माझा आवड़ता समजसुधारक 
Majha Aavdta Samjsudharak


समाजाच्या दु:खांशी नातं सांगणाऱ्यांना, शतकांची कुंपणं अडवत नाहीत. ते शब्द कुरवाळीत नाहीत अन् खाजगी व्यथाही गोंजारत नाहीत! सभोवतीच्या दुःखांना आव्हान देत येतात. या समाजातल्या दु:खभरल्या रात्री अन् अंधारलेली मने उजळून लख्ख करतात. अशी ही परमेश्वराप्रमाणे पूजनीय व्यक्तिमत्त्व म्हणजेच आपले समाजसुधारक होत. असाच एक वंदनीय समाजसुधारक मराठी मातीत जन्मलेला आहे, जो आज महाराष्ट्राचंच नव्हे तर जगाचं भूषण ठरला आहे आणि तो म्हणजे बाबा आमटे! मुरलीधर देवीदास आमटे हे त्यांचं खरं नाव. 

२६ डिसेंबर १९१४ रोजी हिंगणघाट येथे एका कर्मठ जमीनदाराच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. १९४९ मध्ये ‘स्कूल ऑफ ट्रॉपिकल डिसीझेस्' इथे त्यांनी महारोग्यांवरील अभ्यासक्रम पूर्ण केला. १९५० मध्ये त्यांनी 'महारोगी सेवा समिती' स्थापन केली. बाबांना ज्या क्षणी 'क्षितीज नसलेले पंख' लाभले असल्याची जाणीव झाली, त्याच क्षणी नियतीने त्यांच्या पुढ्यात परीक्षेतल्या प्रश्नपत्रिकेसारखा, तो गटारात रूतलेला महारोगी आणून टाकला, त्याचक्षणी महारोग्याच्या शरीराच्या जखमा आधुनिक उपचारांनी बऱ्या करणे सोपे असले तरी त्याच्या मनाला झालेल्या जखमा पूर्णपणे भरून यायला त्याचा पुरुषार्थ जागृत केला पाहिजे, हे बाबासाहेबांनी अचूक ओळखले. हे काम करताना आलेल्या अनुभवांतून आणि झालेल्या चिंतनातून चंद्रपूर जिल्ह्यातील 'आनंदवना'चा जन्म झाला.

 उद्ध्वस्त मानवातून पराक्रमी व्यक्तित्व निर्माण करण्याचा हा त्यांचा प्रयत्न पाहून परदेशातील जाणती मंडळी त्यांना मोठ्या आपुलकीने मदत करीत आहेत. आनंदवनासाठी सर्वप्रथम परदेशातून आलेली मदत नॉर्मा शिअर या अभिनेत्रीकडून होती! गांधीजींनी त्यांना अभय साधक' ही पदवी दिली. फक्त आनंदवनापाशीच ते थांबले नाहीत, तो त्यांचा मार्गावरचा एक टप्पा आहे. आज खलिस्तनवादी लोक 'भारत तोडो' म्हणत असतानाच त्यांनी देशाची एकता, अखंडता अबाधित राखण्यासाठी 'भारत जोडो' ही पदयात्रा काढली. समाजसुधारणेचा त्यांचा आणखी एक सुंदर प्रयत्न म्हणजे 'ज्वाला आणि फुले', 'करुणेचा कलाम' ह्या त्यांच्या कविता! त्यांच्या एकांतसाधनेचं ते फलित आहे. 


आजच्या युवापिढीला मारलेली ती अमूर्त हाक आहे. आळस, दैववाद, असामाजिकता, अल्पसंतुष्टता व संवेदनहीनता यांनी ग्रासलेल्या मनांना उद्देशून सोमनाथच्या आंतरभारती श्रमसंस्कार छावणीत बाबा म्हणाले, 'मन का कुष्ठ शरीर के कुष्ठसे अधिक भयंकर होता है।' हे जग व जीवन, फुलवण्याकरिता, उपभोग घेण्याकरिता आपल्याला दिले आहे, निसर्ग अनंत हस्तांनी आपणाला देऊ शकतो, पण त्याला संतुष्ट करण्याचे आव्हान भारतीयाने स्वीकारले पाहिजे, असा बाबांचा आग्रह आहे. यश यावे आणि या माझ्या आवडत्या समाजसुधारकाचे स्वप्न साकार व्हावे हीच माझ्यासारख्या त्यांच्या चाहतीची इच्छा ! म्हणून मला बाबांविषयी म्हणावंसं वाटतं 'जे का रंजले गांजले त्यांसि म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेचि