एका हुतात्मयचे मनोगत 
Eka Hutatmayche Manogat


देशभक्ताचे आत्मवृत्त “माझ्या देशबांधवांनो! आज तुम्ही केवळ औपचारिकरीत्या 'हुतात्मा दिन' साजरा केलात, हे माझ्या पूर्णपणे लक्षात आले आहे. अकरा वाजता भोंगा वाजला आणि मिनिटभर तुम्ही आमचे स्मरण केलेत. काही जणांनी तेही केले नाही. कारण त्यांना हे भोंगे कशासाठी वाजले हेच मुळी उमगले नाही. माझ्या देशबांधवांनो, तुम्ही एवढे निष्ठुर का झालात? अरे, हया देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले, आपल्या आत्म्यांची आहुती दिली त्यांची आठवणही तुम्ही विसरून गेला आहात, इतके कृतघ्न तुम्ही का झालात?


“सध्याच्या युगाला नाव दयायचे असेल तर त्याला स्वार्थी युग' म्हणावे लागेल, असे मला वाटते. आजचा माणूस विचार करतो तो फक्त स्वतःचा, फक्त 'मी'चा. आमच्या युगात हा 'मी' अस्तित्वातही नव्हता. सारेजण भारावले होते ते एकाच विचाराने आणि तो विचार म्हणजे 'देशाचे स्वराज्य' मिळविणे, गुलामगिरीचे पाश तोडणे. 'एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार'अशी सर्वांची मनःस्थिती होती. स्वातंत्र्यसंघर्षाचा मार्ग हा अतिशय अवघड होता याची आम्हां सर्व देशभक्तांना कल्पना होती. हे 'सतीचे वाण' कोणी आमच्यावर लादले नव्हते, तर ते आम्ही स्वतःहूनच स्वीकारले होते. त्यावेळी पुढे वाढून ठेवलेल्या सर्व दुःखांची, संकटांची आम्हाला पूर्ण कल्पना होती. तरी पण आम्ही या मार्गाने निघालो. कारण- 'आम्हा बांधू न शकले, कीर्तीचे वा प्रीतीचे धागे.


“देशभक्तीचे हे व्रत आम्हाला दिले होते लोकमान्यांनी. या व्रताचा मार्ग दाखविला होता महात्माजींनी. अहिंसेचे व्रत स्वीकारून आम्ही हा वसा उचलला. परक्या क्रूर सरकारने गोळ्यांच्या फैरी झाडल्या तरी आम्ही आमच्या छातीचा कोट त्यासाठी उघडा केला. 'चले जाव'चा आदेश परक्या सरकारला फार झोंबला, त्यांनी जुलूम-जबरदस्तीचा कळस गाठला; साऱ्या नेत्यांना अटक केली. सरकारला वाटले की नेतेमंडळी तुरुंगात पडली की चळवळ आपोआप शमेल. पण परिणाम उलटा झाला. सारा देश पेटून उठला. लहानमोठे, स्त्रीपुरुष सर्वच स्वातंत्र्यलढयात हिरीरीने उतरले. स्वतःला सुचेल तो मार्ग प्रत्येकाने अनुसरला. त्यामुळे अहिंसक मार्गाने चाललेली चळवळ कुठे कुठे हिंसकही बनली. सरकार तर अगदी पिसाळले होते. पण प्राणांची बाजी लावणाऱ्या देशभक्तांपुढे सरकारचे काही चालले नाही.


“भारतीयांनो, काय सांगू तुम्हांला! त्यापुढची सात वर्षे नुसती मंतरलेली होती. देशभक्तीची भावना देशात सर्वत्र पसरली होती. श्रीमंत-गरीब, श्रेष्ठ-कनिष्ठ, धर्म, पंथ, जाती, स्पृश्य-अस्पृश्य असा कोणताही भेदभाव उरला नव्हता. सर्वजण एकच गोष्ट जाणत होते की, आम्ही भारतीय आहोत आणि आमचा देश स्वतंत्र करणे हेच आमचे पहिले कर्तव्य आहे. त्यासाठी हजारोंनी 'सश्रम कारावास' स्वीकारला. कठोर शिक्षा साहिल्या. पण हूं की चूं केले नाही. 


म्हणून  तर 'स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी सर्वांना आपले जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद झाला. सर्वजण स्वराज्याचे सुराज्य होण्याचे स्वप्न उरी बाळगून होते. पण.....आता चाळीस वर्षांनंतर ते स्वप्न भंग पावलेले दिसत आहे. सत्तास्पर्धेपुढे आज देशनिष्ठा, प्रामाणिकपणा उरला नाही. स्वार्थासाठी माणूस वाटेल ते पाप करीत आहे. भ्रष्टाचाराचा भस्मासूर मातला आहे हे पाहून आम्हा देशभक्तांचे, हुतात्म्यांचे अंतःकरण फाटत आहे. म्हणून आम्ही तुम्हांला आवाहन करीत आहोत. उठा, जागे व्हा आणि आपल्या स्वातंत्र्याचे सुराज्य करण्यास कटिबदध व्हा!"