मी पाहिलेला क्रिककेटचा सामना 
The Cricket Match I Watched

माझा अविस्मरणीय सामना : यंदा 'महाविद्यालयीन ट्रॉफी जिंकून आणायचीच. अशी प्रतिज्ञा आमच्या मुंबई कॉलेज संघाने केली होती. त्यासाठी गेले सहा महिने रात्रंदिवस सराव चालू होता. मागील  वेळेस  हातातोंडाशी आलेली ट्रॉफी शेवटच्या बॉलवर घालवावी लागली होती. आता कोणतीही कसर सोडायची नाही अन् कसूरही करायची नाही असा निश्चय केला होता सर्व खेळाडूंनी...

सामने सुरू झाले, अन् आमचा सामना अंतिम डावापर्यंत तरी कोणतीही अडचण न येता पोहोचला. आता खरा कसोटीचा क्षण होता. आमच्याबरोबर खेळणारा संघही काही कमी नव्हता. त्याची ही तयारी उत्तम होती. 'ट्रॉफी' जिंकण्यासाठी त्यांनीही जिद्दीने खेळ सुरू केला होता. तोडीस तोड - धावांबरोबर धावा - खेळ कसा अटीतटीचा चालला होता. 


दोनवेळा सामना अनिर्णित राहिला. अर्थात त्यामुळे विश्रांतीचा दिवसही रद्द करून सामना चालू ठेवायचा आणि त्यातून निर्णय घ्यायचा असे ठरले. वादावादी, गाजावाजाही वाढत होताच. आणि अखेरीस तो दिवस उजाडला. स्टेडियम माणसांनी कसे फुलून गेले होते. अशा सामन्यातून आंतरराष्ट्रीय संघांची निवड होणार असते. देशभरातून अनेक क्रिकेट शौकिनांनी आज भाऊगर्दी केली होती.


एखादा चौकार असो किंवा षटकार सारा स्टेडियम टाळ्यांच्या गजराने दुमदुमून निघत होता. एखादा झेल सुटला तरी सगळीकडे निराशेचा सुस्कारा ऐकू येत होता. इकडे विरुद्ध संघही बचावाचा खेळ खेळत होता. त्यामुळे खेळात तसा रंग चढत नव्हता. विकेट तर आमच्या गोलंदाजांनाच अनुकूल होती. परंतु नावाजलेल्या गोलंदाजांची गोलंदाजीही आज मूग गिळून बसली होती. 


मैदानाच्या दिशेने आता प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या, फळांच्या साली, कागदांचे बोळे यायला लागले. अखेरीस दिवस संपेपर्यंत विरुद्ध संघ कसाबसा संपूर्ण आटोपला तेव्हा त्याच्या २१० धावा झाल्या होत्या.


दुसरा दिवस उजाडला तो आमच्या संघाच्या धडाडीच्या खेळानेच. चौकारांच्या दणक्याने कांबळीने सर्वांना खूश करून सोडले. तर सरदेसाईची त्याला साथ आणि चोरट्या धावा यामुळे आमचा संघ धावसंख्या वाढवीत होता. अखेरीस ३०४ धावांवर आमचा संघ बाद झाला अन् ९४ धावांनी आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात विरुद्ध संघानेही धावांचा डोंगर रचायला सुरुवात केली.


पहिल्या आघाडीच्या पाच खेळाडूंनी जणू चंगच बांधला होता. एकही बॉल, बॅटला स्पर्श केल्याशिवाय जातच नव्हता. ९४ धावांची आघाडी पार करून त्यांनी पुढे जोराचा पवित्रा घेतला आणि अखेरचा गडी बाद होईपर्यंत आमच्यावर १९९ धावांची आघाडी मिळविली.

आमच्या संघाला वाटले, ही धावसंख्या आपण सहज पार करू. परंतु पहिले तीन खेळाडू जेमतेम ४०-४५ धावा करून तंबूत परतले. सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. इकडे विरुद्ध पक्षाला 'चिअरअप' जोरात सुरू झाला आणि आमच्यावर दबाव वाढला.


नशिबाने साथ दिली. अन् पुढील दोन खेळाडूंनी दमदार खेळ सुरू करून धावसंख्या १५० पर्यंत नेली. पुन्हा एकापाठोपाठ पाच गडी बाद झाले. आता धावसंख्या पार करण्यासाठी ५० धावांची गरज होती. नववा गडी म्हणून मी तंबूतून बाहेर पडलो. खरा मी गोलंदाज, आता बॅट कशी साथ देते तेच पाहायचे होते. कॅप्टनने मला धीर दिला. माझी पाठ थोपटली. मी मैदानावर आलो. बॅटला बॉल लागला आणि समोरच्या खेळाडूच्या मदतीने धावा सुरू केल्या.


 दोघांनी मिळून ४३ धावा केल्या. तेवढ्यात समोरचा गडी बाद झाला. पुन्हा टेन्शन वाढले. पाहिजे होत्या फक्त ७ धावा. आता दहाव्या खेळाडूला धीर देण्याची वेळ माझी होती. तो दबकत दबकत खेळत होता. चोरटी एखाद्-दुसरी धाव काढत होता. एक चेंडू आला अन माझ्याकडून दणदणीत चौकार मारला गेला अन् स्टेडियम दणाणून गेले. कप्तानासह सर्व खेळाडुंनी मैदानाकडे धाव ठोकली. मला व माझ्या जोडीदार खेळाडूला उचलून घेतले.


गौरवाने तंबूत आणले, जणू काही मीच एकटा यशाचा मानकरी होतो. आमच्या संघाने ट्रॉफी जिंकली होती. ट्रॉफी घेतानाही आमचा सर्व संघ उपस्थित होता. ट्रॉफी डोक्यावर घेऊन नाचत होता. असा हा माझा क्रिकेटचा सामना माझ्या जीवनातील अविस्मरणीय सामना ठरला.