महात्मा गांधी 
Mahatma Gandhi

मानवतेचा मानदंड महात्मा गांधी यांची एका शब्दात ओळख करून दयायची झाली, तर त्यासाठी समर्पक शब्द आहे, 'महामानव', गांधीजी स्वत:ला नेहमी 'एक सामान्य माणूस' मानत असत. त्यांनी आपल्या हातून घडलेल्या चुका प्रामाणिकपणे कबूल केल्या आणि कोणताही कमीपणा न बाळगता त्या सुधारण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. कोणत्याही महान गोष्टीचे मोजमाप करण्यासाठी मानदंड वापरला जातो. मानवतेचे मापन करण्यासाठी वापरला जाणारा मानदंड म्हणजे 'गांधीजी' होय.

महात्माजींनी कोणतेही काम करताना मानवजातीचा विचार केला. ते वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी आफ्रिकेत गेले होते; पण तेथील भारतीयांची दैन्यावस्था पाहून ते त्यांच्यामागे उभे राहिले. तेथील भारतीय जनतेवर जे अमानुष कायदे लादले गेले होते, त्यांच्याविरुद्ध ते खंबीरपणे झगडले.


भारतात परत आल्यावर त्यांनी प्रथम संपूर्ण भारताचा प्रवास केला. सामान्य भारतीय हे अर्धनग्न अवस्थेत जिवन ज‍गतात, अर्धपोटी राहतात हे पाहून ते अस्वस्थ झाले. त्यांनी आपल्या पोशाखात, आपल्या आहारात आमूलाग्र बदल केला. भव्य प्रासादतुल्य बंगल्यात राहण्यापेक्षा  छोट्या वस्‍तीत राहणे त्यांनी पसंत केले. सर्व लोकांना समाजात समान वागणूक हवी, असे आग्रहपूर्वक सांगणारे महात्माजी कचराकुंडी साफ करण्याचे काम करायला स्वत: सदैव पुढे येत असत.

मीठ म्हणजे सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजेचे प्रतीकच! त्या मिठावर बसवलेला कर त्यांना अन्यायकारक वाटला; म्हणून त्या अन्यायाविरुद्ध झगडण्यासाठी महात्माजीनी 'दांडी यात्रा' काढली. महात्माजींंनी कधीही कोणत्याही मानसन्मानाची अपेक्षा केली नाही. सर्व धर्मातील व सर्व जातीजमातीतील जनतेने एकदिलाने राहावे, यासाठी ते जीवनभर झटले. एका प्रार्थनासभेत त्यांची हत्या झाली. आज गांधीजी देहाने हयात नाहीत; पण त्यांच्या अलौकिक कार्याने  ते अमर झाले आहेत.