माझा आजोबा 
My Grandfather

आजोबा या शब्दाउबरोबर आठवण येतात, ते आपल्याचवर प्रेम करणारे व आपले सर्व लाड व  हट्ट पुरवणारे आपले आजोबा. लहानपणीचे ते आनंदीदायी क्षण आजही आनंद देऊन जातात, अश्यामच एका प्रसंगाचे वर्णन निबंधात केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

आज आमच्याकडे एक छोटासा घरगुती समारंभ झाला. माझे सर्व काका, आत्या, कुटुंबातील लहानथोर सर्व मंडळी एकत्र जमली होती. आम्ही आमच्या आजोबांचा ऐंशीवा वाढदिवस साजरा केला. गेले सात-आठ दिवस आमची अगदी गुप्त तयारी चालली होती. आम्हांला आजोबांना काही कळू दयायचे नव्हते.

पण शेवटी आजोबांनीच आम्हांला धक्का दिला. जेवण झाल्यावर त्यांनी सर्वांसाठी उत्कृष्ट आंबा आइस्क्रीम मागवले होते आणि समारंभाला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला त्यांनी एकेक भेटवस्तु दिली आणि ती भेटवस्तू देताना त्यांनी प्रत्येक व्यक्तीचे वैशिष्ट्य, तिचे छंद, तिच्या आवडी लक्षात घेतल्या होत्या. त्यामुळे खूपच मजा आली.

माझे आजोबा सदा प्रसन्न आणि तृप्त असतात. आजोबांच्या या आनंदी, आशावादी वृत्तीमागे आहे त्यांची तंदुरुस्ती ! त्यांचे वागणे अतिशय नियमबद्ध  आहे. काहीही झाले तरी त्यांचे पहाटे फिरायला जाणे कधी चुकत नाही. त्यांनी एक 'पेन्शनरांचा क्लब' स्थापन केला आहे. ही वृद्ध मंडळी एकमेकांचे वाढदिवस साजरे करतात, सहलीला जातात. अशा प्रसंगी आजोबा आपल्या दोस्तांसाठी आजीला कुरकुरीत चकल्या करायला सांगतात.

आजोबांना आमच्या आजीविषयी विशेष अभिमान आहे. आजोबा सरकारी कचेरीत मोठ्या हुद्द्यावर होते आणि तेथे अगदी उच्च पदावरून ते सन्मानाने निवृत्त झाले. त्याचे श्रेयही ते आमच्या आजीला देतात; कारण त्यांच्या मते, घराच्या आघाडीवर त्यांना कधीही लक्ष घालावे लागले नाही. आमच्या आजीमुळेच आपले घर 'आदर्श' राहिले, असे ते मानतात.  

आजही आजोबा घरात असूनही सर्वांपासून अलिप्त राहतात. कुणाच्याही कुठल्याही निर्णयात ते ढवळाढवळ करत नाहीत. पण आम्ही एखादी शंका विचारली, तर ते त्याचे खुलासेवार निरसन करतात. उत्तम आरोग्य, स्वच्छ विचारसरणी आणि सतत उदयोगात रमलेले आजोबा अगदी ऐंशीव्या वर्षीही तेज:पुंज वाटतात. आपल्या वार्धक्यातही त्यांनी आपल्या 'युवा' मनाला जपले आहे, म्हणून ते सदा आनंदी राहू शकतात. 'कर्ते व्हा. कार्यरत राहा' हा त्यांचा आम्हांला सदैव उपदेश असतो.