माझा आवड़ता लेखक  
My Favorite Author


विविध कलांच्या क्षेत्रांत ते लीलया वावरले. विशेष म्हणजे पु.लं.ना जो जो आनंद गवसला, जेथे जेथे आनंद मिळाला, तो त्यांनी सर्वांसाठी मुक्तपणे उधळला. आपल्या एका मुलाखतीत पु.ल. म्हणाले होते, 'मला जेव्हा जेव्हा काही चांगले दिसते, आवडते तेव्हा तेव्हा ते दुसऱ्याला सांगण्यासाठी मी उत्सुक असतो, आतुर असतो.' म्हणून पु.ल. हे केवळ शब्दार्थी आनंदयात्री नव्हते, तर ते खरोखरीचा आनंद उधळणारे 'आनंददात्री' होते.


पु.लं.नी मराठी माणसाला काय दिले, असा प्रश्न विचारण्याऐवजी पु.लं.नी मराठी माणसाला काय दिले नाही? असेच विचारावे लागेल. अशा या अष्टपैलू कलावंताचा जन्म १९१९ साली झाला. त्यांचे शिक्षण मुंबई व पुणे येथे एम्.ए.,एल्.एल्.बी. पर्यंत झाले. त्यांनी संस्कृत व बंगाली या भाषांचा परिश्रमपूर्वक अभ्यास केला. त्यांनी लिपिक, शिक्षक, प्राध्यापक अशा विविध स्तरांवर नोकऱ्या केल्या. आकाशवाणीवर नाट्यविभागप्रमुख म्हणून काम केले. दिल्ली दूरदर्शनवरील कार्यक्रमांचे ते पहिले निर्माते होते.


पु.लं.जवळ असामान्य निरीक्षणशक्ती होती. त्यांच्या लहानपणी घरी आलेल्या पाहुण्याचे अचूक निरीक्षण करून आपला हा बाळ काही जगावेगळे बोलणार नाही ना, अशी भीती त्यांच्या आईला वाटे. पण याच निरीक्षणशक्तीतून पु.लं.च्या 'व्यक्ती आणि वल्ली' साकार झाल्या. 'गणगोता 'तील आप्तजन चिरंजीव झाले. पु.लं.च्या लेखनाचे वैशिष्ट्य असे की, अनेकदा वाचून, पाहून वाचकांनाही ती सारी माणसे आपलीच, जवळचीच वाटू लागली. 'बटाट्याची चाळ' या पु.लं.च्या पुस्तकातील प्रत्येक माणूस आपल्यापरीने वेगळा आहे.

पु.लं.नी भरपूर प्रवास केला आणि 'अपूर्वाई' , 'पूर्वरंग' आणि 'वंगदेश' अशा पुस्तकांतून तो वाचकांपुढे मांडला. युरोपातील 'कापी' बेटावरील निळाईच्या सौंदर्याने पु.लं.चे अंत:करण भरून आले आणि त्यांना आठवला ज्ञानेश्वरांनी वर्णिलेला 'कोटिचंद्रप्रकाश'.


पु.लं.चे चित्रपट, नाटके, एकपात्री प्रयोग सारेच लोकांनी डोक्यावर घेतले. त्यांतल्या संवादांनी, गाण्यांनी, अभिनयाने आणि दिग्दर्शनाने रसिकांना अमाप आनंद दिला. पु.लं.चा विनोद हा अभिजात होता. कुणालाही न दुखावणारा, कुणाच्याही व्यंगावर बोट न ठेवणारा. शब्दाशब्दांवर ते लीलया कोट्या करत. त्यांचे 'कोट्यधीश' हे पुस्तक वाचकाला कोणत्याही परिस्थितीत खुलवते.


पु.ल. स्वतः मूलतः कविमनाचे होते, संगीतकार होते. त्यांचे 'नाच रे मोरा' हे गाणे ऐकल्यावर प्रत्येक मराठी बालकाचे बालपण सुखावून जाते. पु.ल. आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई हे दोघेही काव्यवेडे. स्वानंदासाठी ते नेहमीच कविता वाचत, म्हणत. त्यांना शेकडोंनी कविता पाठ होत्या. पण त्यांच्या मनात आले, हा आनंद आपण इतरांपर्यंत पोहोचवला तर... आणि मग भाईंनी आणि सुनीताताईंनी कविवर्य बोरकर, मढेकर आणि आरती प्रभूच्या कवितांच्या वाचनाचे जाहीर कार्यक्रम केले. स्वत:ला मिळालेला आनंद हजारो श्रोत्यांवर उधळून दिला.


पु.लं.च्या बाबतीत म्हणावे लागते की, 'देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी आमुची झोळी'.कोठे कोणी चांगले काम करत आहे, पैशासाठी काम अडले आहे असे कळले की, पु.लं.चा मदतीचा हात तेथे पोहोचत असे. कुणा एका आडवळणाच्या गावी एक प्राचार्य आपल्या महाविदयालयासाठी धडपडत आहे, हे कळल्यावर पु.ल. फाऊंडेशन तेथे मदतीला गेले. 

रक्तपेढ्या, रुग्णालये, मुक्तांगण, शैक्षणिक संस्था... साऱ्यांना भरभरून मदत पोहोचली. कुणी तरुण तज्ज्ञ डॉक्टरीण, व्यसनाधीनांना व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी धडपडत आहे, असे कळल्यावर हा थोर दाता तेथेही पोहोचला. मग सांगा, पु.ल. हे खरोखरच एक आगळेवेगळे आनंदयात्री नव्हते का?