माझा आवड़ता ऋतु 
My Favorite Season

एकाएकी एकमेकांवर ढग आपटू लागतात, त्या तालावर मोर नाचू लागतात, बेधुंदपणे वारा वाहू लागतो. आकाशातून टपोरे थेंब पृथ्वीवर पडू लागतात. धरित्री तर केव्हाची तहानलेली असते. भराभरा ते पाणी अधाश्याप्रमाणे पिऊन टाकते. तिची तहान भागते, ती वसुंंधरा आनंदाने पुलकित होऊन...


सगळीकडे आपल्या जवळचा सुगंध पसरवून टाकते. मग तर मोर बेहोष होऊन नाचू लागतात. गुरे, ढोरे शेपट्या उंचावून धावत सुटतात. बेडकांच्या तर 'डराँव डराँव'ने सारा आसमंत भरून जातो आणि 'वर्षा ऋतू'चे आगमन मोठ्या उत्साहात या पृथ्वीतलावर होते.


खरोखरीच या चराचरसृष्टीला मिळालेली अनमोल भेट म्हणजे हा 'वर्षा ऋतू' होय. 'नवचैतन्य' घेऊन येतो हा वर्षा ऋतू. कालपर्यंत उजाड-खडकाळ माळरान तापलेला, तो दोन-तीन दिवसात हिरवागार होऊन जातो. या हिरव्या रंगांच्या छटा तरी किती हो ! हिरवा कंच... काळपट हिरवा... पोपटी हिरवा... हिरवागार हिरवा... अशा विविध रंगात रोपटी वाढतात.


शेते बहरतात. झाडे फळे-फुले-पाने यांनी बहरून जातात. मानवाला आपले सारे वैभव देण्यास आनंदाने डुलू लागतात, नम्र होतात. मक्याची-ज्वारीची-गव्हाची ताटे, लोंब्या वाऱ्यावर डोलु लागतात. कळ्या उमलू लागतात, फुले हसू लागतात अन् हिरव्यागार शालूवर पाण्याचे मोती चमकू लागतात.

ग्रीष्मात आटून गेलेल्या नद्या-नाले-ओढे आता दुथडी भरून वाहू लागतात. त्यामधील दगड-धोंडे-गोटे-खडक एकदम स्वच्छ धुऊन जाऊन चमकायला लागतात. नद्यांची पात्रे अथांगपणे भरधाव वाहु लागतात. असा हा जीवनदायी 'पावसाळा'. मानवी जीवनाला समृद्ध करून टाकतो.


कोठेही नजर टाका, हिरवा मांगल्याचा, सूचक समृद्धीचा प्रतिक, डोळे अन् आत्मामन तृप्त करणारा हा वर्षा ऋतू म्हणूनच सर्वांना हवाहवासा वाटतो. ना ग्रीष्माचा दाह ना शिशिरातील थंडीचा कडाका.. सगळा कसा सात्त्विक... सौम्य स्वभावाचा आल्हाददायी हा ऋतू. आषाढातील वर्षाचे आगमन...


याच आषाढात... संपूर्ण वर्षा ऋतूचा आनंद घेण्यासाठी वारकऱ्यांची लाट येते... 'ग्यानबा तुकाराम'च्या जयघोषात वारकरी चिंब भिजून जातात. पण उत्साहात नाचत राहतात.


शेतकरी या पावसाच्या धारामध्ये आपल्या घामाच्या...कष्टाच्या धाराही मिसळतो अन् मग काय ? आनंदच आनंद. धरित्री भरभरून पीक देते. शेतकरीच नव्हे तर सर्व प्राणिमात्र आनंदीत होतात.

तसा पाहिला तर 'वर्षा ऋतू', 'वसंत ऋतू'च्या पुढे उपेक्षिला जातो. परंतु त्या 'वसंत ऋतूच्या क्षणिक सुखापुढे या 'वर्षा'चा उदात्तपणा. उदारपणा केवढा महान असतो. खरोखरीच वर्षा ऋतू सृष्टीचे 'सौभाग्य' आहे. ती मानवी जीवनाची 'गंगोत्री' आहे. मानवाला मिळालेले 'महान वरदान' आहे.