इंटरनेट शाप कि वरदान 
Internet Shap ki Vardan

निसर्गाने दिलेल्या शक्तीचा वापर हा माणसाच्या मतावर आणि त्याच्या माणुसकीवरच अवलंबून आहे. भौतिक सुख प्राप्त करण्याकरिता मनुष्याने केलेल्या अविरत मेहनतीचे फळ म्हणजेच आजच्या भौतिक सुधारणा होय. त्यांपैकी इंटरनेट  हे सुद्धा एक होय. हे दिव्य ज्ञान आता वरदान आहे की शाप हे खालील मुद्द्यांवरून ती स्पष्ट करू इच्छितो.

इंटरनेटचा वापर मुख्यत्वे संकेतस्थळांवर (वेबसाईट) साठवलेल्या माहितीची देवाणघेवाण करण्याकरिता होतो.  इंटरनेटच्या माध्यमातून आपण काही गोष्‍टींचा उत्कृष्ट वापर करू शकतो. जसे e - बँकिंग, e - कॉमर्स, e - चौपाल, e - मेल इत्यादी. म्हणजे आज इंटरनेट वापर ही नित्याची बाब झाली आहे.


इंटरनेटला मेलच्या (संदेशाच्या) माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य भारतीय वंशाच्या अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या 'साबीर भाटीया' या युवकाने 'हॉटमेल'चा शोध लावून केले. सध्या न्यूयॉर्क शिकागो, पॅरीस इत्यादी ठिकाणी अनेक कंपन्यांचे 'माहिती साठवणूक केंद्रे' आहेत त्या माध्यमातून भूस्थिर उपग्रहाच्या साहाय्याने संकेतस्थळांचा वापर करून हवी ती माहिती इंटरनेटवरून मिळवता येते.


इंटरनेटचे संकेत स्थळ असलेले 'Google Earth' हे लष्‍करी दृष्‍टीकोनातुन बघीतले  एक शापच आहे. उपग्रहाच्या साहाय्याने जगातील कुठल्याही ठिकाणांची चित्रे चित्रफिती कोणत्याही अडथळ्याशिवाय बघणे हे लष्करीदृष्‍टीकोनातुन अतिशय हानिकारक आहे. 


'इंस्टंट न्यूज'सारखे 'ब्लॉग' तयार होण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. त्यामुळेच चुकीची  माहिती सर्रास उपलब्ध असते. ही सामाजिक राजकीयदृष्ट्या गंभीर बाब आहे. 'व्हायरस' ही इंटरनेटला लागलेली कीडच होय. अशी प्रोग्राम्स तयार करणे ही समाजाला लागलेली कीड, असाध्य रोग आहे. विशेषतः इंटरनेटच्या माध्यमांतून मुलींसोबत होणाऱ्या गैरव्यवहाराचे प्रमाणसुद्धा अतिशय जास्त वाढले आहे.


स्वतःची ओळख लपवण्याची सुविधा असल्याने कोणतीही प्रतिक्रिया होण्याच्या विचाराने सामाजिक, राजकीय, आर्थिक गैरव्यवहारांचे प्रमाण गेल्या - वर्षांत खूप वाढले आहे. वरील गैरव्यवहार, गैरप्रकार इतके जास्त वाढले आहेत की त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 'सायबर क्राईम विभागांची' स्थापना करावी लागली. म्हणजे मानव जातीला ठरलेला शापच आहे.


पण याच इंटरनेटमुळे जगातील प्रत्येक व्यक्ती एक-दुसऱ्याच्या अतिशय जवळ आला, त्यांचा वेळ वाचला, त्यांच्यात आपुलकी निर्माण होण्यास मदत झाली. जग प्रेमाने जिंकता येते असे म्हणतात, त्याच शब्दांना खरे करण्याचे कार्य इंटरनेट करते आहे. हवी असलेली माहिती क्षणार्धात तुम्हांला इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या मिळते, तुमचा फायदा होतो, वेळ वाचतो. पत्र व्यवहार, आर्थिक व्यवहार यांना लागणारा वेग हा १००० पटीनी वाढला झाला आहे त्‍यामुळे ही कामे कमी वेळात पुर्ण होत आहेत.  


देशादेशाविषयीची माहिती उपलब्ध असल्याने देशांना संपर्क करण्यास त्यातून सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक देवाणघेवाण करण्यास मदत होते, हा अतिशय मोठा फायदा आहे. आर्थिक व्यवहार हे वेळेच्या मर्यादेत जर झाले तर फायदेशीर असतात. इंटरनेटच्या माध्यमातून आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणावर होतो (शेअर मार्केट).


कित्येक जणांनी इंटरनेटच्या माध्यमातून लग्नसुद्धा जुळवली आहे. मन जुळली आहेत, लोक जवळ आली आहेत, विभिन्न देशांतील संस्कृतीचा परिचय एकमेकांस झाला... एकूणच जग अतिशय छोटे झाले आहे तर आपण याला शाप कसे म्हणणार हे तर वरदानच होय.