केल्याने देशाटन किंवा भटके बना 
Kelyane Deshatan Kinva Bhatke Bane

प्रवास करा, प्रवास करा, प्रवास करा" असा आग्रह भारत सरकार नभोवाणीवरून, दूरचित्रवाणीवरून करीत असते. त्यामागचा हेतू काय? यापासून सरकारला धनप्राप्ती होते, परदेशी पाहुणे आले तर परदेशी चलन मिळते. हे सरकारच्या दृष्टिकोनातून प्रवासाचे फायदे असले तरी आपल्या दृष्टिकोनातूनही प्रवासाचे फायदे असतात. केल्याने देशाटन मनुजा येते शहाणपण फार' असे आपल्या पूर्वसुरींनी सांगितलेले आहेच.

अलीकडे आपल्या लोकांमध्ये प्रवासाची आवड बरीच वाढीस लागलेली दिसते. शहराशहरांतून अनेक प्रवासमंडळे निघाली आहेत. विविध ठिकाणी त्यांच्या सहली निघत असतात आणि अनेक हौशी प्रवासी त्यांत सहभागीही होत असतात. शाळा-कॉलेजांतील विदयार्थ्यांच्यात तर सहल म्हणजे आनंदाची पर्वणीच. अशा सहलींतून खरोखरच काय साधते.

पूर्वी माणसे प्रवासाला निघत ती पुण्यसंपादनासाठी. 'जन्मास यावे नि काशीस जावे' अशी त्यांची मनीषा असे. साधारण उतारवयात, संसाराची जबाबदारी संपल्यावर ही माणसे यात्रा करण्यास निघत. त्यामागचा त्यांच्या कल्पनेतील हेतू एकच असे आणि तो म्हणजे जन्मभर झालेल्या चुकांचे परिमार्जन करणे आणि मुक्तीची अपेक्षा करणे.

आजच्या प्रवासात 'पुण्यसंपादन' हा हेतू नसतोच असे नाही, पण तो एकमेव हेतू नसतो. नवनवीन ठिकाणे पाहणे; निसर्गाची किमया जवळून निरखणे आणि मानवनिर्मित आश्चर्ये न्याहाळणे असे विविध हेतू त्यामागे असतात. पर्वतशिखरावरून दिसणारी दृश्ये, खळखळ वाहणारे झरे, भव्य, अजस्र आकाराचे दगडधोंडे, उंच कडे आणि अशा उंच कड्यांच्या कुशीत असलेल्या दऱ्या ही सारी निसर्गाची किमया माणसाला तोंडात बोट घालायला लावते. त्याचप्रमाणे मनुष्यनिर्मित भव्य म्युझियम्स, प्रचंड धरणे, विदयुन्निमितिगृहे, प्लॅनेटोरियम, अणुभट्टी, सागरसम्राट अशी एक ना दोन, अनेक आश्चर्ये पाहताना माणूस अवाक् होतो. आधुनिक युगातील हे चमत्कार पाहण्यासाठी देशाटन करण्याची नितांत आवश्यकता आहे हे खरेच.


केवळ 'नेत्ररुख' हाच काही या देशाटनामागचा लाभ नाही. अशा त-हेच्या सहली, असे प्रवास मानवी मनालाही अतिशय पुष्टीदायक ठरतात. अशा प्रवासांतून मनावरचे अनेक गंड गळून पडतात. सागराची विशालता पाहिल्यावर मानवी मनातील गर्वाचा फुगा फुटतो. हिमालयाच्या भव्यतेत सामाविलेली छोटीशी आनंदी तृणपुष्पे पाहून मानवी मनाचा ताठा गळून जातो, हेही नसे थोडके. प्राचीन काळात सागराची वेस ओलांडणे भारतीयांना निषिद्ध वाटत होते. तेव्हाचा माणूस संकुचित कूपमंडुक वृत्तीचा होता. शुद्धीकरण, प्रायश्चित्त अशा भोवऱ्यात तो गुरफटलेला होता. माणसाने जेव्हा आपल्या भोवतालचे हे तट तोडले तेव्हा त्याला आनंदाच्या दाही दिशा खुल्या झाल्या; विशाल अनुभवाचे भांडार खुले झाले, माणसा-माणसांमध्ये जवळीक निर्माण झाली. देशाटन करताना मानवाला उमगले की वर्ण, रूप वेगळे असले तरी सर्व मानवाच्या मनातील भावनांचा प्रवाह एकच आहे. देशाटनाचे हे लाभ नक्कीच अगणित आहेत; अमोल आहेत.


‘चराति चरतो भगः।' असा संदेश उगाचच नाही आपले पूर्वज देत. नव्या नव्या भूमीचे दर्शन घेण्यासाठी झपाटलेल्या भटक्यांच्या प्रयत्नांतूनच नव्या जगाचा शोध लागला. या साहसात संकटांना तोंड दयावे लागते आणि त्यावर मात करताना साहसवृत्तीला आव्हान मिळते. घरकोंबडा माणस दूरवस्थेला जातो, तर मोकळ्या वातावरणात विहार करणाऱ्या वैनतेयाला कार्याचे गगन तोकडे पडते. आजवरची माणसाची भटकंती मर्यादित जगाची आहे; पण उदयाची भटकंती ही तर अनंत अंतराळाची असणार आहे.