आज ज्योतिबा अवतरले तर 
Aaj Jyotiba Avtarle Tar

स्वार्थाने बरबटलेल्या आजच्या समाजावस्थेत जेव्हा एखादा अगतिक माणूस आदर्श शोधत हिंडायला लागतो तेव्हा वर्तमानकाळात तर त्याची पूर्ण निराशा होणे स्वाभाविकच आहे. परंतु जेव्हा का तो गेल्या शतकाचा वेध घेऊ लागतो, तेव्हा त्याला हिमालयासारखी उत्तुंग अशी अनेक व्यक्तिमत्त्वे भेटतात आणि मग अशा या अगतिक माणसाचे मन "रितेच जीवन सारे। ही तहान सांगा केव्हा संपायची?' या विचाराने आक्रंदू लागते.अशा मानसिक संभ्रमावस्थेत असताना मनात येते, आज जोतिबा अवतरले तर.

 

जोतिबा आज अवतरले तर ते आनंदित होतील की खंतावतील? असा प्रश्न पडतो. ज्या स्त्री-शिक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर अट्टाहास केला ती स्त्री सुशिक्षित झालेली पाहन त्यांना आनंद होईल; पण त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यांत पाणीही येईल. कारण स्त्रीवरचे अन्याय आजही संपलेले नाहीत. कारणे बदलली असतील; पण छळ तसाच चालू आहे. त्या काळी विधवा स्त्रीची मानहानी करून तिला घरातील विहिरीचा मार्ग दाखविला जात असे; तर आज स्त्रीला जिवंत जाळण्याच्या घटना घडताहेत.


ज्या दलितांच्या उद्धारासाठी जोतिरावांनी समाजाचा रोष ओढवून घेतला तो दलित तरी सुखी आहे का? जोतिबांनी आपल्या घरातील आड मुक्त करून या अस्पृश्यांची तहान भागविली; पण आज गावोगावी 'एक गाव एक पाणवठा' हा कार्यक्रम योजूनही खेडोपाडी हा अस्पृश्य अजूनही एका व्यापक अर्थाने तहानलेला आहे. आजही त्याची वस्ती गावकुसाबाहेरच आहे. जोतिराव आजअवतरले तर त्यांना आढळेल की, त्यांच्या मागणीनुसार आज शासनाने या मागासलेल्या लोकांना अनेक सवलती दिल्या आहेत, शिक्षणाच्या सोयी उपलब्ध केल्या आहेत; पण त्यांनी हा हरिजन सुखी झाला आहे का? सुशिक्षित झाला आहे का? नाही. फार थोड्या संख्येने तो साक्षर झाला आहे आणि जे शिकलेसवरले आहेत ते आपल्या समाजासाठी काही करीत आहेत का? याचा विचार केला तर निराशाच पदरी पडेल.बहुसंख्य दलित अजूनही जुन्या संस्कारांच्या, रूढींच्या पिंजऱ्यातच बंदिस्त आहेत.


जोतिबांना त्यांच्या 'शेतकऱ्याचा असूड' खेड्यातील भिंतीवर दिसेल. पण त्यांच्या कल्पनेतील खेडी तेथे आढळणार नाहीत. बहुतेक खेडी ओस पडलेली दिसतील. हा जमिनीचा पुत्र पोटार्थी होऊन शहरात गर्दी करताना त्यांना आढळेल. शेतकऱ्यांतही जोतिबांना एक नवा अपरिचित वर्ग आढळेल. तो म्हणजे 'सधन शेतकरी'. जोतिरावांच्या हयातीत या वर्गाचा उदय झाला नव्हता. शेतमजूर मात्र पूर्वीपेक्षाही अधिक दरिद्री झालेला त्यांना आढळेल पुण्याच्या बाजूला हिंडताना मात्र त्यांना आपल्या सावित्रीचे आगळे स्मारक दिसेल आणि ते म्हणजे 'सावित्रीबाई फुले दत्तक योजना'. गरीब घरांतील विदयार्थिनींच्या शिक्षणाची झालेली ती सोय पाहुन जोतिबांना गदगदून येईल. सावित्रीच्या श्रमाचे चीज झाले, या विचाराने ते आनंदित होतील आणि मग जोतिबा एक अर्ज लिहितील. कोणाला माहीत आहे? प्रत्यक्ष त्यांच्या निर्मिकाला-भगवंताला. कशासाठी? स्वर्गवासाची सुट्टी घेऊन ते भूलोकावर वास्तव्याला येतील आणि पुनश्च आपल्या कामाला लागतील.