःख संपेल का? तो सुखी होईल का? होईल, कारण त्याला त्यामुळे आपल्या प्रिय माणसांचा वियोग होणार नाही. एक-एक कुटुंब म्हणजे पारंब्या फुटलेला मोठा वटवृक्षच होईल. पण यामुळे मात्र समाजाला नको असलेली दुष्ट माणसे देखील अमर होतील की! असे घडले तर मात्र माणसे सुखी होण्याची शक्यता कमीच. शिवाय 'अतिपरिचयात् अवज्ञा' या उक्तीनूसार अमरत्व प्राप्त झालेली ही माणसे एकमेकांचा दुस्वास करू लागतील. शिवाय या अनुषंगाने विचार करता, दोन पिढयांतील विचारांचे अंतर हीसुद्धा एक चिंतेची बाब ठरेल. आज अनेक घरांतून, समाजांतून अनेक त-हेचे वाद निर्माण झाले आहेत. माणसे अमर झाली तर हे पिढीतील विचारांचे अंतर फारच वाढेल. कुटुंबात, समाजात तीन-चार पिढ्या आढळतील. मग वादांना काय तोटा?
माणसाला अमरत्व प्राप्त झाले की, लोकसंख्या बेसुमार वाढणार आणि वाढत्या बेकारीचा प्रश्न 'आ' वासून उभा राहणार. आजही आपल्या देशापुढे बेकारीची समस्या आहेच, त्यामुळे मग माणसे अमर झाली तर हाहाःकारच उडेल. अन्नधान्य, पाणी, निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी आपल्याला आपल्या सवयी बदलाव्या लागतील. कदाचित या सर्व गरजा भागविण्यासाठी वैयक्तिक मालकी हक्काला राष्ट्रीय संपत्तीचे स्वरूप दयावे लागेल. प्रयोगशाळांना शरण जावे लागेल आणि निसर्गनिर्मित संपत्तीला मानवनिर्मितीची जोड दयावी लागेल.
आपण अमर आहोत असे एकदा सिद्ध झाले की, माणसातील साहसी वृत्तीला उधाण येईल. चंद्राबरोबर इतर ग्रहांवर जाण्यासाठीही माणूस पुढे सरसावेल. धाडसी स्पर्धांना ऊत येईल. पण येथे एक धोकाही संभवतो. मरण नाही म्हटल्यावर पुनर्जन्माची कल्पना नष्ट होईल. त्याबरोबरच पापपुण्याचा निवाडा होण्याची कल्पनाही लोप पावेल. त्यामुळे माणूस दुष्कृत्ये करताना कचरणार नाही, ऐहिक जीवनात गुंतलेला असताना तो अध्यात्माचा विचार करणार नाही आणि मग मानवी जीवन क्षुद्र बनेल
या साऱ्या विचारांत एक धोका आपण विसरलो आणि तो म्हणजे माणूस अमर झाला तरी तो अजर होणार का? तसे नसेल तर माणसाला हे अमरत्व नकोसे होईल. जखमेची वेदना घेऊन शोकाकूल अवस्थेत फिरणारा चिरंजीव अश्वत्थामा आपल्या परिचयाचा आहेच. त्याला आपले चिरंजीवित्व नकोसे झाले होते. त्याप्रमाणेच माणसाची अवस्था होईल व तो देवाकडे गा-हाणे घालील, “देवा, सोडव रे बाबा आता या यातनांतून, लवकर मरण येऊ दे."
0 Comments