जुन्या वाटवृक्षाचे मनोगत 
Junya Vatvrikshache Manogat


आमचे खेडेगाव जेव्हा कात टाकू लागले, म्हणजे ते जेव्हा शहर बनू लागले तेव्हाची ही गोष्ट. आमच्या या खेडेगावाच्या आसपास कारखाने निघाले, गावात शाळा-कॉलेज निघाली आणि माणसांची गर्दी वाढू लागली. त्यामुळे मोठ्या रस्त्यांची आवश्यकता निर्माण झाली आणि मग गावातील हिरव्या संपत्तीची तोड सुरू झाली. नवनिर्माणाचा दावा करणारे ते लोक एका वटवृक्षाजवळ आले आणि काय नवल! त्या वृक्षातून गर्जना झाली-“दूर व्हा, कृतघ्न ग्रामस्थांनो, निर्दय उपन्यांनो!' क्षणात वृक्षतोडीचे ते काम थबकले. आश्चर्याने सर्वांनी कान टवकारले. पुन्हा तो गंभीर आवाज येऊ लागला.

“लोकहो, मी या गावचा पुराणपुरुष आहे. हे गाव वसले आहे माझ्या दृष्टीसमोर. मी येथे केव्हा आलो, कसा आलो ते येथील गावकऱ्यांना देखील माहीत नाही. हे गाव वसण्यापूर्वी योगायोगाने एक संत येथे आला होता, तेव्हा येथे ओसाड माळरान होते. पण ही निर्जन जागा त्याला आपल्या तपश्चर्येसाठी योग्य वाटली. तपाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी माझे बाळरूप येथे आणले आणि या भूमीत मला येथे स्थानापन्न केले. तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ शेकडो पावसाळे मी पाहिले. परमेश्वराच्या या जलदानाशी मी कृतज्ञ राहिलो. भूमातेकडून मिळणारे पोषण आणि वरुणदेवतेचा आशीर्वाद यामुळे मी अंगोपांगातून बहरत राहिलो. आता तर माझ्या या लोंबणाऱ्या जटा माझ्या वृद्धत्वाच्या पताका फडकवीत आहेत. मी पुराणपुरुष असलो तरी कमकूवत नाही. माझे सामर्थ्य तसूभरही कमी झालेले नाही.


“लोकहो, आपलेच कौतुक आपल्या तोंडून सांगणे योग्य नाही हे मला माहीत आहे; पण माझ्या उच्चाटनासाठी येथे गोळा झालेल्या तुम्हा अविचारी लोकांना मला जागे केलेच पाहिजे. मित्रांनो, मी केवळ एक जुना वृक्ष नाही, तर मी या गावाचा संरक्षक आहे. हितकर्ता आहे. या गावाचा जन्म, या गावाचा विकास, या गावाचे आजचे स्वरूप सारे माझ्या साक्षीने झाले आहे. सुरुवातीला दोन-चार गरीब कुटुंबांनी येथे वास्तव्य केले. पण गावात त्यांनी प्रवेश केला तो माझे पूजन करून व आपल्या कुटुंबातील पुराणपुरुष असेच ते मला मानीत. कोणतेही नवीन कार्य करण्यापूर्वी ते माझा आशीर्वाद घेत आणि मग ही प्रथा पिढ्यान्पिढ्या चालू राहिली. कोणतीही नवीन गोष्ट करताना गावकरी प्रथम माझ्याजवळ येत व माझा कौल घेत.


"मी आयुष्यभर गावासाठी खपलो. सर्व गावकऱ्यांना आणि गावात येणाऱ्या पाहण्यांना सावली दिली. केवळ माणसेच नाही, हजारो पक्षी नित्यनियमाने माझ्या अंगाखांदयावर आश्रय घेतात. दूरवरच्या वार्ता मला ऐकवितात. गावातील सारी मुले माझ्यावर सुरपारंब्या खेळत मोठी झाली. दरवर्षी कित्येक सुवासिनी वटपौर्णिमेला माझी पूजा करून अखंड सौभाग्याची मागणी करतात.

“लोकहो, याहून एक मोठे काम मी या गावासाठी करीत असतो. माझ्या उंच उंच गेलेल्या आणि दूरवर पसरलेल्या फांदयांनी मी वरुणराजाला आवाहन करतो. त्यामुळे या गावाला दुष्काळाचे संकट भेडसावत नाही. लोकहो, मला तुम्हांला हीच जाणीव करून दयायची आहे की तुम्ही गावाला नवे रूप देताना असलेल्या जुन्या वृक्षांची तोड करून एक प्रकारे अवर्षणालाच आमंत्रण देत आहात. त्यापेक्षा सुंदर गावाच्या निर्मितीसाठी अधिकाधिक झाडे लावा.” इतके बोलून तो धीरगंभीर आवाज बंद झाला आणि झाडाभोवती जमलेले लोक दूर झाले ते अधिक झाडे लावण्याच्या निश्चयानेच!"